खाटांगळे गावचा ओंकार जेव्हा खेलो इंडियात कुस्ती मारतो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 07:30 AM2020-01-30T07:30:00+5:302020-01-30T07:30:02+5:30
ओंकार पाटील र् ‘खेलो इंडिया’- 55 किलो गट, ग्रिको रोमन कुस्तीमध्ये सुवर्णपदक
- समीर मराठे
ओंकारनं अजून आपलं सतरावं वर्षही पूर्ण केलं नाही. तो नववीत शिकतो. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत 55 किलो गट कुस्तीत त्यानं गोल्ड मेडल पटकावल्यामुळे त्याचं अभिनंदन करावं, त्याच्याशी थोडं बोलावं म्हणून त्याला फोन केला, तर रेल्वेप्रवासात होता. गुवाहाटीत गोल्ड मेडल घेतल्यानंतर तिथून लगेचच तो बिहारला- पाटण्याला निघाला होता, कुस्तीच्या नॅशनलसाठी.
गाडीत खूपच गलबला होता. मुलांचा गोंगाट कानावर येत होता, हंसी-मजाक सुरू होती. मध्येच रेंज जात होती, तेव्हा तोच म्हणाला, मी जरा दुसरीकडे, कोपर्यात खिडकीजवळ जातो आणि मग बोलतो. आपण गोल्ड मेडल जिंकलंय, पेपरमध्ये वगैरे आपलं नाव, आपल्या बातम्या छापून आल्या, याच्याशी त्याला काहीच देणं-घेणं नव्हतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील खाटांगळे हे ओंकारचं मूळ गाव. त्याचे आई-वडील शेती करतात. अर्धा एकर. त्यावरच त्यांची गुजरण.
अशा गावातल्या या मुलाला कुस्तीची आवड कशी लागली?
ओंकार सांगतो, आवड ना? आधी तसं काई नवतं. गावातली काही पोरं कुस्त्या करायची. जत्रेत. चौथीत असताना मीही एक मैदानी कुस्ती खेळलो आणि मारली ना ती कुस्ती मी. तब्बल तीस रुपये मिळाले! मला खूप आनंद झाला. थेट वडिलांकडे गेलो. त्यांना सांगितलं, मला कुस्ती शिकायची. तालमीत जायचं. वडील म्हणाले, जा. गल्लीतली माझ्या वयाची चार-पाच पोरं गोळा करून मी तालमीत जायला लागलो. अशी माझ्या कुस्तीची सुरुवात झाली.
ओंकारच्या गावापासून जवळच सात-आठ किलोमीटर अंतरावर कुंभी-कासारीला साखर कारखाना आहे. ओंकार सांगतो, इथे आम्ही मित्र-मित्र काहीवेळा फिरायला, ऊस खायला वगैरे जायचो. तिथे लै तगडे तगडे पोरं दिसायचे. पैलवान. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटायचं, थुत, आपली काय बॉडी आहे? या पोरांसारखी बॉडी पायजे! इथेच युवराज पाटील कुस्ती संकुल आहे. आजूबाजूची बरीच पोरं इथे कुस्ती शिकायला येतात. मी लगेच वडिलांना सांगितलं, ‘मला इथे कुस्ती शिकायला यायचं.’
काही दिवसांनी वडिलांनी ओंकारला तिथे कुस्ती शिकायला पाठवलं. त्यावेळी ओंकार सातवीत शिकत होता. तिथे एका मोठय़ा हॉलमध्ये 20-25 मुलं राहायचे. तिथेच कुस्तीचे धडे घ्यायचे. ओंकारच्या गावचीच चार-पाच मुलंही तिथे होती.
ओंकार कुस्ती तर शिकत होता; पण म्हणावं तशा कुस्त्या तो मारत नव्हता. आपण कमी पडतोय, असं त्याला वाटत होतं. कोल्हापूर परिसरातली बरीच मुलं कुस्ती शिकायला पुण्यात होती. त्यात ओंकारच्या ओळखीचीही काही मुलं होती. कुस्तीत पुढे जायचं असेल, नाव कमवायचं असेल, तर आणखी मेहनत घ्यायला पाहिजे, चांगलं कोचिंग मिळायला पाहिजे असं ओंकारला वाटायला लागलं.
वर्षभरात त्यानं पुन्हा वडिलांना सांगितलं, मला कुस्ती शिकायला, प्रॅक्टिस करायला, नवे डाव जाणून घ्यायला पुण्याला जायचं. त्यासाठी किती खर्च येईल, आपली परिस्थिती काय आहे, वडिलांना झेपेल की नाही, यातलं काहीच त्याला माहीत नव्हतं. परिस्थिती नव्हतीच. पैशांची चणचण तर कायमच असायची. तरीही वडील यावेळीही तयार झाले. एवढंच म्हणाले, ‘जातोहेस तर काहीतरी करून दाखव.’
ओंकार सांगतो, ‘वडिलांच्या त्या शब्दांचं गांभीर्य त्यावेळी मला नव्हतं; पण आज मला कळतंय, वडिलांना त्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या असतील, किती अडी-अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल, पुण्यात दरमहा मला किमान पंधरा हजार रुपये खर्च येतो, हे पैसे ते कसे जमवत असतील, कुठून आणत असतील, मला इतके पैसे पाठवल्यानंतर घरी काय खात असतील?. हे सारं आज मला कळतंय. त्यानंतर मीही माझ्या मेहनतीबाबत, माझ्या कुस्तीबाबत जास्त गंभीर झालो.’
कुस्तीबरोबरच आर्मी हेही ओंकार आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न आहे. खरं तर हे जोडस्वप्न आहे.
ओंकार सांगतो, ‘वडिलांना एकच माहीत होतं, चांगल्या कुस्त्या मारल्या, कुस्तीत नाव काढलं, तर आर्मीत जाता येतं! मी आर्मीत जावं हे आजही त्यांचं स्वप्न आहे. माझंही आर्मीत जाण्याचं स्वप्न आहे. ज्युनिअर नॅशनलला मेडल काढलं की, आर्मीवाले बोलवून घेतात, हे मी ऐकलं आहे.’
ओंकारला विचारलं, तू तर आता ‘खेलो इंडिया’मध्ये गोल्ड मेडल घेतलं आहेस, मग आता आलं का तुला आर्मीचं बोलवणं?
निरागसपणे ओंकार सांगतो, ‘मी अजून त्यांची कुठलीही टेस्ट दिली नाही; पण लागेल माझा नंबर आर्मीत असं मला वाटतंय.’
ऑलिम्पिक हे ओंकारचं ध्येय आहे; पण त्याविषयीही तितक्याच सहजपणे तो सांगतो, ‘ऑलिम्पिकला तर जायचंय, पण माझं वय अजून बसत नाही ना! त्यासाठी 21 वर्षाच्या पुढे वय लागतंय. माझं वय बसलं की मी नक्की ऑलिम्पिकला जाईन!’
सध्या तरी मेहनत करणं, वस्ताद विजयकाका बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवे डाव शिकणं, कुस्तीत जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणं. याकडे ओंकारचं लक्ष आहे.
ओंकार सांगतो, आम्ही रोज पहाटे तीन वाजता उठतो. सातशे सपाटे, जोर-बैठका मारतो. हॉलच्या छताला टांगलेला दोर रोज सकाळ-संध्याकाळ किमान 50-60 वेळा हातानं चढतो. आमचं रोजचं टाइमटेबल ठरलेलं असतं, त्यामुळे रोज वेगवेगळे व्यायाम करतो, सोमवार, मंगळवार, गुरुवार संध्याकाळी आणि शुक्रवारी सकाळी मॅटवर कुस्तीचे डाव मारतो. सकाळी तीन-चार तास आणि संध्याकाळी दोन-तीन तास तरी आम्ही मेहनत घेतो. कुस्ती मारायची तर एवढं तर करायलाच पाहिजे ना? नाहीतर कशी मारणार कुस्ती?.
पुण्यात आल्यापासून ओंकार वर्ष-र्वष घरी गेलेला नाही. दिवाळीत दोन दिवस घरी जाऊन येतो तेवढंच. बाकी सगळं ध्येय कुस्ती.
ओंकारला विचारलं, इतक्या वर्षापासून तू घराबाहेर आहेस, मग घरची आठवण तुला येत नाही का?
ओंकारचं म्हणाला, ‘येते की आठवण. पण मेहनत करत असलो, की नाही येत. रविवारी मात्र येते आठवण. कारण रविवारी सुटी असते ना. आईची जास्त आठवण येते. पण मोबाइल असतो की. मग लावतो लगेच आईला फोन!..’
घरी फार जाता येत नाही; पण त्याहीपेक्षा शेतीचं फारसं काम आपल्याला येत नाही, याची ओंकारला खंत वाटते. त्याच्या घरचे सगळे जण शेतात राबतात. सगळ्यांना शेतीची कामं येतात. ओंकार सांगतो, ‘वर्षातून एकदा दोन दिवस मी घरी जातो; पण तेव्हाही मला कोणीच काहीच काम करू देत नाही. तू फक्त झोप. आराम कर म्हणतात. पुण्याला गेला की करतोसच एवढी मेहनत, इथे काहीच करू नको म्हणून मला अडवतात.’
पुण्यातल्या कुस्ती संकुलावर आणि तिथल्या आपल्या सोबत्यांवर ओंकारचं फार प्रेम आहे. घरचे जवळ नसले तरी ते घरच्यांपेक्षा कमी नाहीत. कोणीही आजारी पडलं, कोणाचं काही दुखलं-खुपलं की हे मित्रच घरच्यांपेक्षाही जास्त प्रेम देतात असा ओंकारचा अनुभव आहे.
राज्य आणि राष्ट्र पातळीवरील कुस्त्यांमध्ये ओंकारनं बरीच पदकं पटकावलेली आहेत. अंडर फिफ्टिन नॅशनलचं गोल्ड त्यानं घेतलं आहे. इराणमध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. त्याच्या यशाची कमान चढती आहे. कुस्ती आणि आर्मी या दोन गोष्टींनी सध्या तरी त्याचं आयुष्य व्यापलेलं आहे.