यशाची उडी
By admin | Published: September 22, 2016 06:24 PM2016-09-22T18:24:43+5:302016-09-22T18:24:43+5:30
पोलिओनं त्याला गाठलं म्हणून तो रडत बसला नाही. त्यानं जे ठरवलं ते यश गाठलंच. तो म्हणतो, ‘बिना गोल के लाइफ भी कोई लाइफ है?’
Next
>- राकेश जोशी
पोलिओनं त्याला गाठलं
म्हणून तो रडत बसला नाही.
त्यानं जे ठरवलं ते यश गाठलंच.
तो म्हणतो,
‘बिना गोल के लाइफ भी
कोई लाइफ है?’
वरुण भाटी.
उत्तर प्रदेशातल्या नोएडातल्या जमलपूर गावचा हा २१ वर्षांचा मुलगा. त्याचे वडील गावचे सरपंच. शाळेत असल्यापासून त्याला खेळाची आवड. मात्र पोलिओनं घात केला आणि अपंगत्व आलं. बास्केटबॉल तो उत्तम खेळायचा. मग त्याला कळलं की बास्केटबॉलपेक्षाही आपल्याला उंच उडीत जास्त यश मिळू शकतं. म्हणून मग शिक्षणात ब्रेक घेऊन त्यानं गेली दोन वर्षे फक्त खेळावर आणि उंच उडीच्या प्रशिक्षणावर भर दिला. आशियाई स्पर्धेत त्यानं उंच उडीत एक आशिया स्तरावरचा विक्रमही प्रस्थापित केला.
आणि मग स्वप्न होतं ते ऑलिम्पिकचं. तो सांगतो, ‘मला सर्वार्थानं उंच उडी घ्यायची होती. म्हणून मग मेहनत करू लागलो. एकच लक्ष्य होतं ऑलिम्पिक. ते डोळ्यासमोर दिसत होतं. आणि मला काहीही झालं तरी जिंकायचंच होतं.
त्याची जिंकण्याची जिद्द इतकी अफाट होती की, यंदा तो ऑलिम्पिक मेडल आणणारच अशी सगळ्यांना खात्रीच होती.
ती खात्रीही त्यानं खरी ठरवली. सुवर्णपदक ना सही कांस्य तरी त्यानं पटकावलंच. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला उत्तर प्रदेश सरकारनं एक करोड रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. तो एकाएकी श्रीमंत झाला हे खरंय, पण त्यापलीकडच्या एका श्रीमंतीची गोष्ट तो सांगतो.
‘जिंदगी का कोई लक्ष्य तो होना चाहिए, और उस लक्ष्य पर फोकस भी करना जरुरी है, बिना लक्ष्य के जिंदगी कोई जिंदगी ही नहीं होती.!’
ऑलिम्पिकच्या अनुभवानं तो म्हणतो, ‘मी एकच गोष्ट शिकलो, आयुष्य खूप मोठं आणि खूप आव्हानात्मकही आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत का राहायचं? आणि आपण रडलो म्हणून जग थांबत नाही. पण जिंकलोच तर आपल्यासाठी जग काही क्षण तरी थांबून जल्लोष करतंच.!
वरुणची ही उंच उडी म्हणूनच यशाला हात लावणारी ठरली आहे.