नियमांचं भान कायद्याची शिस्त

By admin | Published: January 26, 2017 01:43 AM2017-01-26T01:43:20+5:302017-01-26T01:43:20+5:30

जगभरातल्या अनेक देशांतल्या शिस्तीचे, स्वच्छतेचे, नियम पाळण्याचे किस्से आपण ऐकत असतो. ते देश फार ‘डेव्हलप’ आहेत म्हणतो

Law discipline | नियमांचं भान कायद्याची शिस्त

नियमांचं भान कायद्याची शिस्त

Next

जगभरातल्या अनेक देशांतल्या शिस्तीचे, स्वच्छतेचे, नियम पाळण्याचे किस्से आपण ऐकत असतो. ते देश फार ‘डेव्हलप’ आहेत म्हणतो. तिथं जाऊन येणारे तर दमून जातात विदेशी गुणगान करून. असं काय वेगळं असतं तिथे?

वेगळं असतं ते त्या देशातल्या लोकांचं वर्तन. त्यांचं कायदेपालन. त्यांची शिस्त. त्यांचं आपल्या देशानं ठरवलेल्या नियमांवरचं आणि आपल्या समाजातल्या सुव्यवस्थेवरचं प्रेम.
त्यातलीच ही काही वानगीदाखल उदाहरणं...


जपान
एकदा एक भारतीय गृहस्थ टोकियोमध्ये कामनिमित्त राहायला गेले. जपानमध्ये भारतासारख्याच रस्त्याच्या डाव्या बाजूने गाड्या चालवतात. या गृहस्थांचं घर होतं ते एक खूप मोठा ट्रॅफिक सिग्नल ओलांडून गेल्यानंतर उजव्या बाजूच्या एका छोट्या गल्लीत. टोकियो हे मुंबईसारखंच प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिकचं शहर आहे. घर पहिल्यानंतर या गृहस्थांना काळजी वाटू लागली की संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सगळा ट्रॅफिक ओलांडून उजवीकडच्या गल्लीत जाणार कसं?

पण काहीच दिवसांत त्यांच्या असं लक्षात आलं, की त्यांची भीती निराधार आहे. कारण कितीही ट्रॅफिक असेल, तरी त्या गल्लीत जाण्याचा रस्ता समोरून येणाऱ्या या गाड्यांना कायमच मोकळा ठेवलेला असायचा. इतकी छोटीशी गोष्ट. पण प्रत्येक गाडीवाल्याने ती पाळल्यामुळे या गृहस्थांना पुढे जाऊन वळून यायचा त्रास वाचला, तेवढं इंधन वाचलं, ट्रॅफिक जामची कटकट वाचली. आणि जपानबद्दल एक अत्यंत सकारात्मक भावना मनात घेऊन हे गृहस्थ परत आले. 
तेच जपानच्या शिस्तीचंही. टोकियो मेट्रोत अत्यंत रश अवरमध्येही लोक रांगेनं प्लॅटफॉर्मवर उभे असतात. गाडी थांबल्यावर रांगेनं गाडीत चढतात. धक्काबुक्की करत नाहीत.
हे त्यांना कसं जमतं? प्रचंड गर्दीतही?

फिनलॅण्ड
हा थंडीचा आणि खूप बर्फ पडणारा अति उत्तरेकडचा एक देश. आजूबाजूला बर्फाचा ढीग साचलेला असताना, तपमान शून्य अंशाखाली गेलेलं असताना, बोचरं वारं सुटलेलं असताना एक माणूस ९ च्या आॅफिसला ८:४५ ला पोचतो. साहजिकच गाडी पार्क करण्याची जागा पूर्ण रिकामी असते. अशावेळी हा माणूस त्याची गाडी कुठे लावेल? तर हा फिनिश माणूस ती शक्य तितक्या लांब लावेल आणि त्या थंडीतून आॅफिसच्या बिल्डिंगपर्यंत चालत जाईल. का? तर त्याच्या हातात तेवढा वेळ आहे. जो माणूस उशिरा येतो त्याला बिल्डिंगच्या जवळची जागा पार्किंगसाठी ठेवली पहिजे. कारण त्याच्या हातात तेवढा वेळ नसतो. अशाने दोन्ही माणसं त्यांचा कामाचा वेळ पूर्ण वापरू शकतात असा विचार ते करतात. आपल्या कामाची पूर्णवेळ कामासाठीच वापरणं, काम उत्तम करणं, इतरांना करू देणं हे राष्ट्रकार्यच आहे, नाही का?

न्यूझीलण्ड
न्यूझीलंडमध्ये ट्रॅफिकचा नियम तोडला तर होणारा दंड हा जवळजवळ आॅस्टे्रलिया ते न्यूझीलंड विमानाच्या तिकिटाएवढा असू शकतो. कोण तोडेल ट्रॅफिकचे नियम इथं? दंड फार म्हणून लोक ट्रॅफिक नियम पाळतात हे खरंच, पण सवयीनंही पाळतात हे तितकंच महत्त्वाचं.


स्वीडन

एक स्वीडिश महिला पोलीस अधिकारी (मिकाइला केलनर) स्टॉकहोम शहरातल्या एका बागेत मैत्रिणींसह सुटीचा आनंद घेत होती. त्या सगळ्या जणी फक्त बिकिनी घालून ऊन खात पहुडल्या होत्या. त्यावेळी तिथे एक माणूस आला आणि मासिकं विकायच्या बहाण्यानं त्यांच्यापैकी एकीचा फोन चोरून तो पळाला. हे लक्षात आल्यावर मिकाइला केलनर त्याच्यामागे धावली. त्याला पकडलं, त्याला खाली पाडलं, अटक केली आणि फोन परत मिळवला. या घटनेचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर टाकला आणि तो व्हायरल झाला. 

हे वाचताना असं वाटतं, की त्यात काय एवढं? असे कर्तव्यदक्ष अधिकारी काय भारतात नाहीत की काय? तर ते आहेतच. खरोखर आहेत. पण इथे त्या अधिकाऱ्याइतकंच कौतुक तिथल्या जनतेचं आहे. कारण त्या फोटोवर चर्चा झाली ती फक्त तिने केलेल्या कामाची. तिने घातलेल्या बिकिनीवर लोकांनी चर्चा केली नाही. तिने असे कपडे का घातले होते म्हणून तिला कोणी जाब विचारला नाही. कमी कपडे घातले तर असं होणारच याची अक्कल शिकवली नाही. 

नागरिकांच्या वृत्तीतला मोठा फरक आहे तो हा की तिने आणि इतर नागरिकांनीही तिच्याकडे केवळ एक अधिकारी म्हणून पाहिलं, स्त्री म्हणून नाही. 

Web Title: Law discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.