शिकलोही शिकवलंही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:00 AM2018-04-12T10:00:51+5:302018-04-12T10:00:51+5:30
डॉक्टर व्हायचं ठरवलं, शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मग ठरवून शाळा काढली गावात..
- रवींद्र दयाराम निकम
माझं प्राथमिक शिक्षण जालना जिल्ह्यातल्या कंडारी (काकडे) या गावी झालं. माध्यमिक शिक्षण घ्यायला मी भडगाव तालुक्यातल्या कजगावला गेलो. दहावी पास झाल्यावर पुढं काय करायचं हे ठरवायला काही मार्ग नव्हता. कुणी माहिती द्यायलाही नव्हतं. वर्गमित्र डॉक्टरच्या कोर्सला जायचं म्हणाले म्हणून मीही निघालो. डी.एच.एम.एस. करायला गेलो. १९८४ सालची ही गोष्ट. फार जुनी; पण सांगावी वाटली म्हणून सांगतोय. शिक्षण झाल्यावर त्या काळी मी पारोळा तालुक्यातील करमाड या दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावी दवाखाना सुरू केला. बोरी धरणाच्या बॅक वॉटरनं करमाड खुर्द व करमाड बुद्रूक हीे दोन्ही गावं पावसाळ्यात पाण्यानं वेढलेली असायची. मलेरिया, कावीळ, टायफाइड, कॉलरा यांसारख्या आजारांनी अनेक लोक त्रस्त असत. गरिबीमुळे बहुसंख्य लोक इंजेक्शन तर उधार घेत, परंतु औषधं मात्र विकत घेणं त्यांना शक्य नसायचं. पैसे नाहीत म्हणून एकाही रुग्णाला मी उपचाराविना परत पाठवलं नाही. हे तत्त्व तेवढं जपलं.
डॉक्टरकी करताना एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हावं असंही वाटायचं. बारावी आर्ट्सचा १७ नंबर फॉर्म भरून दिला आणि बाहेरून बी.ए. केलं. एम.ए. केलं. एमपीएससीची पूर्वपरीक्षा पास झालो; पण मुख्य परीक्षेत यशस्वी झालो नाही. या दरम्यान एक गोष्ट जाणवायला लागली होती. माझी आजी, आई, माझी पत्नी या तांदुळवाडी गावच्याच. आमच्या गावात हायस्कूल नसल्यामुळे पालक मुलींना जेमतेम चौथी किंवा सातवीपर्यंत शिकवत. माझ्या आई आणि पत्नीच्या बाबतीत तेच घडलं होतं. मुलींना शिकण्याची सोय नव्हती. पालक लहान वयातच मुलींचं लग्न करून टाकत.
मग मी ठरवलं आपणच गावात हायस्कूल सुरू करायचं. शाळेला मान्यताही मिळाली, पण शिक्षक मिळेनात. छोट्याशा गावात शाळा चालेल की नाही, शासन अनुदान देईल की नाही, असे प्रश्न होतेच. त्यात गावात शिक्षक टिकेनात. मग मी स्वत: बी.एड. केलं आणि शिक्षकी पेशा स्वीकारला. आज माझी शाळा प्रगतिपथावर आहे. रोज नवीन गोष्टी शिकतो आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शालेय व्यवस्थापन पदविका २००५ साली पास झालो. शाळेचे लिपिकही कॉम्प्युटर शिकले. २००६ सालापासून शाळेचं कामकाज संगणकावर चालू आहे. आज माझी ही शाळा डिजिटल झाली आहे. शाळा सुरू करण्याचा एकमेव उद्देश गावातील मुली शिकाव्यात हा होता. तो सफल झाला.
(तांदुळवाडी, ता. भडगाव, जि. जळगाव)