शिकले तेवढी शिकले, आता कशाला कॉलेज?
By Admin | Published: November 19, 2015 09:55 PM2015-11-19T21:55:15+5:302015-11-19T21:55:15+5:30
दुष्काळी भागात केवढय़ा विवंचना. त्यात पहिली काट बसते ती लेकीबाळींच्या शिक्षणावर. पण त्यातही चांगलं हे की, दुष्काळात होरपळणा:या वडिलांना आता वाटतंय की
- मयूर देवकर
(मयूर ‘लोकमत’च्या औरंगाबाद आवृत्तीत वार्ताहर आहे.)
दुष्काळी भागात केवढय़ा विवंचना.
त्यात पहिली काट बसते
ती लेकीबाळींच्या शिक्षणावर.
पण त्यातही चांगलं हे की,
दुष्काळात होरपळणा:या
वडिलांना आता वाटतंय की,
मुलीचं शिक्षण थांबू नये.
पण वडिलांची वणवण पाहून
लेकच म्हणते,
बाबा नको आता कॉलेज.
मी बरीये घरीच!
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’
‘लाडकी लेक , लाखात एक’
कोणत्याही गावाच्या ग्रामपंचायत किंवा शाळेच्या भिंतीवर अशी सुभाषिते लिहिलेली असतात. पण हे खरं आहे का?
खरंच लाडक्या लेकीला शिकवून प्रगती करता येते का?
- दुष्काळी शेतकरी आईबाबाला असा एक प्रश्न गेले काही दिवस छळतोय.
मागच्या महिन्यात एका शाळकरी मुलीने वडिलांकडे बसच्या पासचे पैसे नाही म्हणून आत्महत्त्या केली. काय म्हणावे याला? शिक्षणाची एवढी ओढ, की तिने इतक्या टोकाचा निर्णय घ्यावा?
ही घटना मराठवाडय़ातील. आधीच दुष्काळाने पुरत्या होरपळून गेलेल्या मराठवाडय़ात शेतकरी कर्जाच्या ओङयाखाली दबून आत्महत्त्या करत आहेत. अशा धीर गमावून बसलेल्या बापाने बसच्या पासचे पैसे न दिल्यामुळे पोटच्या पोरीनं असं काही केलं तर काय, असा प्रश्न इथं अनेक आईबापांचं काळजी फाडतोय!
अशा हादरलेल्या काही असहाय्य आईबापाशी, दुष्काळग्रस्त माणसांच्या मुलींशी बोललो तर जे कळलं त्यानं अस्वस्थ होणं या घासून गुळगुळीत झालेल्या शब्दाचे अर्थच बदलतात.
एक नक्की की, आपल्या मुलींनी शिकावं असं आता अनेक अडाणी आईबापाला पण वाटतं. त्यासाठी ते पोटाला टाचे देतात. पण देऊन देऊन किती देतील? जिथं खायचे वांधे तिथं पुस्तकांचे लाड कोण करणार?
आणि दुसरं म्हणजे लेकीबाळींची काळजी, त्यांची सुरक्षितता. लांब एस्टीनं पोरीला शाळाकॉलेजात घालायचं ते कुणाच्या भरवशावर? - या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं.
हेंड पोरांचा त्रस
खेडय़ापाडय़ांमध्ये फार फार तर दहावीर्पयत शाळा असते. पुढचं महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं तर घरापासून दूर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं. प्रश्न येतो तो इथंच. वयात आलेली मुलगी शहरात पाठविण्यासाठी अनेक पालकांचा नकार असतो. शहरात गेल्यावर मुलंमुली वाया जातात असा सर्वसाधारण समज असतो. त्यात छेडछाडीच्या घटना, प्रेमप्रकरणं यामुळेही पालक मुलींना घरीच बसवतात. मुख्यत: बसने येताजाताना जो त्रस होतो त्यामुळे मुलींच्या वाटा बंद होणं वाढतं. एक मुलगी सांगते, ‘माङया मैत्रिणीला एक मुलगा बसमध्ये नेहमी त्रस द्यायचा. गावापासून ते कॉलेजर्पयत तो तिच्या मागावरच असायचा. सुरुवातील तिने दुर्लक्ष केले, पण मग तिने घरी सांगितले. आम्हाला वाटले आता तिच्या घरचे त्या मुलाला समज देतील, त्याच्या घरी सांगतील; मात्र त्या मुलीच्या घरच्यांनी तिचे कॉलेजच बंद केले. त्यांचं म्हणणं होतं की, मुलगीच बाहेर पडली नाही तर तो मुलगा त्रस कसा देईल.’
घर आणि कॉलेज जरी सुरक्षित असले तरी गावापासून करावा लागणारा हा प्रवास हेच एक मोठं दिव्य असतं असं अनेक मुली सांगतात. एक तर गावातून फार कमी वाहनं असतात. स्टॉपवर वाट पाहावी लागते. जी मिळेल ती गाडी पकडावी लागते. याचाच ही मुलं गैरफायदा घेतात. चिठ्ठय़ा देणो, लगट करणो, धमक्या देणो असे प्रकार केले जातात. या बाबतीत घरी सांगितले तर कॉलेज बंद होईल म्हणून अनेक मुली असे प्रकार निमुटपणो सहन करतात. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर तर होतोच; परंतु सतत भीतीखाली वावरल्याने एक प्रकारचा मानसिक ताणही त्यांच्यावर असतो.
अनेक पालकांनीसुद्धा हीच चिंता बोलून दाखविली. ते म्हणतात, ‘मुलीसोबत जर काही बरं-वाईट झालं तर आम्ही कोणाला तोंड दाखवायचं? त्यापेक्षा घरात बसून घरकाम शिकली तरी आमच्यासाठी खूप झालं. पोरं सगळी हेंड झाली आहेत. आपण त्यांच्यासमोर जायचं नाही.’
दुष्काळात लेकीबाळींची आबाळ
मागच्या लगातार तीन वर्षापासून मराठवाडय़ाला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. कर्ज आणि नापिकीमुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. जिथे दोन घासाची आबाळ आहे तिथे पोरीच्या शिक्षणासाठी पैका कुठून देणार, असे ते म्हणतात. उच्च शिक्षण घ्यायचे तर शहरातील कॉलेजात जावे लागते. त्यासाठी मग राहण्याचा, खाण्याचा खर्च, कॉलेजची फी असा सगळा भार उचलण्यासाठी ग्रामीण भागातील पालक तयार नाहीत. मुली मुळातच संवेदनशील असतात. घरच्यांना होणा:या ओढाताणीची त्यांना पूर्वकल्पना असते. त्यामुळे बाहेर राहत असताना मेसच्या एकाच डब्यात तीन-चार जणी खातात. ब:याच मुली वडिलांना अधिक भार नको म्हणून स्वत:हून शिक्षण सोडतात. वाईट या गोष्टीचे वाटते की त्यांच्या या त्यागाची कोणीच दखल घेत नाही.
सायन्सला अॅडमिशन घेतले तर खर्च वाढेल म्हणून अनेक मुली दहावीला चांगले गुण असूनही कला शाखेला प्रवेश घेतात. आर्ट्सला कॉलेजमध्ये रेग्युलर यावे लागत नाही म्हणूनही मुली हा पर्याय निवडतात. घरच्यांना मदत म्हणून मुलींना शेतमजुरीलाही जावे लागते. बीड जिल्ह्यामध्ये तर ही परिस्थिती आणखी भयावह आहे. इथल्या मुली ऊसतोडीलासुद्धा जातात. त्यामुळे महिनोन्महिने कॉलेजला खंड पडतो.
पण तरी वाटतं, पोरीनं शिकावं!
या सगळ्या गोष्टी जरी ख:या असल्या, तरी एक बदल फार महत्त्वाचा. घरोघरी पालकांना वाटतं की आपल्या मुलींनी शिक्षण घ्यावं. सुरक्षा आणि पैशाची समस्या सोडली तर लोकांचा मुलींच्या शिक्षणाला खास असा विरोध नाही. हे फार आशादायी चित्र आहे. आधी तर लोक मुलींना शाळेतच पाठवत नसत. आता मात्र सामान्यपणो दहावी-बारावीर्पयत मुली शिकतात. याचाच अर्थ की, जर या प्रश्नावर नीट विचार करून उपाय केले तर मुलींच्या उच्च शिक्षणाची समस्या मोठय़ा प्रमाणावर सुटेल. याबाबत अंबडच्या मत्स्योदरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. भागवत कटारे म्हणतात की, मुलींमध्ये उपजतच एक प्रतिभा असते. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळायलाच हवी. त्यासाठी कॉलेजनेदेखील स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक पालकाला विश्वास दिला पाहिजे की मुलींच्या सुरक्षेची आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ. प्रसंगी त्यांना आर्थिक मदतही केली जावी. म्हणूनच तर जालनासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून अंबडला मुली शिकायला येतात.
दुष्काळानं छळलेला बापही म्हणू लागलाय की, पोरीनं शिकावं, नोकरीबिकरी पाहावी, तिच्या नशिबी ही रानावनातली वणवण नको.
वाईट एवढंच की, इच्छा असूनही नसलेल्या पैशापायी त्यांची लेक शाळा सोडून घरच बरं म्हणू लागलीये.
नोकरीवाल्या शिकेल
नव:याची किंमत काय?
मुलींना अधिक शिकू न देण्याचं आणखी एक कारण म्हणजे हुंडा!
मुलगी जास्त शिकली तर तिला जास्त शिकलेलाच नवरा लागतो. जास्त शिकलेला मुलगा म्हणजे तो जास्तीचा हुंडासुद्धा घेणार, असा विचार मुलीच्या बापाच्या डोक्यात सुरूअसतात. आणि ते खरंही आहे. शिकलेली तरुण मुलं हुंडा नको असं म्हणत नाहीत, तर आपल्या शिक्षणाची किंमत मुलीच्या वडिलांकडून वसूल करतात. त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर गदा येते हे शिकल्यासवरल्या तरुण मुलांना कळत नाही, त्याला जबाबदार कोण?