लायफाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:27 AM2018-05-31T10:27:39+5:302018-05-31T10:27:39+5:30
वायफायपेक्षा जलद असणारं एक नवीन तंत्रज्ञान
बटन दाबलं आणि तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाउनलोड !
हे शक्य आहे का? तर आहे. कारण आता वाय-फायची जागा लाय-फाय हे तंत्रज्ञान घेणार असून, त्याचा वेग वाय-फायपेक्षा १०० पट अधिक आहे. या माध्यमातून एक जीबी डाटा ट्रान्समिट करण्यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागतो. या तंत्राचं नाव लाय-फाय (लाइट फिडॅलिटी) आहे. या तंत्राच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गॅजेटला इंटरनेट अॅक्सेस देणं शक्य आहे.
स्लो नेट हे जगभरातलं केवढं मोठं दु:ख. किती ती पेशन्सची परीक्षा. त्यावर पर्याय म्हणून लाय फाय विकसित झालंय. लाय-फायची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘लाय-फाय’द्वारे कम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये एक जीबी डेटा ट्रान्समिट करणं शक्य होणार आहे. म्हणजे एक सिनेमा अवघ्या एका सेकंदात डाउनलोड करता येणार आहे. २०११ मध्ये स्कॉटलॅण्डमधील एडीनबर्ग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लाय-फायचं संशोधन केलं आहे.
वाय-फायच्या तुलनेत शंभरपट वेगवान असलेल्या लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड या देशांमध्ये केला जात आहे. वाय-फायच्या तुलनेत लाय-फायचा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाहीत. कारण प्रकाश हेच माहिती वहनाचे साधन असल्यानं प्रकाश चोरणं हॅकर्सलाही शक्य नाही. हे वाय-फायपेक्षा खूप सुरक्षित आहे कारण त्याची रेंज भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मोठ्या कार्यालयांसाठी माहितीचे वहन करणं सोपं होईल. महत्त्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे. आता वाचायला थोडं अजब वाटत असलं तरी भविष्यात हे लायफाय वापरलं जाईल, तो भविष्यकाळ फार काही लांब नाही.
- प्रा. योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)