करायचं डेअरिंग

By admin | Published: October 13, 2016 08:28 PM2016-10-13T20:28:44+5:302016-10-14T12:45:44+5:30

रस्ते कुठंकुठं आठपदरी, चकाचक होते कुठकुठं बिनकठड्याचे, रस्तेच नसलेले असे रस्तेही दिसले, पण तरीही, ठरवलंच..

Karach dairing | करायचं डेअरिंग

करायचं डेअरिंग

Next

- मुकेश ताजणे

रस्ते कुठंकुठं आठपदरी, चकाचक होते कुठकुठं बिनकठड्याचे, रस्तेच नसलेले असे रस्तेही दिसले,
पण तरीही, ठरवलंच..

तसं गाडी चालवण्याचं काही टेन्शन नव्हतं, पण देशाच्या पूर्ण दोन टोकांपर्यंतचा प्रवास करायचा म्हणजे रोज किती किलोमीटर गाडी चालवायची याचं काही गणित नव्हतं!

‘साऊथ’ला रस्ते तर खूपच छान होते. सरळ, चकचकीत, मोठमोठ्या लेन्स. गाडी चालवणं सोपं होतं. फक्त हाल होते ते खाण्यापिण्याचे! ते ‘पोंगल आणि डोसे’ यांच्याशी काही माझं जमत नव्हतं. जेवायचे हाल नाही झाले, पण पोटापुरता आधार कुठंतरी होऊन जायचा!

पण पेडाकुट्टा तंडा नावाच्या हैद्राबादजवळच्या एका गावात पोहचलो एका रात्री. त्या गावातले खूप लोक हायवेवर अ‍ॅक्सिडेण्टमध्ये गेले होते. इतकी गरीबी, एक कुठली तरी फॅक्टरी फक्त होती तिथं लोकं कामाला जायचे. मला खूप वाईट वाटलं तिथं की, रस्त्यावर एवढी डेव्हलपमेण्ट दिसतेय, पण या लोकांना खायला नाही. इथं कधी येणार विकास? 

आणि पुढं नॉर्थला जाताना तर नागपूर सोडलं तसा रस्ता खराब. आणि जम्मूला पोहचलो, जवाहर टनेल क्रॉस केलं तसं तिथं लोक सांगत होते की, ‘अंदर, आगे मत जाओ!’
पण इथवर आलोय तर काश्मिरला जायचंच असं सोबतचे पत्रकार म्हणत होते, त्यांनी ठरवलंच पुढं जायचं तर आपणही डेअरिंग करायचंच असं मी ठरवलं होतं.

निघालो पुढं. पण जम्मू-श्रीनगर रस्ता खार खराब, अवघड होता. उंच दरी, त्यातून ती झेलम नदी वाहत होती. सुंदर होतं दृश्य पण एक नजर तिच्याकडे पाहण्याची सोय नव्हती. एक सेकंद जरी नजर हलली असती तरी काहीही होऊ शकलं असतं.

एका तर एरियाचंच नाव होतं, शैताननाला. तिथं खूप अपघात होतात, पाण्यात गाड्या वाहून जातात असं लोक सांगत होते. अपघात झालेल्या गाड्या दिसतही होत्या. डेंजर होता तो रस्ता. 
पण ‘डेअरिंग’ केलं होतंच तर मागे हटणार नव्हतोच. परतीच्या वाटेवर तर रात्रीबेरात्री घाटातून गाडी चालवली. एकावेळेस दोनच गाड्या जातील असे रस्ते होते, तिथंही गाडी चालवताना खूप रिस्क होती.
पण कशाचं टेन्शन नाही घेतलं, मी मनाला एकच सांगत होतो की, एवढ्या दूर आलोय तर, नवीन काहीतरी बघायला भेटेल!

खूप नवीन गोष्टी, पूर्ण देशच पहायला भेटला. अनुभव आले. एकदम लक्षात राहण्यासारखी, जन्मभर आठवेल अशी एक काही हजार किलोमीटरची ट्रीप झाली! खूप यादगार राहिला हा अनुभव..


( लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वाहनचालक आहेत.)

Web Title: Karach dairing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.