बस हो गयी दोस्ती !

By Admin | Published: October 13, 2016 08:48 PM2016-10-13T20:48:09+5:302016-10-14T12:58:37+5:30

खरंतर मला पाकिस्तानला जायचं होतं. पण यावर्षीच्या ‘दीपोत्सव’साठी एनएच 44 चा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनाच ‘किक’ बसली !

Just be friends! | बस हो गयी दोस्ती !

बस हो गयी दोस्ती !

googlenewsNext

- मेघना ढोके

खरंतर मला पाकिस्तानला जायचं होतं. पण यावर्षीच्या ‘दीपोत्सव’साठी एनएच 44 चा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनाच ‘किक’ बसली !
अख्खा देश पालथा घालणारी रोडट्रिप! असलं भन्नाट काम कोणाला करायला मिळणार?
तसंही प्रवास ही एक नशा असते. त्याची चटक लागते. एका प्रवासानं दिलेली नशा थोडे दिवस टिकते. पुन्हा वाटतं की जावं आता फिरायला बाहेर खुल्या वातावरणात, वेगळ्या जगात, वेगळ्या माणसांत! रुटीन जगण्याचा मेणचट हात सुटतो इतकी ती नशा जालीम असते..
आपल्याच देशाची दोन टोकं, कन्याकुमारी ते काश्मीर; त्यांना जोडणाऱ्या सगळ्यात मोठ्या हायवेनं प्रवास करायचा, तोही पूर्णत: अनप्लॅन्ड! 
कंप्लिट भटकं आयुष्य जगायचं. ते करतानाच आपला देश पाहायचा, समजून घ्यायचा. लाइफ आॅन अ हायवे या कल्पनेतच थरार होता. वाटलं, आता पाकिस्तान नंतर; आधी आपलाच देश नीट पाहून घेऊ, माणसांनाच नाही तर देशालाही अवचित गाठू..
माझं मन तत्काळ ‘आनंद’ मोडवरच शिफ्ट झालं. बाबू मोशायचा आनंद. तो मस्त कलंदर सांगून गेलाय ना की, ‘हर एक बॉडी एक ट्रान्समीटर होती है, उससे निकली व्हायब्रेशन को पकडा, रिअ‍ॅक्ट किया, बस हो गयी दोस्ती..!’
- ओळखीची ना पाळखीची अशी ‘व्हायब्रण्ट’ माणसं आपल्यालाही भेटतील अशी आशा मनाशी ठेवून निघाले टीमबरोबर!
सर्व प्रकारचे चष्मे, समज, गैरसमज आणि आपलं ‘शहरी’ शहाणपण यांचं एक गाठोडं करून घरीच ठेवलं आणि जे जसं दिसेल ते तसं पाहायचं हे एवढंच स्वत:ला चारचारदा बजावलं.
जायचं कुठून कुठं हे निश्चित होतं, पण बाकी काहीही ठरवलेलं नव्हतं. कुणाला भेटायचं, कुठं राहायचं, रिझर्व्हेशन.. असलं काहीही प्लॅनिंग केलं नाही. भाषाही न समजणाऱ्या भागातून जाताना आपलं कसं होणार, भर पावसाळ्यात रात्रीबेरात्री आपण कुठं निवारा शोधणार असा काहीही विचार केला नाही. एक नक्की होतं : नॅशनल हायवे ४४ सोडायचा नाही, हा देश आणि हा हायवे हेच आपलं रस्त्यावरचं घर!
प्रवास सुरू केला आणि जी माणसं भेटली, त्यांनी या देशाकडे पाहण्याची माझी समजच बदलून टाकली..
इथं रस्त्यावर माणसं भेटतात तेव्हा ती दिलखुलासपणे बोलतात, तुम्हाला ‘आपलं’ मानतात. कसलेही भेदाभेद करत नाहीत, तुमचं ओळखपत्र मागत नाहीत की तुम्ही कोण कुठले अशा संशयी चौकशा करत नाहीत. उलट जुजबी ओळखीवर तुम्हाला जेवायला घरी या असा आग्रह करतात आणि ते करताना तुमच्या जातीपाती, हुद्दा, रुबाब, पगारपाणी विचारत बसत नाहीत..
माणसं फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात आणि प्रचंड विश्वासानं सहज मन आणि घराची दारंही तुमच्यासाठी उघडतात. एकमेकांची भाषाही समजत नसताना अशी कितीतरी गरीब, सामान्य माणसांची दारं माझ्यासाठी उघडली. तेव्हा मलाच अनेकदा प्रश्न पडला की, आपण काय म्हणून माणसांना गरीब आणि सामान्य असं म्हणतो आहोत?
टपरीवर चहाचे पैसेही न घेणारे, रात्री बेरात्री कुठं जाता आता म्हणत स्वत:च्या ढाब्यावर राहण्याची सोय करतो म्हणणारे आणि एवढं करूनही आपण काहीच केलं नाही असं वाटून डोळ्यात पाणी आणून निरोप देणारे..
मनाची भाषा बोलणारी आणि मायेची नाती जोडणारी अशी माणसं या प्रवासात सर्वत्र भेटली..
इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे, आणि जो तो आपापल्या कहाणीचा हिरो. जरा त्यांच्या मनातल्या मातीला थोडं उकरलं की माणसं बोलतात, आपल्या स्वप्नांविषयी, झगडण्याविषयी, कष्टांविषयी आणि आयुष्यात काहीतरी घडवण्याविषयी..
मला अजून आठवताहेत गच्च पावसाळी रात्री हैदराबादच्या चकाचक झळाळत्या हायटेक सिटीत भेटलेले, एका बड्या औषध कंपनीच्या खाली कंदिलाच्या उजेडात चहाची टपरी चालवणारे व्यंकट रेड्डीकाका. पावसात भिजत चहा पीत गप्पा मारल्या त्यांच्याशी तर ते सांगत होते की, त्यांना चार मुली! मुलगा नाहीच. मुलींनी हट्ट केला म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी गाव सोडून हे काका हैदराबादेत आले. ते सांगत होते, ‘मेरी बेटी कहती है, एक दिन ये हायटेक सिटीमें सबसे बडे कांच के आॅफिस की बॉस बनूंगी; मैं कौन होता उसे रोकनेवाला?
मुलींना गर्भात मारणारे आईबाप माध्यमांमध्ये सतत भेटतात; पण मुलींसाठी जिवाचं रान करणारे आईबाप आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी, धडाडीच्या मुली या प्रवासात किती भेटल्या असतील, त्याची गणतीच नाही.
असे किती किस्से, किती कहाण्या. हिमतीच्या, कष्टाच्या, उमेदीच्या आणि संघर्षाच्याही..
जुनी ओझी मानगुटावर न बाळगता, नव्यानं काहीतरी घडवू पाहणारे, ठेचा खात झगडणारे तरुण आणि तरुणीही भेटल्या. आपण प्रयत्न केले तर आपली स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा त्यांच्या नजरेत दिसली.
मी परत आले ती या उमेदीची ताकद घेऊनच.
रस्त्यावर काही हजार किलोमीटर प्रवास केला असं कुणाला सांगितलं तर लोक अजूनही विचारतात, एकटी मुलगी होतीस तू टीममध्ये? आणि हा रात्री-बेरात्रीचा प्रवास? भीती नाही वाटली?
- खरं तर हा प्रश्नच कुठं उद्भवला नाही इतका ‘सभ्य’ देश मला तरी या प्रवासात भेटला. रात्रीबेरात्री हॉटेल्स, टोलनाक्यांवर महिला काम करताना सर्वत्र दिसल्या. कुणी आपल्या बाईपणाचा बाऊ करत नव्हतं. आणि माझ्या टीममधल्या पुरुष सहकाऱ्यांसह देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना वाट्टेल त्या वेळी रस्त्यावर भटकताना, जो भेटेल त्याच्याशी गप्पांची मैफल जमवताना मी ‘स्त्री’ आहे, याचे साधे सिग्नल्ससुद्धा कुणी दिले नाहीत.
माझा अनुभव तरी हेच सांगतो की, हा देश आपण माध्यमांत रोज उठून वाचतो-पाहतो तितका भयानक नाहीये बायकांसाठी! 
अशा किती कहाण्या सांगता येतील. पण त्या कहाण्यांपेक्षाही मोलाची आहे मी कमावलेली नजर आणि त्याहून मोठी आहे मी बॅगेत गच्च भरून आणलेली उमेद आणि चांगुलपणावरची श्रद्धा..
ती उमेद मला आता आयुष्यभर पुरेल, हे नक्की!


(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com

Web Title: Just be friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.