नोकर्‍या कुणाला मिळतात? कुणाला मिळत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 04:40 PM2019-06-13T16:40:01+5:302019-06-13T16:40:48+5:30

मला हवी तशी माणसं मिळेनात आणि माझ्याकडे रिझ्यूम पाठवलेल्या अनेक तरुणांना जॉब लागेनात. हा असा झोल नक्की का आणि कसा झालाय?

Job? what is the problem with jobs and skilled man power? | नोकर्‍या कुणाला मिळतात? कुणाला मिळत नाहीत?

नोकर्‍या कुणाला मिळतात? कुणाला मिळत नाहीत?

Next
ठळक मुद्देआज असणार्‍या, उद्या नसणार्‍या, जाणार्‍या, जुन्या आणि जन्माला येणार्‍या नव्या जॉबच्या शोधातल्या प्रश्नांची उत्तरं

- विनायक पाचलग

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, कार्पोरेट जॉब, उच्च शिक्षण आणि आता गेली 3 वर्षे स्वतर्‍चा व्यवसाय. 
हा माझा स्वतर्‍चा प्रवास आहे. गेली निवडणूक ते ही निवडणूक या दरम्यान माझा हा प्रवास झाला आणि करिअर करणं म्हणजे नक्की काय याच्या सर्व बाजू सगळ्या अंगानं मला नीट बघता आल्या.  
त्यातून माझ्या काय लक्षात आलं?
एकतर सध्या सर्वत्न चर्चा आहे की, नोकर्‍या नाहीत, जॉबलेस ग्रोथ वगैरे सुरू आहे. अशावेळी हे माझेच सगळे अनुभव पुन्हा नव्याने आठवत आहेत. कारण, हे सारं मी लिहित असतानाच आज माझ्या स्वतर्‍च्या कंपनीत पाच ओपनिंग आहेत. गंमत म्हणजे या पाच ओपनिंगसाठी अवघ्या 10 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एक मेसेज केल्यावर 200हून अधिक अर्ज आले आहेत. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातल्या एकालाही मी नोकरीवर घेऊ इच्छित नाही. म्हणजे मला मनुष्यबळाची गरज आहे, मात्र इच्छा असूनही मला माणसं मिळेनात आणि माझ्याकडे रिझ्यूम पाठवलेल्या अनेक तरुणांना जॉब लागेनात. 
हा असा झोल नक्की का आणि कसा झालाय ? 
हा असा प्रश्न मला एकटय़ालाच पडलेला नाही. ज्या कोणत्या क्लायंटकडे जातो किंवा मित्नाकडे जातो. मग ते कोणत्याही क्षेत्नातले असो. त्यांच्या तोंडी एक वाक्य कायम असते की, ‘आजकाल चांगली माणसं मिळत नाहीत’. 
एकीकडे तरुणांना नोकर्‍या मिळत नाहीत अशी चर्चा, तर दुसरीकडे चांगली माणसं मिळत नाहीत हा शेरा हे नेमकं काय आहे?
नेमका प्रश्न काय आहे?
आजचा सर्वात मोठा प्रश्न हा ‘ह्युमन रिसोर्स’चा आहे का? आणि लोक जेव्हा चांगली माणसं असं म्हणतात तेव्हा त्यांना नक्की काय अपेक्षित असतं? चांगल्या व्यक्तीची नेमकी व्याख्या काय आहे? चांगले नोकरदार बनण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे?
असे बरेच प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं आपण शोधूच.
 मात्र  मुळात आजच्या जगात ‘जॉब’  म्हणजे नक्की काय, याच प्रश्नाचा आपल्याला नेमका विचार करायला पाहिजे. 
आजकाल कित्येक इंजिनिअरिंग झालेली किंवा चांगली शिकलेली मुलं उत्तम पैसे मिळत आहेत म्हणून ओला, उबरवर टॅक्सी चालवत आहेत किंवा मग स्विगी आणि झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी करत आहेत, दरवेळी कोणी डिलिव्हरीला आलं आणि अशा तरुणांना बोलतं केलं की खूप वेगवेगळ्या कहाण्या समजतात.
पण हा खरंच जॉब आहे? 
आज ते जे करत आहेत, तेच सगळं ही मुलं अजून 4-5 वर्षानी करणार आहेत का? मग त्याच पुढं नक्की काय होणार आहे? 
कोणी म्हणतं की माणसांच्या हाताला काम नाही सो चार दिवसांचा आठवडा करा, तर तिकडं  अलीबाबा नावाच्या मोठय़ा  कंपनीचा मालक जॅक माँ म्हणतो की, खूप झाल्या सुट्टय़ा, आता जगात 9 ते 9 असे रोज 12 तास,  आठवडय़ाला 6 दिवस काम केलं पाहिजे. 
पण मग जॉब म्हणजे काय? 
नक्की पुढचे जॉब असणार तरी कसे आहेत? गूगलचं असिस्टंट, अमेझॉनचं अलेक्झा आणि अ‍ॅँपलचं सिरी एव्हाना अनेक शहरी घरांत  पोहोचलं आहे, त्यांची छोटी छोटी कामं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट करत आहेत. उद्या अजून काही काम हे रोबोट आणि ए आय करेल. 
ते जे काम करतील ते काम माणसांना उरणार नाही, हे तर उघड आहे. मग असे कोणते जॉब, कोणती कामं आहेत, की जी कधीच तंत्नज्ञान माणसाकडून काढून घेऊ शकणार नाही? आपला जॉब जायची भीती कोणाला अजिबात नाही आहे? 
गेल्या तीन वर्षात माझ्या कंपनीत जे एम्प्लॉयी बेस्ट परफॉर्मर होते त्यातला एक कॉलेज ड्रॉप आउट होता. 
तर दुसरा वायडी म्हणजे इअर ड्रॉप झालेला होता. 
मग या पोरांनी नक्की ज्ञान मिळवलं कुठून? आजचं शिक्षण जॉब द्यायला पुरेसं आहे का? नसेल तर ते कुठून मिळवायचं ? 
आपल्या हातातला मोबाइल त्यासाठी काही कामाचा आहे का ? 
या व अशा प्रश्नांची शोधयात्ना आपण पुढचे काही दिवस एकत्न करूया, गेल्या पाच वर्षांतले माझे काही अनुभवाचे बोल, बर्‍याचशा चुका आणि त्यातून मिळालेले धडे यातून शोधूया की ‘जॉब’ मिळवायचा कसा?

(विनायक मुळात इंजिनिअर असून, आता एक स्टार्टअप कंपनी चालवतो)

Web Title: Job? what is the problem with jobs and skilled man power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.