कुरुंदवाड ते कांस्य
By admin | Published: August 7, 2014 09:44 PM2014-08-07T21:44:07+5:302014-08-07T21:44:07+5:30
कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावरचं कुरुंदवाड हे गाव, एरवी महाराष्ट्रात तरी हे नाव कुणाला माहिती होतं?
Next
>कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावरचं कुरुंदवाड हे गाव, एरवी महाराष्ट्रात तरी हे नाव कुणाला माहिती होतं?
पण याच कुरुंदवाड गावचे गणेश, ओंकार आणि चंद्रकांत राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकून आली. तसं पाहता या गावातून तीन तीन मेडलविनर्स यावेत असं या गावात काय होतं? शहरी सुविधांचा तर नामोनिशान नव्हता, तरी ही मुलं जिंकली कारण गावच्या मातीत रुजलेली क्रीडा परंपरा. अणि या पोरांच्या गुणांवर जीवापाड मेहनत घेणारा एक जिद्द, चिकाटीचा गुरू. आणि त्यानं दाखवलेली एक नवीकोरी वाट.
ग्लासगो येथील यशामुळे आता या मुलांच्या मागे ग्लॅमर धावत येईलही पण त्यांना हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यामागे आहे, त्यांच्या प्रशिक्षकांचा तीन दशकांचा संघर्ष. वेटलिफ्टिंग हा काही ग्लॅमरस खेळ नाही. ग्रामीण भागात तसा लोकप्रियही नाही. या खेळासाठी प्रायोजक मिळणं तर फारच अवघड. अशा या खेळाला कुरुंदवाडसारख्या २५ हजार वस्तीच्या खेड्यात रुजविण्याचा प्रयत्न केला प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी आणि त्याला आज तीन दशकांनंतर यशाचं तोरण लागताना दिसत आहे.
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर नरसोबाच्या वाडीजवळील कुरुंदवाड हे गाव एकेकाळचं संस्थान. पूर्वीपासूनच गावात खेळाची परंपरा आहेच. खो-खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल हे खेळ ही तशी गावची ओळख. अनेक खेळाडू वेगवेगळय़ा खेळांत राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले. प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी अत्यंत चिकाटीनं या गावात हक्र्युलस जीम ही व्यायामशाळा १९७८ मध्ये सुरू केली. ठिबक सिंचनाचा व्यवसाय सांभाळत, जागेचा प्रश्न सोडवत ही व्यायामशाळा चालू राहील यासाठी कष्ट केले. काहींनी त्यांना वेड्यात काढले, काहींनी हेटाळणी केली. पण प्रदीप पाटील ठाम होते. वडिलांनी दिलेल्या जागेत त्यांनी मुलांच्या व्यायामाची सोय केली. इथंच वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण या तिन्ही मुलांनी इतरांबरोबर घेतलं. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खरी उतरेल अशी तयारी करणं सोपं नव्हतंच. ती त्यांनी केलीच, साई (स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशननं त्यांची निवड केली, पण त्यानंतरच प्रशिक्षण, राष्ट्रकुलसाठीची निवड.ही प्रत्येक पायरी एक संघर्षच होता. त्यात चकाचक वातावरणात, तयारीच्या खेळाडूंच्या गराड्यात आपलं मनोधैर्य टिकवून ठेवणं आणि कुठलाच दबाव न येऊ देता उत्तम कामगिरी करणं हे काही सोपं काम नव्हतंच.
या खेळाडूंचा त्याकाळात जेव्हा जेव्हा घरी, गावात, मित्रांना आणि प्रशिक्षकांना फोन यायचा, तेव्हा तेव्हा त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा तर प्रयत्न सगळ्यांनी केला. प्रशिक्षक पाटील यांनी तर त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना कडक ताकीदच दिली होती की त्यांना काळजी वाटेल, टेन्शन येईल अशी गावातली कुठलीच लहान-मोठी घटना त्यांना सांगायची नाही. त्या तिघांनाही ते सतत सांगत होते की, तुम्ही देशासाठी खेळता आहात, हिंमत ठेवा, खाली हात परत यायचं नाही.
ओंकार आणि चंद्रकांत तरी यापूर्वी आंतरराष्ट्रीय खेळात सहभागी झाले होते, पण गणेशची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. तसा प्रशिक्षक प्रदीप पाटील आणि त्यांच्या टीमला आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव होताच. त्यांनी वेटलिफ्टिंगच्या सरावाबरोबरच खेळाडूंना बाकीही गोष्टींचा अंदाज दिला होता. विदेशी खेळाडूंचे हावभाव, हालचाली, हातवारे यासह बॉडीलँग्वेजवर लक्ष कसं ठेवायचं हेही शिकवलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं वागायचं याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण या खेळाडूंना दिलं होतं. यासाठी प्रशिक्षक प्रदीप पाटील यांना इंटरनेटवरून घेतलेल्या माहितीचा फायदा झाला. कोलरॅडो प्रांतातील डेनव्हरचे डॉ. मेलकनिंग हॅम सीफ या रिसर्च सायंटिस्टचं मार्गदर्शन त्यांना मोलाचं ठरलं. डॉ. सीफ हे स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ. त्यांच्याशी प्रदीप पाटील यांचा २000 ते २00६ पर्यंत संपर्क होता. त्यांच्या निधनानंतरही इंटरनेटवरून त्यांनी या विषयाची माहिती मिळविली.
आपण जेमतेम तयारी करायचीच नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाचाच खेळ करायचा ही पाटील यांची धारणा होती. आज ना उद्या आपली मुलं पदक जिंकतील याची त्यांना खात्री होती. म्हणून गेली १२ वर्षे ते सतत फिटनेस कॅम्प आयोजित करतात. दरवर्षी १ मे रोजी कुरुंदवाडच्या साने गुरुजी विद्यालयात पहाटे राष्ट्रगीतानं या कॅम्पला सुरुवात होते. ३५ दिवसांच्या या कॅम्पमध्ये सराव, चाचणीशिवाय मनोर्धेर्य वाढवणं, खेळाडूंचं मानसशास्त्र, आहार याविषयी मार्गदर्शन तर होतंच परंतु व्यायामशाळेची नियमावलीही पाळावी लागायची.
व्यायामशाळेचे नियम कडक. व्यायामशाळेच्या आवारातच नव्हे तर कुठेही सायकलवर डबलसीट, मोटरसायकलवर ट्रिपल सीट दिसायचं नाही. अन्यथा तिथल्या तिथे सराव बंद केला जायचा. परीक्षा तर अभ्यास करून द्यायच्याच, पण कोणी कॉपी करायची नाही. नापास विद्यार्थ्यांना व्यायामशाळेतला प्रवेश रद्द केला जायचा, तो परीक्षा पास होईपर्यंत. विजय माळी, विश्वनाथ माळी, रवींद्र चव्हाण आणि स्वत: प्रदीप पाटील या प्रशिक्षकांच्या आ™ोत रहायचं.
कडक नियमावलीसोबत या खेळाडूंना आईवडील देणार नाहीत अशी मायाही हे प्रशिक्षक द्यायचे. या व्यायामशाळेत वयाच्या दहाव्या वर्षापासूनचे विद्यार्थी खेळाडू म्हणून तयार करायचे धोरण आहे. त्यामुळे त्यांचे खाणंपिणं, त्यांचा वाढदिवस, त्यांचे कोडकौतुक सारं इथंच व्हायचं. प्रदीप पाटील यांच्या पत्नी संगीता याही खेळाडूंची आईच्या मायेनं काळजी घेत.
खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचं भोजन दिलं जातं. सध्या या शाळेत ४0 लहान-मोठी मुलं व्यायाम करतात. सर्वच जण कुरुंदवाड परिसरातील आहेत. पण म्हटलं तर हा काही नुस्ते खेळाडू तयार करण्याचा कारखाना नाही. उत्तम खेळाडू आणि उत्तम नागरिक बनण्याचं प्रशिक्षण इथं दिलं जातं. अरुण आलासे, सुनील सुतार, डॉ. शरद आलासे, डॉ. आशुतोष तराळ, संगीता पाटील ही हक्यरुलसची टीम खेळाडू घडविण्यासाठी झटते आहे.
प्रदीप पाटील म्हणतात, ‘वेटलिफ्टिंग हा लाँगटर्म खेळ आहे. खेळताना शरीर थकतं, पण मन थकू देऊ नये हेच मी मुलांना सांगतो. मन ताजंतवानं असलं तर ते कठीण परिस्थितीतही आपल्याला यश मिळवून देतं. निव्वळ नशिबाच्या जोरावर यश मिळत नाही, त्यासाठी मन आणि शरीराचे कष्ट अटळ आहेत.’
या अशा अपार अटळ कष्टाच्या जोरावरच आज कुरुंदवाडच्या तीन मुलांनी भारतासाठी राष्ट्रकुल पदक जिंकून आणलंय.