‘गीर’चे सिंह
By admin | Published: March 10, 2017 12:52 PM2017-03-10T12:52:21+5:302017-03-10T12:52:21+5:30
भारतात सिंह दिसतात अशी एकमेव जागा आता कच्छच्या रणाच्या जवळ गुजरात राज्यामध्ये आहे.
Next
>प्रज्ञा शिदोरे
तुम्ही गीरला गेला आहात?
गीर कुठे आहे माहिती आहे? किंवा ते कशासाठी प्रसिद्ध आहे माहितीये? आपलं भूगोलाचं पुस्तक उघडून पाहा? चौथी, पाचवीचं. त्यामध्ये आहे ना लिहिलेलं की, गीर हे सिहांसाठी प्रसिद्ध आहे. भारतात सिंह दिसतात अशी एकमेव जागा आता कच्छच्या रणाच्या जवळ गुजरात राज्यामध्ये आहे.
या सिंहांची संख्या मधे खूप रोडावली. मग आपल्या राष्ट्रीय वनविभागाने बरेच प्रयत्न केले आणि आता भारतात सिंहांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याच विषयावर बीबीसीने एक डॉक्युमेण्टरी तयार केली साधारण २०१२ साली. त्यात या जंगलाचं, इथे सापडणाऱ्या प्राण्यांचं, त्यांच्या सवयींचं सुरेख वर्णन करण्यात आलं आहे. याबरोबरचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जंगल टिकवण्यासाठी, इकडचं वन्यजीवन टिकवण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न करतात त्या रेंजर्सचंही कमालीच वर्णन केलं आहे. ज्यांनी ही डॉक्युमेण्टरी केली त्यांच्या मते या जंगलाचे खरे वीर हे इथले फोरेस्ट रेंजर्स आहेत.
हे रेंजर्स म्हणजे खरं तर या अभयारण्यात असलेल्या गावांमधले रहिवासी. जंगलाची नस अन् नस जाणणारे. कदाचित म्हणूनच त्यांना हे काम दिलं गेलं असेल सुरुवातीला. पण त्यांचं मुख्य काम आहे ट्रॅकिंगचं. म्हणजे कुठला सिंह कुठे आहे आणि तो कुठे चालला आहे याची खबर ठेवण्याचं. जेव्हा आपल्यासारखे लोक गीरमध्ये प्राणी पहायला जातात तेव्हा हे ट्रॅकर्सच आपल्याला सिंह नक्की दिसेल किंवा नाही अशी खात्री देत असतात. कारण त्यांना त्यांच्या जंगलातल्या प्राण्यांच्या सगळ्या सवयी माहीत असतात. असं म्हणतात की हे लोकं सिंहाच्या एका डरकाळीने त्याचा मूड ओळखू शकतात.
कोणत्याही जंगलात सर्व भाग प्रवाशांना मोकळा नसतोच, तसा तो इथेही नाही. पण अशा भागांमध्ये काही हल्ले झाले, दोन सिहांमध्ये भांडणे झाली, एखादा आजारी पडला, तर याची खबरबात या ट्रॅकर्सना ठेवावी लागते. हे करण्यासाठी ते जंगलातून दिवसभर दुचाकीवर फिरत असतात. आणि हातात शस्त्र म्हणून एक काठी!! रात्रीच्या वेळी एखादं कुत्र जरी आलं धावून तरी आपली कसली फेफे उडते. हे लोकं सिंहाच्या जंगलात, त्यांना वाचवण्याचं काम करायला हातभार लावण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असतात. कमाल आहे ना?
तर पहायला नक्की विसरू नका. गीरचं जंगल आणि तिथले ट्रॅकर्स यावरची डॉक्युमेण्टरी-
‘द लास्ट लायन्स आॅफ गीर!’
पाहा- यू ट्यूबवर
https://www.youtube.com/watch?v=wc98RQJRtvE