जपानमधला सेफ पिरिएड उपक्रम का वादात सापडला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:51 PM2019-12-12T15:51:49+5:302019-12-12T15:52:37+5:30
जपानमधल्या एका भल्या मोठय़ा डिपार्टमेण्टल स्टोअरने एक प्रयोग राबवला. मासिक पाळीच्या काळात विश्रांती हवी असेल, तर महिला कर्मचार्यांनी एक बॅज वापरावा.. मात्र झालं भलतंच.
- कलीम अजीम
जपानचं एक डिपार्टमेण्टल स्टोअर सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण त्यांनी महिला कर्मचार्यांसाठी राबवलेला एक उपक्रम. त्याचं नाव ‘सेफ पिरिएड’. मासिक पाळीच्या त्नास होत असलेल्या महिला कर्मचार्यांना या स्टोअरने विशिष्ट रंग व डिझाइनचे ‘पिरिएड बॅजेस’ दिले होते. त्नास होत असेल तर महिला कर्मचार्यांनी आपल्या शर्टवर तो बॅज चिकटवायचा अशी ही कल्पना. तो बॅज लावलेला असेल तर त्या महिलेला त्या दिवसात कामातून थोडी विश्रांती मिळावी आणि सेवेतून सूटही मिळावी हा त्यामागचा उद्देश होता; परंतु झालं भलतंच. या प्रयोगाची ‘दहशत माजवणारा’ आणि ‘वेडसर’ म्हणत भरपूर टिंगल झाली. त्यावर टीकाही झाली. शेवटी त्या सार्याला कंटाळून त्या स्टोअरने हा निर्णय मागे घेतला. मात्र सोशल मीडियाच्या जगात भरपूर चर्चा मात्र याविषयाची झालीच.
टोक्यो शहरातलं डैमारू नावाचं हे स्टोअर. भलंमोठं डिपार्टमेण्टल स्टोअर. महिनाभरापूर्वी स्टोअरने 500 महिला कर्मचार्यांना बॅज देत हा प्रयोग राबवला होता. संबंधित बॅजेसवर ‘सीरी चान’ नामक लोकप्रिय मान्जा कॅरेक्टरचं कार्टून आहे. त्या चित्नातून मासिक पाळीचा बोध होतो. जपानमध्ये या चित्नाला ‘मिस पिरीएड’ म्हणून ओळखलं जातं.
डैमारू स्टोरचे प्रवक्ता योको हिगुची यांचं म्हणणं आहे की, ‘आम्ही हा उपक्रम महिला कर्मचार्यांबद्दल सहानूभुती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबवला होता. या बॅजेसचा हेतू ज्या महिला हा बॅज लावतील त्यांना कामातून जरा ब्रेक मिळावा. तो सहज मिळावा. आणि लोकांनी समजून घ्यावं की, आज तिला जरा बरं वाटत नाहीये.’
अर्थात या बॅजेसची कुठलाही सक्ती करण्यात आलेली नव्हती. महिला कर्मचार्यांना गरज लागली तर तो त्यांनी हक्कानं वापरावा, संकोच करू नये एवढंच त्यात अभिप्रेत होतं. आणि ग्राहकांनीही संमजसपणे ते समजून घ्यावं, अशी अपेक्षा होती.
स्टोअरचं म्हणणं आहे की, पिरिएड सुरू असतील तर त्या महिलेनं वजनदार वस्तू न उचलणं, जास्त श्रमाचं काम न करणं हे साहजिक आहे. सहकारी कर्मचारीही ते समजून सहानुभूती बाळगू शकतात. या प्रयोगातून स्टाफमध्ये परस्पर संमती व सहकार्याच्या भावनेमुळे क्र यशक्तीही वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणचं वातावरण आनंददायी होईल.
मात्र या अनोख्या निर्णयावरून बर्या-वाईट आणि सकारात्मक
प्रतिक्रिया उमटल्या. काहींचं म्हणणं होते की, ही ट्रिटमेंट महिलांसाठी भेदभावाला बळकटी देणारी आहे. काहींनी म्हटलं की, महिलांच्या पिरिएडकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. याउलट सकारात्मक
प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक जागतिक मीडिया संस्थांनी या बातमीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहत विशेष वृत्तलेख लिहिले.
मासिक पाळीच्या दरम्यान महिला सेवेतून सूट मिळावी, पगारी रजा मिळावी, सेवेत सवलत मिळावी, हाफ डे लागू असावा, अशा विविध मागण्या जगभरातून होत आहेत. अनेक मानवी हक्क व महिला संघटनांनी या मागणीला व्यापक स्वरूप दिलेलं आहे. काही देशांनी सकारात्मक बदल केले आहेत; पण पूर्णपणे या मागणीला बळकटी देणारा बदल अजून घडलेला नाही. जपानमध्येही मासिक पाळी ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल स्रिया उघडपणे क्वचितच बोलतात. त्यामुळे अशा प्रयोगांवर उलटसुलट चर्चा तिथं होणं अपेक्षितच होतं.
मात्र एक प्रयोग म्हणून त्याची चर्चा झाली हे नक्की.