..तरी शिकलेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:24 PM2018-01-24T15:24:04+5:302018-01-24T15:26:53+5:30

फार्मसी करणारी गावातली मी पहिलीच मुलगी. आता गावातल्या आयाबाया म्हणतात आमच्या लेकींनातुझ्यासारखंच शिकवणार.. 

Learn it! | ..तरी शिकलेच!

..तरी शिकलेच!

Next

अनन्या अमोल केमधरणे (तावरे)
(औरंगाबाद)

पिंपळगाव (लिंगी) ता.वाशी, जि.उस्मानाबाद हे माझं गाव. सातवी पर्यंत हसत-खेळत शिकले. मी घरात मोठी, माझ्यापेक्षा छोटी बहीण आणि एक भाऊ. आठवीला मामाच्या गावाला शिकायला जायचं ठरलं. माझ्या आईचे तेव्हाच अपेंडिक्स चे आॅपरेशन झाले. आॅपरेशन करायला उशिर झाला होता म्हणून ती खूपच सिरियस झाली होती. पण त्या संकटातून देवदयेनं वाचली. डॉक्टरांनी तिला दगदग न करता जमेल तेवढंच काम करा असं सांगितलं. तरीही वडिलांनी मला मामाच्या गावी शिकायला पाठवलं. दहावीला ७० टक्केच मार्क पडले.
अकरावीला मला विज्ञान शाखेला कर्मवीर मामासाहेब जगदाळे या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सकाळी ७ वाजता बस असायची आणि दहा वाजता कॉलेज. हा ३ तास रिकामा वेळ मी कॉलेजच्या आवारात बसून काढत असे. ३ वाजता कॉलेज संपल्यानंतर दीड किलो मीटर चालत बस स्टँण्डवर पोहचत असे पण तोपर्यंत बस कधी गेलेली असायची तर कधी असायची. महत्वाची वर्ष होती पण माझा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ जाण्या-येण्यातच जायचा. ट्युशन लावण्र मला परवडणारं पण नव्हतं. बारावीही पास झाले.
यानंतर काय करावं, कुठं करावं? हे सगळे प्रश्न उभे राहिले. माझ्या वडिलांच्या मित्रांनी फार्मसी करण्याबद्दल सुचवले. फार्मसी म्हणजे काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण वडील म्हणतात वडील तर करुन पाहू अस म्हणत फार्मसी इन्स्टिट्यूट उस्मानाबादला प्रवेश घेतला. पण वडिलांना चिंता होती. एकटी मुलगी ना हॉस्टेलची सोय, ना कोणी ओळखीचे, खाण्याची काय सोय? कस ठेवावं? पण मी इथंच राहून कॉलेज पूर्ण करण्याचं ठरवलं. परिस्थिती नसतांना तीन हजार रुपये मला माझे वडील देत असत. फार्मसीची पुस्तके मी विकत घेऊ शकत नव्हते म्हणून मी कॉलेजची पुस्तकं झेरॉक्स करुन वाचत होते. कॉलेजमध्ये छान कपडे, मेकअप करुन गाडीवर आलेल्या मुली पाहून मी हरवून जायचे. या स्मार्टपुढे आपला कसा निभाव लागणार कळत नव्हतं. सुरुवातीला खूपच एकटं वाटत होतं. पण हळूहळू माझा एकटेपणा संपला, मैत्रीणी जमल्या. प्रत्येक मैत्रिणीकडून मला काही ना काही शिकायला मिळायच. त्यांच्यासोबत राहून माझी खेड्यातली भाषा बदलली, माझ्यात आत्मविश्वास आला. मग कॉलेजमध्ये गॅदरींग असो, किंवा कोणताही कार्यक्रम असो सुत्रसंचालन मीच करत असे.
आई-वडिलांचे अपार कष्ट, परिस्थिती नसताना मला शिकवण्यांची धडपड, मामाचं पाठबळ, मैत्रीणींचा सल्ला आणि शिक्षकांची शिकवण मी कधीच विसरले नाही. फार्मसी पुर्ण झालं. माझ्या गावातील माणसं माझ्याकडे कौतुकाने पाहत. कारण गावातील शिक्षण पूर्ण केलेली पहिली मुलगी मी होते. गावातील प्रत्येक आई माझ्याकडे पाहून म्हणायची माझ्या मुलीला पण तुझ्यासारखंच शिकायचं आहे. मी खूप शिकले नव्हते. तरी सुद्धा त्यांना खूप कौतुक वाटायचं. आता माझं लग्न झालंय, माझे पती डॉक्टर आहेत. मी स्वत:चे मेडीकल स्टोअर सुरु केलं आहे. घर, सासु-सासरे, आणि दीड वर्षाची मुलगी सांभाळून काम जोमानं उभं करतेय.आता फक्त मला एक आदर्श फार्मासिस्ट बनायचं आहे...
 

Web Title: Learn it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.