जिंदगी खत्म होती है, स्ट्रगल नहीं.
By admin | Published: January 21, 2016 08:52 PM2016-01-21T20:52:19+5:302016-01-21T20:52:19+5:30
‘बालाजी में फिर कब ऑडिशन्स के डेट्स है.’ अशी चर्चा करत, ब्रॅण्डेड कपडे, रेबन्सचे ग्लेअर्सवाली, टकाटक मेकअप केलेली पण रोडसाइड टपरीवर चहा पिणारी गर्दी दिसली की, समजावं आपण त्याच लेनमध्ये पोहचलो.
Next
- स्नेहा मोरे
‘तेरा सिलेक्शन हुआ क्या.?’, ‘बालाजी में फिर कब ऑडिशन्स के डेट्स है.’ अशी चर्चा करत, ब्रॅण्डेड कपडे, रेबन्सचे ग्लेअर्सवाली, टकाटक मेकअप केलेली पण रोडसाइड टपरीवर चहा पिणारी गर्दी दिसली की, समजावं आपण त्याच लेनमध्ये पोहचलो.
अंधेरीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट जवळची ही गल्ली.
बडय़ा-बडय़ा प्रॉडक्शन हाउसची कार्यालयं याच भागात आहेत.
मुंबईत स्टेशनवर उतरल्यावर
स्ट्रगलर पहिले याच गल्लीकडे निघतात.
काहीजण तिथं पोहचूनही कायम स्ट्रगलच करतात,
तर काही इथंच आपलं नशीबही घडवतात.
त्याच गल्लीतली स्ट्रगलर्ससमवेतची ही भटकंती.
आणि एक खास लाइव्ह, इमोशनल रिपोर्ट
त्याच ‘स्ट्रगलर्स लेन’ मधून!
‘तेरा सिलेक्शन हुआ क्या.?’,
‘बालाजी में फिर कब ऑडिशन्स के डेट्स है.’
ब्रॅण्डेड कपडे, रेबन्सचे ग्लेअर्स अन् टकाटक मेकअप केलेल्या काही तरुण मुला-मुलींचा हा एका रोडसाइड चहाच्या टपरीवरचा संवाद. तसा अंधेरीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेटजवळ असणा:या ‘स्ट्रगलर्स लेन’मध्ये हमखास ऐकायला मिळणारा. बडय़ा-बडय़ा प्रॉडक्शन हाउसची कार्यालयं असणारा हा परिसर गेल्या कैक वर्षापासून ‘स्ट्रगलर्स लेन’ याच नावानं ओळखला जातोय.
‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूंँ’, ‘किंग खानसोबत काम करायचंय’ या स्वप्नांचं वेड घेऊन घर-दार सोडून मुंबई गाठणा:या तरुणाईचा मायानगरी मुंबईतील हा एकमेव ठावठिकाणा. बॉलिवूड, अॅडफिल्म्स, टेलिव्हिजन असो वा रिअॅलिटी शो. या सगळ्यांची सुरुवात जणू काही स्ट्रगलर्स लेनपासून होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ मुंबई-महाराष्ट्रासह नव्हे, तर दिल्ली, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश अशा एक ना अनेक शहरं आणि खेडय़ापाडय़ातील तरुणाई ‘अॅक्टिंग’ आणि ‘मॉडेलिंग’च्या ध्येयाने ‘स्ट्रगलर्स लेन’च्या शोधात येते.
मुंबईत आल्यानंतर राहण्याचं ठिकाण शोधण्यापूर्वीही ही मंडळी डायरेक्टर्स, प्रोडय़ूसर, कास्टिंग मॅनेजर्सचा पत्ता शोधतात. त्यानंतर मग पहिले काही दिवस कुणा ओळखीच्या माणसांकडे, फुटपाथवर, रस्त्याच्या आडोशाला किंवा अगदी मैदानातही हे ‘स्ट्रगलर्स’ पथारी लावतात. आणि मग ख:या अर्थाने प्रॉडक्शन हाउसच्या पाय:या ङिाजवणं सुरू होतं. सुरुवातीला प्रोडक्शन हाउसच्या सिक्युरिटी गार्ड्सकडूनच ‘पोर्टफोलिओ रिजेक्शन’ला सामोरं जावं लागतं. याच प्रसंगी या तरुणाईला ग्लॅमरच्या विश्वापलीकडच्या वास्तवाची चुणूक लागते. पण अॅक्टिंगचं खूळ डोक्यात गेलेल्यांचा धीर मात्र खचत नाही.
पहिल्याच ‘रिजेक्शन’नंतर समदु:खी असणा:या काही अवलियांची भेट ‘स्ट्रगलर्स लेन’च्या फुटपाथवर असणा:या स्टॉल्सवर होते. मग एकमेकांना काहीसा धीर देत ‘अरे. कोई बात नही, अगले हफ्ते फिर यशराज में ऑडिशन है.’ किंवा मग ‘अरे यार. तू जिम जॉइन कर लें. फिर कुछ तो बात बनेगी’ असं म्हणत स्ट्रगलर्सचा ग्रुप तयार होतो. भविष्यात करिना- सलमान होणा:या या स्ट्रगलर्सना ग्रुप्समुळे (भाडय़ाने का होईना) हक्काचं घर मिळतं.
अंधेरी-वर्सोवा परिसरातील चार बंगला, यारी रोड, आरामनगर, ओशिवरा, लोखंडवाला या भागात हे तरुण-तरुणी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहतात. सकाळी मॉर्निग वॉक, मग जीममध्ये योगा-झुम्बा, हेल्दी डाएट अशा काहीशा आखून दिलेल्या फुटपट्टीप्रमाणो या तरुण-तरुणींचा दिवस सुरू होतो. सकाळी लवकर आवरून या मंडळींचा मोर्चा प्रॉडक्शन हाउस, कास्टिंग स्टुडिओज्कडे वळतो.
प्रॉडक्शन हाउस आणि कास्टिंग स्टुडिओच्या एनज्रेटिक तरुणाईची वर्दळ तिथे सुरू असलेल्या ऑडिशनचा दाखला देते. ऑडिशन्ससाठी काही जण ग्रुप्समध्येच एकमेकांची रिहर्सल घेत असतात, तर काही जण ऑडिशन सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर जात एकांतात आपली स्क्रीप्ट पुटपुटतानाही दिसतात. ‘अॅक्टिंग’चं लागलेलं व्यसन या तरुणाईच्या डोळ्यांत क्षणोक्षणी दिसून येतं. पण काही तरुण-तरुणींचा आत्मविश्वास प्रॉडक्शन हाउसच्या दाराशी अथवा कास्टिंग स्टुडिओच्या उंबरठय़ावरच थबकतो. आजूबाजूला आपल्यापेक्षा कुणीतरी बरं दिसतंय, कुणाची तरी अॅक्टिंग एकदम भारी आहे असं पाहून बरेचसे तरुण-तरुणी निराश होऊन ऑडिशन न देता आल्या पावली निघून जातात.
काही मात्र जिद्दीने आपला नंबर येण्याची तासन्तास वाट पाहतात. आणि अखेर स्टुडिओमध्ये गेल्यावर अखेर तो क्षण येतो.
‘लाईट, कॅमेरा. अँड अॅक्शन..’
हे तीन शब्द कानावर येताच स्वत:ला विसरून ते ‘पात्र’ बनत आपल्या ‘रोल’साठी जीव तोडून प्रयत्न करतात. आणि मग 15-20 मिनिटांच्या ऑडिशननंतर दीर्घ श्वास घेत ही मंडळी बाहेर येतात. ‘रिझल्ट कब पता चलेगा. दोन दिन या एक हप्ता’ अशी चर्चा कास्टिंग मॅनेजरशी सुरू होते. मात्र त्या उत्तराची वाट पाहत, त्याच रोलमध्ये कुणी जीव अडकवून बसत नाही.
एकदा त्या स्टुडिओची पायरी उतरली की, ‘अगला ऑडिशन कब है’, ‘अरे तू कल वो अॅडफिल्म के लिए आनेवाली है ना.’ असं म्हणतं नव्या उमेदीनं पुढच्या कामाला लागतात. आजूबाजूच्या परिसरात दुपारी एखाद्या छोटेखानी हॉटेलमध्ये लंच करून पुन्हा हे स्ट्रगलर्सचे ग्रुप्स ऑडिशनच्या शोधार्थ पायपीट सुरू करतात. वर्सोवा, आरामनगर परिसरात असणा:या स्टुडिओंच्या गर्दीत या स्टुडिओतून त्या स्टुडिओत फिरणं, मिळेल ते काम घेणं, निदान ऑडिशन देणं असं चक्र सुरूच असतं. मात्र प्रत्येक वेळी चेह:यावर नवं तेज, नवा उत्साह आणि काहीतरी नवं तोडीचं करण्याची जिद्द बाळगत उत्साहाने ही मंडळी सगळ्या स्टुडिओमध्ये ऑडिशन्स देतात.
मात्र सूर्य मावळतीला गेला आणि मुंबईवर शाम का नशा चढू लागला की या स्ट्रगलर्सची पावलं आपसुकच आपल्या रूमवर नाहीतर मग पब्स, पाटर्य़ाकडे वळतात. यासाठी काही जण ओशिवरा येथील ‘श्रीजी’ हॉटेलच्या अड्डय़ावरही जमतात. आणि दिवसभराचा शीण झटकून या मंडळींना रात्रीच्या प्रेमात पडण्याची ङिांग चढते. एक-दोन पेग्ज असो वा सिगारेटची किक. या सगळ्याच्या मदतीने एका वेगळ्याच विश्वाच्या वाटेवर ही मंडळी जातात. रूम किंवा ग्रुप्स पाटर्य़ामध्ये स्वत:ला विसरून जाणारेही बरेच! पब्स, डिस्कमध्ये जाणारी मंडळी रात्रीच्या अंधारातही कुणीतरी आपल्याला पार्टीमध्ये बघेल, सिलेक्ट करेल आणि आपल्याला ‘ब्रेक’ मिळेल या वेडय़ा आशेत असतात.
काहींच्या आशांना कामाचे धुमारे फुटतात, काहींचा स्ट्रगल मात्र उजेडत्या दिवसाबरोबर पुन्हा सुरू होतो.
ऑडिशन्स तो दे दे.
ब:याचदा ऑडिशन्स देऊनही या स्ट्रगलर्सची नौका काही केल्या पार होत नाही. मग या स्ट्रगलर्सच्या कंपूतीलच काही जण मिळून त्या ऑडिशनला ‘फेक ऑडिशन्स’ म्हणतात. आणि मग तिथल्या कास्टिंग डायरेक्टरला नावं ठेवणं, ऑडिशन्सच्या नावाखाली खेळ सुरू असल्याचा दावा करणं आणि ऑडिशन्सला देण्यात येणारी स्क्रिप्ट अत्यंत वाईट आहे असं म्हणत टीकासत्र सुरू होतं.
फ्रायडे हँगओव्हर
आठवडय़ाचे पाच दिवस ऑडिशन्स देऊन थकलेली हे तरुण-तरुणी हक्काच्या शुक्रवारी ‘फ्रायडे हँगओव्हर’मध्ये बिझी असतात. मग त्यात रूमवर पाटर्य़ाचे बेत आखणं, पब्स-डिस्क-क्लब्समध्ये जाऊन पहाटेर्पयत गाणी-मौज- मस्तीमध्ये ङिांगणं हे रुटीनच. सततच्या ऑडिशन्सने आलेला स्ट्रेस घालविण्यासाठी हे उत्तम हक्काचं साधन या मंडळीकडे असतं. पहाटेर्पयत रंगणा:या फ्रायडे फिव्हरमुळे वीकेण्ड्सला ऑडिशन्सचा ओघ काहीसा कमी असतो. शिवाय, शनिवारी स्ट्रगलर्स लेनवर ही मंडळी फारच कमी संख्येने दिसून येतात.
साथ ‘कंटिंग चाय’ची.
स्ट्रगलर्स लेनमध्ये रस्त्याच्या दुतर्फा कटिंग चायचे स्टॉल्स असल्याने ‘स्ट्रगलिंग’ आणि ‘कटिंग चाय’चे एक वेगळेच समीकरण आहे. याच लेनच्या एका कोप:यात चहाचे झुरके घेत ऑडिशन्सच्या गप्पा मारणारी मंडळी वर्षानुवर्षे स्ट्रगल करतात. शिवाय, याच ठिकाणी ऑम्लेट, साऊथ इंडियन फूड परवडणा:या दरात मिळत असल्याने हे बेस्ट ऑप्शन्स ठरतात.
फंडा सेल्फ मार्केटिंगचा
बॉलिवूडसारख्या ग्लॅमरस दुनियेतील स्पर्धा आजच्या घडीला आणखीनच अटीतटीची झाल्याने ऑडिशन्ससोबतच फेसबुक, टि¦टर, व्हॉट्सअॅप, माऊथ पब्लिसिटी अशा अनेक माध्यमांद्वारे या तरुण-तरुणींचे जोरदार सेल्फ मार्केटिंग सुरू असते. ब:याचदा ऑडिशन्स देत असतानाच एखाद्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये छोटेखानी नोकरी मिळवून हळूहळू तिथे रुळण्याच्या प्रयत्नातही काही जण असतात. मात्र, मैत्री आणि करिअर यातील सीमारेषा पारखत बरेचदा ही मंडळी ‘करिअर’कडे झुकतात.
व्हॉट्सअॅपवर ‘त्या’ ग्रुपमध्ये एण्ट्री
ब:याचदा एकाच वेळी कोणत्या-कोणत्या प्रॉडक्शन हाउसेस आणि स्टुडिओज्मध्ये ऑडिशन्स सुरू आहेत, याची माहिती मिळणं व्हॉट्सअॅपमुळे सोप्पं झालंय. यामुळे एकाच वेळी ब:याच ऑडिशन्सची माहिती फिल्टर होऊन तरुण-तरुणींर्पयत पोहोचते. आणि त्यामुळे तिथर्पयत जाणं, त्या ऑडिशनसंदर्भातील माहिती मिळवणं सोयीचं होतं. मात्र यातही काही ग्रुप्समध्ये ऑडिशन्सची माहिती मिळवण्यासाठी ऑनलाइन ट्रॅँङॉक्शन किंवा बँक अकाउंटमध्ये पैसे द्यावे लागतात, त्यानंतरच त्याची माहिती मिळते अशी विचित्र पद्धत आहे. मात्र यात कितपत तथ्य आहे, याची दखल न घेताच बरेच स्ट्रगलर्स या मोहाला बळी पडतात. आणि काहीजण पै पै जमवून साचवलेले पैसे यात गमवूनही बसतात.
शूटिंग पाहण्याचं वेड
ब:याचदा ऑडिशन्स देऊन कंटाळा आली की, एनर्जी गेन करण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी हे स्ट्रगलर्स थेट शूटिंग साइट्स गाठतात. मुंबईनजीक असणा:या मढ, फिल्मसिटी, मेहबूब, फेमस, आक्सा बीच अशा ठिकाणी जाऊन शूटिंग पाहतात. यावेळी काही प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री असतील तर त्यांच्या अॅक्टिंगचं निरीक्षण करणं, तेथील डायरेक्टर्स, प्रोडय़ूसरचे नंबर्स मिळवण्याचं काम ही तरुण मुलं-मुली करतात.
पैशांसाठी तीन महिने ‘वेटिंग’
ब:याचदा स्ट्रगलर्सना बडय़ा प्रॉडक्शन हाउसेसमध्ये काही छोटेखानी रोल्स मिळतात, मग ते ज्युनिअर आर्टिस्टचा असो वा साइड रोल्स. मात्र यासाठी अॅक्टिंग केल्यानंतर त्याचे पेमेंट येण्यासाठी तीन महिने रखडावे लागते. ब:याच लांबलचक प्रक्रियेनंतर 15क्क्-3क्क्क् एवढी तुटपुंजी रक्कम या स्ट्रगलर्सच्या हाती मिळते, तर छोटय़ा प्रोडय़ूसरकडे मात्र महिनोमहिने रखडवूनही शेवटच्या क्षणार्पयत पैसेच मिळत नाहीत.
शेवटी मेकअप आर्टिस्ट झाले!
मूळची गुजरातची असलेली ती. मुंबईत येऊन जवळपास 17 र्वष लोटली. वाट्टेल तेवढी मेहनत घेईन पण जिद्दीने एक दिवस घरातल्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करेन असं वाटलं होतं. पण ते आजवर जमलं नाही. ती सांगते, ‘‘छोटेमोठे रोल केले, पण विशेष काम मिळालं नाही. मग मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्याचा मार्ग पत्करलाय. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना ब:याचदा मन आणि बुद्धीचा संघर्ष सुरू असतो. मला जे करायचंय मनापासून ते हे नाहीच असं राहून राहून वाटतं. पण नाइलाज आहे. पैसे कमवणंही भाग आहे. त्यामुळे आता काम करता करता ऑडिशन्स देतेय. त्यामुळे काहीशी खंबीर झालेय. पण ब:याचदा डीप्रेशनमध्ये जायची भीती वाटतेच. सुन्न होतं सगळं. काहीच दिसेनासं आणि सुचेनासं. मग फक्त डोळे मिटले की, 70 एमएमच्या पडद्यावर मी दिसते आणि नव्या ऊज्रेने पुन्हा ऑडिशन्स देण्यासाठी निघते.’’
पार्टटाइम लाईटमन..
दिल्लीमध्ये ऑडिशन्स देण्याचं वेडं लागलं. मित्रंच्या साथीने सुरूझालेलं वेड कधी पॅशन झालं कळलंच नाही. मग सात वर्षापूर्वी मुंबईची ओढ लागली आणि कोणाशीच ओळख-पाळख नसताना मुंबईचा रस्ता गाठला.
दोनएक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर हाती काहीतरी येईल अशी आशा होती; मात्र आता कधी-कधी स्वत:चीच भीती वाटते, स्वत:ला संपवावंसं वाटतं. म्हणूनच स्वत:च्या मनाची समजूत काढून पार्टटाइम लाईटमनचं काम सुरू केलंय. त्यामुळे शूटिंगच्या सेटवर असताना ब:याच गोष्टी पाहायला आणि शिकायला लागलोय. आणि मग याच कामामुळे कधीतरी एखाद्या सीनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट किंवा गर्दीत काम करण्याची संधी मिळते, आणि त्यातच काहीसं समाधानही मिळतं.
घराचा उंबरठा ओलांडताना आई-बाबांनी पाठ फिरवल्याने पुन्हा घरी जाण्याचा मार्ग कधीच बंद झालाय. आता सात र्वष जिने साथसोबत दिली, हीच मुंबई माझी मायबाप आहे. त्यामुळे एखाद्या संध्याकाळी खूप स्ट्रेस आला की मग नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राइव्हचा कट्टा गाठतो. अथांग समुद्राशी गप्पागोष्टी करत सगळा शीण झटकून टाकतो आणि पुन्हा एकदा नव्या सूर्योदयाची वाट पाहतो.
जिंदगी खत्म होगी, स्ट्रगल नहीं..
‘स्ट्रगलर्स की जेब खाली होती है, पर जेब पर रखे हाथ की स्टाईल कम नहीं होती’ असं काहीसं स्ट्रगलर्सचं आयुष्य असतं. बॉलिवूडमधील काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नावं सोडली तरीही प्रत्येकाचा स्ट्रगल हा सुरूच असतो. मग तो डायरेक्टर, प्रोडय़ूसर असो वा हिरो-हिरोईन. त्यामुळे स्ट्रगलची धग प्रत्येकालाच सोसावी लागते. ऑडिशन्सच्या प्रोसेसमध्ये असणा:या तरुण-तरुणींसाठी ब:याचदा डायरेक्टर्स आणि कास्टिंग डायरेक्टर्सना ‘काऊन्सिलर’चा रोल करावा लागतो. कारण ब:याचदा ‘जिंदगी खत्म होती है, स्ट्रगल करते करते.’ असाच अनुभव काही दिग्दर्शकांचा असतो.