गप्प रहा, कमी बोला! एवढं जरी केलं, तरी तुमचं डोकं थार्यावर येईल!
By admin | Published: January 8, 2015 08:20 PM2015-01-08T20:20:28+5:302015-01-08T20:20:28+5:30
आपण जे करतो ते आपला हक्कच आहे, आपल्याला किमान एवढं तरी मिळायलाच हवं, असंच अनेकांना वाटतं.
Next
>
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रातल्या कहाण्या वाचल्या, तपासून पाहिलं की, प्रेमात पडलेली, एकमेकांशी बोलण्यासाठी आसूसलेली ही तरुण मुलं अशी कट्टर वैरी असल्यासारखे एकमेकांच्या जीवावर का उठतात?
रडरडून उच्छाद मांडतात, दुसर्याला जीव नको व्हावा इतपत छळतात, श्वास घेणं मुश्किल करून टाकतात, भांड-भांडून कडवट होतात.
यासार्यातून बाहेर पडण्याचा, आपलं नातं टिकवण्याचा काहीच मार्ग नाही का?
आपलं चुकतंय हे माहिती असूनही वेळीच स्वत:ला सावरता येत नाही का?
आणि सावरायचं असेल तर ते कसं?
सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ
डॉ. संज्योत देशपांडे
यांनी सूचवलेले हे काही उपाय..
थोडं शहाणपण, थोडासा समजूतदारपणा, आणि विश्वास एवढं जरी मनाशी नीट सांभाळलं तर हे नातं टिकू शकतं, कलह टाळून, मनस्ताप कमी करता येऊ शकतो.
तो कसा करायचा, यासाठीच घ्या ही चेकलिस्ट.
-ऑक्सिजन टीम
अती होतंय का?
- तपासून पहा.
यासार्यात चुकतं काय की, आपण काहीतरी चुकीचं वागतो आहे हेच मुलंमुली समजून घेत नाही, मान्यही करत नाही.
आपण जे करतो ते आपला हक्कच आहे, आपल्याला किमान एवढं तरी मिळायलाच हवं, असंच अनेकांना वाटतं. असं वाटणं म्हणजे नात्याकडून निव्वळ अपेक्षा ठेवणं आणि आपणच अति डिमाण्डिंग होत जाणं. तसं केलं की समोरच्याचा जीव गुदरमणार, तो आपल्याला टाळणारच.
आपण तसं करतोय का, आपल्या नात्यात आपणच ‘अती’ करतोय का, हे तपासून पाहण्यासाठी स्वत:ला हे प्रश्न नक्की विचारा.
१) किती तास तुम्ही रोज फोनवर बोलता?
- जितका जास्त वेळ बोलाल, तितके तुम्ही जास्त डेंजर झोनमध्ये आहात.
२) बोलताना तुमच्यापैकी कोण जास्त बोलतं?
- तुम्ही जास्त बोलत असाल, सतत फोन करून-करून बोलत सुटत असाल तर तुम्ही अती करताय.
३) दिवसातून त्यानं किती फोन केले? तिनं किती केले? लास्ट सीन व्हॉट्स अँपवरचं कधी आहे, याचे हिशेब तुम्ही मांडता का?
- मांडत असाल तर तुम्ही नात्याविषयी असुरक्षित आहात.
४) बोलताना तुम्ही आरोप करता का? तू माझ्यासाठी अमुक करायलाच पाहिजे होतं असं सतत म्हणता का?
- तसं असेल तरी तुम्ही अतीच करता आहात.
५) तुम्ही शेवटचे आनंदानं, मस्त गप्पा मारत कधी बोलला होतात?
- आठवत नाही. मग तुमचं नातं, अवघड टप्प्यात आहे, त्याला जबाबदार कोण विचारा, स्वत:ला!
६) नकोच आता हा माणूस, हे बोलणं, असं तुम्ही म्हणता आणि एक फोन नाही आला तर रेस्टलेस होता का? - मग तुम्ही धोक्यात आहात.
तोंड बंद! काय केलं तर, मनस्ताप टळून, प्रेम वाढेल, नातं मूळ धरेल?
१) आपण फोन केला की, पलिकडून उत्साहानं बोलणं सुरू झालं पाहिजे. त्याचा/तिचा आपल्याला स्वत:हून फोन आला पाहिजे. आपल्या मेसेजला रिप्लाय आला पाहिजे.
- असं तुम्हाला का वाटतं?
तर तुम्ही या सार्याचं कनेक्शन थेट तुमच्या प्रेमाशीच लावून टाकता. फोन आला, रिप्लाय आला, तर त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष आहे नाहीतर नाही, हे तुम्हीच ठरवून टाकता. त्याच्या प्रत्येक कृतीचा तसाच अर्थ लावता. फोन कमी, मेसेज कमी, बोलणं कमी म्हणजे प्रेमच कमी झालंय असं ठरवून मोकळे होता. त्यातून तणाव वाढतो, असुरक्षित वाटतं आणि त्या तणावातून आणखी भांडणं होतात, आणखी गैरसमज होतात.
मग यावर उपाय काय?
आपल्या हातातल्या मोबाइलचा, सतत बोलण्याचा, आपल्या प्रेमाशी काही संबंध नाही. प्रेम किती याचं ते मापन नाही, हे सांगा स्वत:ला!
हे एकदा मान्य केलं तर अविश्वासाचा प्रश्नच संपेल!
२) सतत त्या माणसाला फॉलो करण्याची काही गरज असते का? एकतर प्रत्यक्ष तो कुठे आहे, याची माहिती ठेवली जाते. मग ऑनलाइन कुठं आहे, व्हॉट्स अँपवर कितीवेळ होता, लास्ट सीन कधीचं? कुणाशी किती वेळ बोलतो? आपल्याशी किती वेळ बोलतो?
- या आकड्यांच्या जंजाळातून बाहेर काढा स्वत:ला! आपण असं वागून दुसर्याच्या स्पेसवर अतिक्रमण करतोय हे लक्षात घ्या. स्पेश देण्याची संकल्पना आता बदलते आहे. तुमची काळजी समोरच्याला गुदमरून टाकू शकते. त्यामुळे आपल्या कितीही जवळची, अगदी प्राणप्रिय व्यक्ती असली तरी तिच्या आयुष्याचा कण्ट्रोल आपल्या हाती घेऊ नये. आपण आपलं आयुष्य जगावं, त्या व्यक्तीला तिचं जगू द्यावं.
३) ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात इतरही जीवाभावाची माणसं असतील हे मान्य करा. त्या माणसांना,मित्र-मैत्रिणींना त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्थान राहू द्या. आपली प्रिय व्यक्ती कुणाशी किती बोलते, काय बोलते, आपल्यापेक्षा दुसर्याच व्यक्तीला भाव जास्त देते का, वेळ जास्त देते का, हे सारं सतत तपासणं बंद करा!
तुमचा जर तुमच्या माणसावर प्रेम असेल तर, त्याला इतर नात्यांपासून तोडायची काहीच गरज नाही, तसं केल्यानं ती व्यक्ती तुमच्याच जवळ राहीन असं काही नाही.
४) मुळात विचारा स्वत:ला तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का? आणि आपलं जर खरंच प्रेम असेल, तर आपण त्या व्यक्तीला इतकं छळू का?
विश्वास किती ठेवू एकमेकांवर? हा विश्वास कमी पडतो, समजूतदारपणाच नसतो म्हणून तर या क्षुल्लक गोष्टी जीवावर उठतात.
५) तुम्ही अती बोलता, अती शेअरिंग करता तेव्हा तुम्हाला एकमेकांचा कंटाळा यायला लागतो. कनेक्टेड राहण्याचं ओझं वाटायला लागतं. नावीन्यच संपतं नात्यातलं.
त्यामुळे मोबाइलवर बोलणं कमी करा, महत्त्वाचं बोला, भांडण टाळून, जे विषय दोघांना आनंद देतात ते बोला.
हायपर होणं टाळा.
नातंच नाही तर तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठीही ते फार गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा.