लातूरच्या ज्योतीनं बेसबॉल टीमर्पयत कशी मारली धडक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:50 PM2019-11-07T12:50:59+5:302019-11-07T12:52:15+5:30

बेसबॉल हा तसा शहरी खेळ. लातूरच्या ज्योतीनं तो खेळायचा ठरवला तेव्हा वाटेत अडचणी अनेक होत्या; मात्र ते सारे अडथळे ओलांडत भारतीय संघात निवड होण्यार्पयत तिनं मजल मारली आणि आता चीनमध्ये होणार्‍या स्पर्धेकडे तिचे लक्ष आहे.

jyoti pawar , A latur girl, & a baseball dream. | लातूरच्या ज्योतीनं बेसबॉल टीमर्पयत कशी मारली धडक?

लातूरच्या ज्योतीनं बेसबॉल टीमर्पयत कशी मारली धडक?

googlenewsNext
ठळक मुद्देनांदुर्गा तांडा ते चीन

- महेश पाळणे

कोशीश करनेवालों की कभी हार नहीं होती.
हे तिनं अगदी खरं करून दाखवलं आहे. त्यात तिची वाटही वेगळी आणि त्यासाठीचे कष्टही आगळे, हिंमतही वेगळीच. 
लातूरच्या ज्योती पवारची ही गोष्ट. तिनं बेसबॉल खेळात एक नवीन शिखर गाठलं आहे. वरिष्ठ गटाच्या भारतीय महिला संघात आपली निवड पक्की करून तिनं नांदुर्गा तांडा ते चीन असा एक  दीर्घ पल्ला गाठला आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नांदुर्गा तांडा येथील ती मूळची रहिवासी. ज्योती व्यंकट पवार.   9 ते 15 नोव्हेंबरदरम्यान चीनमध्ये होणार्‍या दुसर्‍या एशियन चॅम्पियनशिप बेसबॉल स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात तिची निवड पक्की झाली आहे. यासाठी भारतीय संघाचं प्रशिक्षण शिबिर पंजाब सध्या  जालंधर येथे सुरू आहे. खडतर परिस्थितीत बेसबॉलसारख्या खेळात ज्योतीनं केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. 
घरची परिस्थिती साधारण. वडील लातूर तालुक्यातील गंगापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक म्हणून कार्यरत, तर आई भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. ज्योतीला दोन बहिणी व एक भाऊ असा सहा जणांचा परिवार. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने खेळात यावे की नाही, अशी भावना ज्योतीची होती. तिच्यासह तिची लहान बहीण बबिताही बेसबॉलची उत्कृष्ट खेळाडू. मात्र घरच्या परिस्थितीमुळे बबिताला खेळापासून दूर राहावं लागलं. परंतु, ज्योतीने आपली जिद्द कायम ठेवत राज्यभरात आपल्या बेसबॉल खेळातील पीचिंगच्या जोरावर अनेक मैदाने गाजवली. मुलांच्या शिक्षणासाठी हे कुटुंब लातुरात आलं. लातूरच्या जिजामाता विद्यालयात तिनं प्रवेश घेतला. इयत्ता पाचवीपासून ज्योती शालेय परिसरात बेसबॉल खेळताना इतर विद्याथ्र्याना पाहत असे. आपली खेळण्याची इच्छा तिने क्रीडाशिक्षिका दैवशाला जगदाळे यांच्याकडे व्यक्त केली. मात्र तिची प्रकृती सडपातळ असल्यानं सुरुवातीला ती कितपत खेळू शकेल अशी शिक्षकांना शंका होती. मात्र  जिद्द राखत तिने आपला हट्ट परत व्यक्त केला. हा हट्ट पाहून जगदाळे यांनी ज्योतीला बेसबॉल खेळण्याची संधी दिली. यानंतर तिचा खेळातील प्रवास सुरू झाला. इयत्ता सातवीपासून तिने खेळाला सुरुवात केली. 
अवघ्या आठ महिन्यांतच मेहनतीच्या जोरावर ज्योतीने सर्वप्रथम राज्य स्पर्धेत आपली चुणूक दाखविली. जवळपास दहावेळा राज्यस्तरीय स्पर्धेत ज्योतीने सहभाग नोंदविला असून, अनेकवेळा आपल्या संघास सुवर्ण व रौप्य पदकं मिळवून दिली आहेत.  अवघ्या 19 वर्षी भारताच्या वरिष्ठ संघात निवड होणारी ज्योती ही मराठवाडय़ातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. खेळातील जिद्द पाहून जगदाळे यांनी ज्योतीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती उत्कृष्ट पीचर म्हणून उदयास आली. सहा वेळेस 14, 17 व 19 वर्षे वयोगटांत ज्योतीने महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. सलग चार वर्षे विद्यालयाच्या संघाने राज्यात प्रथम स्थान पटकाविले. 
मुलांच्या शिक्षणासाठी लातुरात आलेले हे कुटुंब सध्या भाडय़ाच्या घरातच राहते. खेळामुळे आलेल्या बळामुळे ज्योतीने सर्व कुटुंबाची जबाबदारी स्वतर्‍वर घेतली आहे. आई-वडील दोघेही अल्पशिक्षित असल्याने ज्योतीने पुढाकार घेत कुटुंबासाठी हातभार लावला आहे. खेळातून मिळणार्‍या शिष्यवृत्ती ज्योती कुटुंबासाठी खर्च करते. जवळपास आजवर 1 लाख रुपये ज्योतीला शिष्यवृत्तीतून मिळाले आहेत.  यातूनच तिने कुटुंबाचा आर्थिक गाडा सांभाळला आहे. 
सध्या ज्योती राजर्षी शाहू महाविद्यालयात कला शाखेतील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. यंदाच्या वर्षात होणार्‍या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठीही तिची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. हे सारं सुरू असताना सरावाकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. सकाळ, सायंकाळच्या सत्रात जवळपास 6 तास तिचा सराव सुरू असतो. शनिवार, रविवार ती आपला पूर्णवेळ खेळासाठी देते. सणवार याची पर्वा न करता सतत बेसबॉलच्या सरावात रहायला आवडत असल्याचंही तिनं सांगितले.
आता भारतीय संघात निवड झाल्यानं तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्याची आणि उत्कृष्ट खेळ करण्याची संधी मिळाली आहे.
 


( महेश लोकमतच्या लातूर आवृत्तीत क्रीडा वार्ताहर आहेत.)

Web Title: jyoti pawar , A latur girl, & a baseball dream.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.