इंग्रजी शिकतोय! त्यात काय?
By admin | Published: September 30, 2016 10:29 AM2016-09-30T10:29:33+5:302016-09-30T10:29:33+5:30
नौकानयन स्पर्धेत त्यानं आॅलिम्पिक गाजवलं. तळेगाव रोही या गावापासून सुरू झालेला हा प्रवास आता टोकिओच्या दिशेनं निघालाय. त्याला विचारलं की, या प्रवासात अडलं कुठं? तो म्हणतो, इंग्रजीपाशी! का? कसं?
Next
- दत्तू भोकनळ.
लोक विचारतात, आॅलिम्पिकला जाऊन काय कमावलं? काय आला अनुभव?
मी विचार करतो तेव्हा तळेगाव रोही ते ब्राझील असा प्रवासच येतो डोळ्यासमोर!
देशाच्याच काय, कधी राज्याबाहेर जाण्याचा योग आला नव्हता. आणि एक दिवस हा खेळ थेट परदेशीच घेऊन गेला. आणि आॅलिम्पिकसाठी तर विदेशात जाऊन दीड-दोन महिने राहावं लागलं. हे सारं आपल्या आयुष्यात घडेल असं कधी वाटलंही नव्हतं, स्वप्नातसुद्धा शक्य नव्हतं.
पण एकदा-दोनदा नाही तर तीनदा, तीन वेगवेगळ्या देशात जाऊन राहण्याची संधी मिळाली. तिथले लोक, त्यांची भाषा, वेशभूषा, राहणीमान, संस्कृती हे सगळं थक्क करणारं होतं. मी चकित झालो ते सारं पाहून. सारंच नवीन होतं. माझा खेळ, त्याचं प्रशिक्षण मला एक नवीन जग दाखवत होतं.
आणि त्यातून लक्षात येत होत्या काही अडचणी. काही मर्यादा. सगळ्यात पहिली अडचण होती ती अर्थातच ‘भाषे’ची! कामापुरतं हातवारे, खाणाखुणा करून आणि कामापुरतं तोडकंमोडकं इंग्रजी वापरून मी काम भागवलं. जमलं सारं, अडलं नाही कुठं काहीच.
मात्र या साऱ्या काळात एक गोष्ट लक्षात आली की, आपल्याला उत्तम इंग्रजी बोलता यायला हवं. ते आलं तर आपण अजून उत्तम संवाद साधू शकू. जास्त चांगलं समजून घेऊ शकू इतरांना. म्हणून आता ठरवलंय की, पुढचं लक्ष्य एकच. २०२० टोकियो आॅलिम्पिक. आणि उत्तम, फर्डं इंग्रजी बोलणं. आणि त्या दिशेनं मी वाटचाल करतो आहे...
***
दत्तू सांगत असतो आपला अनुभव आणि आपलं पुढचं लक्ष्य. आॅलिम्पिकनंतरचे सत्कार-समारंभ आटोपले. आणि त्यानंतर सहज गप्पा मारायच्या म्हणून दत्तूची भेट घेतली. आपला सारा प्रवास उलगडत दत्तू बदललेल्या जगण्याची कहाणीच सांगत होता.
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावात दत्तूचं बालपण गेलं. दहावीच्या उंबरठ्यावर असताना वडिलांचं निधन झाल्यानं आठवीतच त्याला शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. लहान वयात कर्तेपणाची जबाबदारी आली. धडधाकट शरीरयष्टी, उंची एवढं मात्र त्याच्याकडे होतं. कसंबसं त्यानं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यात तो यशस्वी झाला अन् पहिल्याच प्रयत्नात २०१२ मध्ये बीड येथे झालेल्या सैन्य भरतीत पात्रही ठरला.
पुणे बटालियनमध्ये हवालदार म्हणून तो काम करत होता. खेळाची आवड होतीच. लष्करी दिनक्रमाचा भाग म्हणून तो बास्केटबॉल खेळत असे. मात्र दत्तूची उंची आणि धडधाकट शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केलं. खरं तर दुष्काळी भागातल्या दत्तूला नौकानयन खेळाबद्दल काहीही माहिती नव्हती, पण तो शिकला. आॅलिम्पिकपात्र ठरला. ही इथवरची कहाणी तशी त्यानं आजवर बरेचदा सांगितली आता.
पण तो सांगतो की, २०१४ मध्ये त्यानं पुण्यात झालेल्या राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पुढे तो हैदराबादला गेला. राज्याबाहेर पडण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. आशिया खंडात असलेल्या सर्व देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू एकमेकांशी गप्पा मारत होते. दत्तू मात्र शांतपणे एका बाजूला बसला होता. कुणाशी बोलायचं तर हाताशी मोडकीतोडकी इंग्रजी आणि खाणाखुणा एवढंच. पण तरी बऱ्याचदा हिंदीवर काम भागत होतं. मात्र दत्तू म्हणतो, ‘त्यावेळी पहिल्यांदा वाटलं की आपल्याला इंग्रजी बोलता यायला हवं.’
या स्पर्धेनंतर त्याला २०१५ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी जावे लागले. पहिलीच विदेशवारी असल्यानं दडपण आलं होतंच. खेळाबरोबरच तेथील लोकांमध्ये मिसळण्याचे, त्यांच्याशी जुळवून घेण्याचे त्याच्यासमोर आव्हान होते. हैदराबाद स्पर्धेचा अनुभव बघता दत्तू इंग्रजी भाषेप्रती सजग झाला होता. कॅम्पमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या इंग्रजी भाषेचा तो अभ्यास करीत असे. किमान दैनंदिन वापरासाठी तरी इंग्रजी शिकायची या विचारानं तो दैनंदिन वापरात इंग्रजी शब्दांचा आवर्जून वापर करीत असे. मोडकी-तोडकी का होईना मात्र इंग्रजी जमायला लागल्याने त्याचा आत्मविश्वासदेखील वाढला होता. त्यामुळे त्याला खेळावर लक्ष केंद्रित करणंही शक्य झालं. या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावत आॅलिम्पिकच्या दिशेने मुसंडी मारली. पुढे दक्षिण कोरियातील इनचॉन येथे आयोजित केलेल्या स्पर्धेतही आॅलिम्पिक पात्रता कमावली.
दत्तूला एकापाठोपाठ मिळत असलेल्या या यशाचा त्याला जेवढा आनंद होत होता, तेवढीच त्याला पुढील आव्हानांची चिंताही वाटत होती.
तो सांगतो, ‘अमेरिकेत सरावासाठी अडीच महिने राहायचं होतं. स्पर्धेसाठी विदेशात आठ-दहा दिवस जाणं वेगळं अन् अडीच महिने राहणं वेगळं! म्हणून मग नौकानयन सरावाबरोबरच इंग्रजी भाषेचाही सराव सुरू केला. इंग्रजी बोलायचो, मित्रांशीही इंग्रजीच बोलत राहायचो. चुकायचो. पण शिकायचो. छोट्या खेड्यात दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं, आणि पुढे हा सारा इंटरनॅशनल मामला वाट्याला आला. अवघड होतंच, पण जमलं. जमतंय मला हळूहळू. आता जिद्द आहेच, तर भाषाही शिकू!’
ही जिद्द होती म्हणूनच दत्तू अमेरिकेत पटकन रुळला. तेथील वातावरणाशी जुळवून घेत असताना बोलीभाषादेखील अवगत करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याला त्याच्या प्रशिक्षकाने बरीचशी मदत केली. फिजिकल फिटनेसच्या कारणास्तव त्याला सरावाच्या ठिकाणावरून फारसे बाहेर पडता येत नसे. मात्र जेव्हा-केव्हा एखाद्याशी इंग्रजीत संवाद साधण्याची वेळ आली तेव्हा त्याने परिस्थिती हाताळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
अडीच महिन्यांच्या काळात अमेरिकेतील बराचसा अनुभव पाठीशी घेऊन तो परतला. आता त्याला खेळाच्या महाकुंभमेळ्यात म्हणजेच रिओ आॅलिम्पिकमध्ये स्वत:ला सर्वच पातळ्यांवर सिद्ध करायचे होते. फाडफाड इंग्रजी जरी बोलता येत नसली तरी विदेशी वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचे तंत्र त्याने चांगलेच अवगत केले. आपल्या प्रतिस्पर्धी विदेशी खेळाडूबरोबर संवाद साधण्याचा त्याच्यात आत्मविश्वास आला होता. कदाचित याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला. ज्या रोर्इंग प्रकारात भारत नेहमीच १७ किंवा १८ व्या रॅँकिंगमध्ये असायचा त्या रोर्इंगमध्ये दत्तूने भारताला १२ वी रॅँकिंग मिळवून दिली.
याविषयी दत्तू म्हणतो की, ‘भाषा येत नाही म्हणून अडत काही नाही, पण ती भाषा आली तर आत्मविश्वास वाढतो. इतरांशी बोलता येतं. आपण त्या जगाचा भाग होतो. आपला खेळ जो आत्मविश्वास देतो, त्या कामगिरीला अजून बळकटी येते. त्यामुळे आत्मविश्वास आणि मेहनत महत्त्वाचीच. पण त्यासोबत इतर गोष्टीही आवर्जून शिकून घ्यायला हव्यात.’
दत्तूची हीच जिद्द त्याला वेगानं टोकिओ आॅलिम्पिकच्या दिशेनं नेते आहे.. यश त्याची वाट पाहत असावं तिथे!
- सतीश डोंगरे
( लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)
satishdongare04@gmail.com