सुखी रहा..या दिवाळीत अंगणात दिवे लावताना, सांगू ना स्वत:लाच की, पुरे मनात नकारघंटा वाजवणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 04:00 AM2017-10-19T04:00:00+5:302017-10-19T04:00:00+5:30
या दिवाळीत अंगणात दिवे लावताना, सांगू ना स्वत:लाच की, पुरे मनात नकारघंटा वाजवणं.. सतत नाही नाहीचा गजर करणं आता भिडूच जगण्याला हसत हसत..
“In order to carry a positive action we must develop here a positive vision.”
- दलाई लामांचं हे वाक्य काय सांगतं?
ते म्हणतात, काही चांगलं करायचं तर आधी तसा विधायक, सकारात्मक विचार आपल्याला करावा लागतो.
तोच नसेल, म्हणजे सकारात्मक विचारच नसेल तर आपण चांगलं काम कसं करणार?
वर वर पटतं आपल्याला हे वाक्य.
पण कळत नाही, कळलं तर वळत नाही.
म्हणजे काय पहा, आपण उशिरा उठतो, मग चिडतो स्वत:वर म्हणतो रोजचंच हे नाटक, रोज उशीर होतो, रोज उशिरा उठतो. काही उपयोग नाही, आपल्याच्यानं काहीच होणार नाही..
असं म्हणत स्वत:वर खूप चिडचिड करतो..
उपयोग काय?
रोज तेच.
मग स्वत:लाच म्हणतो की, मी नाही सुधारणार, मला नाहीच जमत वेळ पाळणं..
पण याउलट जर आपण असं मान्य केलं की, मला रोज झोपेतून उठायला उशीर होतो; पण आजपासून मी सकाळी लवकर म्हणजे ६ वाजता उठेन.. उठेन..
बघा किती सोपंय..
चिडचिड करण्यापेक्षा, एका वाक्यात स्वत:ला सांगणं की,
मी सकाळी ६ वाजता उठेन!
आपण आपल्या मेंदूत एक फिक्स्ड प्रोग्रॅम सेट करून टाकतो.
सहाची वेळ पक्की करतो.
त्याला लवकर, उशिरा वगैरे कळत नाही.
त्याला वेळ कळते आणि तो डोक्यात गजर लावतो,
आपली मानसिक-शारीरिक ऊर्जा ती वेळ पाळण्यासाठी
एका दिशेनं कामाला लागते..
हे साधं गणित.
पण आपण असं साधं, सरळ, सकारात्मक जगत नाही..
तसा विचारच करत नाही..
आपण सकाळी उठल्यावर कधी म्हणतो का,
आज माझ्या आयुष्यात काहीतरी भारी घडेल..
आजचा दिवस मी भन्नाट काम करेल..
नाही.
उठल्यापासून आपली चिडचिड.
काम फार आहे.
उशीर झाला आहे.
काय ती पावसाची रिपरिप.
आजही ट्राफिक जाम.
खिशात पैसे नाहीत फार.
घरातली माणसंपण अशी,
एक धड बोलत नाही.
आजही नास्त्याला पोळीचा कुस्कराच.
धड खायला वेळ नाही..
सतत नन्नाचा पाढा..
आणि असं नकारात्मक आपण रोज बोलतो..
तेच आपल्या डोक्यात चालतं
आणि घडतंही तेच..
या दिवाळीत अंगणात दिवे लावताना,
सांगू ना स्वत:लाच की,
पुरे हे नकारघंटा वाजवणं..
सतत नाही नाहीचा गजर करणं..
यंदा दिवाळीत एक दिवा मनात उजळवू..
आणि म्हणून की,
हा माझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश..
मी ठरवेन तेच होईन..
माझ्या अवतीभोवती सारं चांगलं घडेल,
मी ते घडवीन,
आणि म्हणेन स्वत:लाच..
यशस्वी भव !
सुखी रहा..