कोरोनाकाळात हाताला काम  नाही , नोकरी गेली? - मग  हे वाचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 02:44 PM2020-06-25T14:44:04+5:302020-06-25T14:50:41+5:30

कोरोना संपल्यावर यापुढचा जॉब मागच्याच टर्म्सवर मिळेल असं नाही. जरा कमी पगार, जास्त कष्ट स्वीकारायची तयारी ठेवा. मात्न देश आणि जग जेव्हा याला तोंड देतंय तेव्हा वैयक्तिक नुकसान हा त्याचाच भाग आहे, तो नाइलाज आहे हे आधी स्वत:ला सांगा.

leverage in digital- work hard & be positive in corona time | कोरोनाकाळात हाताला काम  नाही , नोकरी गेली? - मग  हे वाचा 

कोरोनाकाळात हाताला काम  नाही , नोकरी गेली? - मग  हे वाचा 

Next
ठळक मुद्देजगभरात सर्वाचं नुकसान झालं आहे, त्यात आपलंही काही काळ होणार आहे, हे जितक्या चटकन स्वीकारू, तितक्या पुढच्या संधी झटकन सापडतील!

- प्रशांत गिरबने

1. या कोरोनाकाळात अनेक तरुणांना भविष्याची काळजी वाटतेय, आयुष्यात आलेली ही अनिश्चितता नवी आहे. या वातावरणाशी कसं जुळवून घ्यायचं?

 नॉलेज इज पॉवर असं पूर्वी म्हणत, आता मात्न गुगलचा जमाना आहे. आज नॉलेजसह स्किल्स जास्त महत्त्वाचं झालंय. साहजिकच आता आपण श्रमाचा आदर करायला शिकलं पाहिजे. काम कुठल्याही स्वरूपाचं असो, त्याला किंमत दिलीच पाहिजे. हा काळ तर हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणारा काळ आहे.
भारताच्या तुलनेनं प्रगत, सुधारलेले पाश्चिमात्य देश श्रमांकडे वस्तुनिष्ठपणो श्रम म्हणूनच पाहतात. त्यात अस्सल-कमअस्सल-श्रेष्ठ-तुच्छ अशी कुठलीच लेबल्स ते श्रमाला लावत नाहीत. मी लंडनमध्ये राहात असताना माझा घरमालक व्यवसायानं इलेक्ट्रिशियन होता. तो ते तेवढंच काम करायचा. मी बरीच वर्षे त्याच्या घरी किरायानं राहात होतो. सुरुवातीला आमची ओळख झाली तेव्हा त्यानं स्वत:चा व्यवसाय अतिशय अभिमानानं मला सांगितला होता. तेव्हाची त्याच्या डोळ्यातली चमक मला लक्षात राहिली. हे तिथल्या कार्यसंस्कृतीतून येतं.
मला माहितेय, खूप मोठा तरुणवर्ग टिकटॉक वापरतो; पण टेड टॉक किती जणांना माहितेय? शासनाचं  स्वयम पोर्टल  किती जणांना माहितेय? हरेक क्षेत्नात आपापल्या ज्ञान-कौशल्यानं काहीतरी थोर काम केलेल्या लोकांची छोटी छोटी इंटरेस्टिंग भाषणं या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर ऐकायला मिळतात. तुमच्या स्मार्टफोनवर या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. ‘मी गावाकडचा आहे, मला अॅक्सेस नाही’ असं आमची पिढी पूर्वी म्हणायची. आता तुम्ही गावात असा की शहरात, हा अॅक्सेस तुम्हाला डिजिटलने दिलाय. मुंबई आणि माझं गाव असलेलं औराद शहाजनी आता हातात स्मार्टफोन असण्याच्या संदर्भानं सारखाच अॅक्सेस देणारे बनले. त्याचा आपण किती फायदा घेतोय, हे विचारा स्वत:ला. एक शब्द आहे. लिव्हरेज. म्हणजे तुमच्याकडे आधीच जे आहे त्याचा वापर स्वत:ला अधिक चांगलं घडवण्यासाठी करणं. 
तरु णांनी या काळात लिव्हरेजिंग केलं पाहिजे.
अजून एक महत्त्वाचं कौशल्य म्हणजे इंग्रजी भाषा अवगत असणं. आपली बहुतेकांची मातृभाषा मराठी आहे. मात्न आता जागतिक उद्योगाची भाषा इंग्रजी आहे. या भाषेला प्रीमिअम थेट दुप्पट आहे. तुम्हाला हे कौशल्य आलं तर पगार थेट दुप्पट होण्याच्या शक्यता दिसू लागतात. इंग्रजी येत नसेल तर त्याचा न्यूनगंड बाळगावा असं नाही. मात्न ती लिहिता-बोलता यावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावेत. अर्थात, हे काही एका दिवसाचं काम नाही. फ्लुएंसी येण्यासाठी सातत्याने सराव पाहिजे हे मी माङया अनुभवावरून सांगू शकतो. तो तेवढा वेळ आनंदानं आणि उत्साहानं दिला पाहिजे.
या पिढीतले जे विद्यार्थी असे आहेत, की आता फायनल वर्ष संपवून बाहेर पडतील, त्यांना आपण एका नव्या विश्वात जातोय हे समजून घ्यावं लागेल. घर, मित्न, शाळा-कॉलेज अशा संस्था आजवर तुम्ही अनुभवल्या. आयुष्यातली पहिली वीस-पंचवीस वर्षे फक्त याच संस्था सतत तुम्ही अनुभवल्या. आता तुमच्या जगण्यात एक नवी संस्था असणार आहे. कॉर्पोरेट संस्था. शाळा-कॉलेजात शिकायला तुम्ही पैसे मोजत होता. आता कॉर्पोरेट ही संस्था पैसे देऊन तुमचं कौशल्य विकत घेईल. हा मोठा फरक लक्षात ठेवा.
इथं तुम्हाला कधी एखाद्या सहका:याकडून कोचिंग मिळेल, कधी सीनिअरकडून तर कधी ज्युनिअरकडूनही शिकायला मिळेल. ते नक्की शिका. सोबतच अनिश्चिततेसोबत कसं डील करायचं तेसुद्धा शिका. ग्राहक, डिमांड, सप्लाय, अर्थव्यवस्थेचा तोल, इतर देशांशी घडणारं-बिघडणारं नातं हे सगळंच सतत बदलत असतं. याच्यासोबत जगायला शिका. आणि हो, वर्क आणि लाइफ बॅलन्सही बिघडू नका देऊ.
आजूबाजूला पहाल तर लक्षात येईल, आता लाइफ स्पॅन ऑफ वर्क बदललाय. वडील ज्या शाळेत शिक्षक म्हणून लागले तिथूनच ते निवृत्त झाले. आता असं कमी होतंय. आता सरासरी तीन ते चार वर्षात सहज नोकरी बदलली जाते. हे आता प्रत्येकानं अंगीकारलं पाहिजे. कारण आता हे विश्वच असं असणार आहे. जग आता डायनॅमिक झालंय. पैसे आणि लोक आता  फ्लोइंग  आहेत. डिमांड आणि सप्लाय आता फ्लेगङिाबल झालंय. साहजिकच या प्रवाहात टिकून राहायचं तर आपल्याला सतत शिकायला लागेल. हे आता न्यू नॉर्मल आहे. आता तुम्ही शिक्षक जरी असाल तरी तुम्हाला दर दोन वर्षानी नवं काही शिकायला लागतं. खासगी कंपन्यांमध्येही हेच दिसतं.
हा मुद्दा पुन्हा लिवरेज इन डिजिटल वर्ल्डकडे जातो.
या कोरोना काळात तुम्हाला जगण्याचं रिसेट बटन दाबावं लागेल. ते आपोआप दाबलंही जातं आहे हे समजून घ्या. याला संकट न मानता संधी माना. प्रत्येक रिसेटनंतर संधीचं एक लेव्हलायङोशन होत असतं. त्यादृष्टीनं हे सगळं पाहिलं पाहिजे.

2) येत्या काळात एकूणच आर्थिक मंदी, तीव्र बेरोजगारी या सा:याला सामोरं जावं लागेल अशी चर्चा आहे, मग तरुण मुलांनी  काय करायचं?

शंभर रुपयांचे जिथं 103 रु पये होण्याच्या संधी होत्या, तिथं आता ते 94 रु पये बनून हातात येतील असं सगळं जगभरातलं चित्न आहे. हे काय मुळीच आनंदाचं नाही. मात्न देश आणि जग जेव्हा याला तोंड देतंय तेव्हा वैयक्तिक नुकसान हा त्याचाच भाग आहे, तो नाइलाज आहे हे आधी स्वत:ला सांगा. म्हणजे त्रस होणार नाही.
कुठलंही नैसर्गिक-भौतिक संकट जगात वेळोवेळी आलं; पण माणूसजात त्यातून तरून निघाली हेच दिसतं.
सीएमआयईची आकडेवारी सांगते, बेरोजगारीचा दर आर्थिक मंदी येण्याआधी 8 टक्के होता. तो मागच्या दोन महिन्यात 26 टक्क्यांर्पयत गेला; पण आता तो पुन्हा 11.5 झाला. आता कोरोना खूप जास्त वाढला नाही तर आपण 8 ते 9 र्पयत जाऊ शकू. मात्न तो 4 र्पयत कमी कसा करता येईल हे येत्या काळात पाहिलं पाहिजे.
आपल्याकडे ग्रॅज्युएट लोक आता प्रचंड आहेत. आता तेवढंच करून भागणार नाही. विविध कौशल्यं ऑनलाइन शिका. कुठलीही पदवी तुम्हाला क्वॉलिफिकेशन देईल; पण इलिजिबिलिटीसाठी विशेष-वेगळे प्रयत्न करावे लागतात.
इंटरपर्सनल स्किलसुद्धा अशा काळात खूप महत्त्वाचं आहे. तंत्नज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते काय एकमेकांशी कसं वागावं हे ठरवून देणार नाही. ते तुम्हालाच करावं लागेल. ही गोष्ट इंटरपर्सनल स्किलमध्ये येते. त्यामुळे हे सारं शिकावं लागेल, या काळात.

3) कुठल्या प्रकारचे रोजगार आणि कौशल्यांना येत्या काळात मागणी असेल? 
डेटा मायनिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स एकत्न येतं ते क्षेत्न म्हणजे मॅक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक व्हेइकल्सचं क्षेत्न. ग्रामीण भागात फूड प्रोसेसिंग खूप महत्त्वाचं ठरेल. लॉजिस्टिक्स, सेल्स आणि कस्टमर सव्र्हिसमध्ये नक्कीच जॉब आहेत, असतील. 

4) कोरोनानंतरचा काळ आणि जग बदललेलं असेल, म्हणजे नक्की काय झालेलं असेल?

कुठलाही बदल झटक्यात होत नाही. तो अॅक्सलरेट होतो. डेटा कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं झालंय. कोरोनासारख्या आपत्तीला भविष्यात बांध घालायचा तर आपल्याकडे डेटा पाहिजे. तो आता नीट ठेवावा लागेल. या सगळ्या गोष्टी कधी न कधी होणारच होत्या. आता फक्त त्या अधिकाधिक वेगानं होतील.
हे जग बदलतंय. ते बदलणं आपण रोज अनुभवतो. या कोरोनाच्या काळात आणि नंतरही हा बदलाचा वेग वाढलेला असेल. हा बदल मी म्हणतोय तो, जग डिजिटल होण्याचा. आपण दोन गोष्टी लवकर केल्या पाहिजेत. एकतर डिजिटलसोबत आपला कम्फर्ट वाढवला पाहिजे. प्रत्येकाला अधिकाधिक वेगानं डिजिटल व्यवहार स्वीकारावे लागतील. सर्वच क्षेत्नांना ही बाब लागू होते. ई-लर्निग, ई-कॉमर्स, ई-कम्युनिकेशन आणि बरंच काही.

5) मात्र या काळात हाताला काम नसेल तर काय करावं, कसा विचार करायचा?
बेरोजगार असणं कधीही चांगलं नाही. त्याला मी जस्टिफाय करणार नाही. मात्न जेव्हा ते होतंच तेव्हा समजून घ्यावं, की सध्या यातून जाणारे असे अनेक आहेत मीच नाही. त्यातून परिस्थितीशी जरा कूल माइंडेड राहून डील करता येतं. गेल्या शंभर वर्षात जरी पाहिलं, तर मानवानं सगळ्या संकटांवर मात केलीय.
कोरोना संपल्यावर यापुढचा जॉब मागच्याच टर्म्सवर मिळेल असं नाही. जरा कमी पगार, खालची पोङिाशन, जास्त कष्ट, हे शांतपणो स्वीकारायची तयारी ठेवा. कारण या काळाची ती गरज आहे. हा वेळ संयमानं काढावा लागणार आहे. हे काय आयुष्यभर असणार नाही. सकारात्मक राहण्यासाठी जरा आपल्याहून कमी आर्थिक स्थितीतल्या लोकांकडेही पाहता येईल.
फेसबुकच्या सीईओ शेरील सँडबर्ग यांचं लीन इन हे पुस्तक मी तरुणांना आवर्जून वाचायला सांगेन. आता सगळे अनुभवत आहेत, की फावला वेळ खूप मिळतोय. या वेळेला संपत्ती मानून भविष्यासाठी इन्व्हेस्ट करा. याचा परतावा तुम्हाला खूप चांगला मिळेल. हा वेळ पुन्हा मिळणार नाही हे लक्षात घ्या.


(पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅग्रिकल्चर या उद्योगसंस्थेचे महासंचालक.)
मुलाखत आणि शब्दांकन
शर्मिष्ठा भोसले

Web Title: leverage in digital- work hard & be positive in corona time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.