काऊन रे पोट्टया?- वाचा नागपुरी प्रेमाची रसिक गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 05:24 PM2020-02-20T17:24:14+5:302020-02-20T17:25:24+5:30

जे सहज असतं, त्याले अवघड करून थ्रिलिंग मोडमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकणं किंवा त्याच गोंधळात नव्हत्याच होतं करून टाकणं हा नागपुरी प्रेमाचा ठसका आहे!

life & Love in Metro cities, a report about love in orange city Nagpur! | काऊन रे पोट्टया?- वाचा नागपुरी प्रेमाची रसिक गोष्ट

काऊन रे पोट्टया?- वाचा नागपुरी प्रेमाची रसिक गोष्ट

Next
ठळक मुद्देआपल्या निरागस वृत्तीने नागपूरकर त्या सगळ्यांना सामावूनही घेतात.  आपला नागपूरी ठसका सोडत नाहीत.

प्रवीण खापरे

मंगेश पाडगावकर म्हणतात ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ अन् नागपूरी प्रेमी बापडय़ा म्हणतो ‘काई बी नगं सांगू.. आमचं प्रेम म्हंजी, दूधाचं दही होतं. आनं त्याले फोडणी-सोडणी घालून मठ्ठयावानी असतं. नाई तं, सरसरीत तडका मारून कढीवानी असतं बापू!’
यातच नागपूरी प्रेमाचा अ‍ॅक्शनपॅक्ड धमाका लक्षात येतो. 
जे सहज असतं, त्याले अवघड करून थ्रिलिंग मोडमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकणं किंवा त्याच गोंधळात नव्हत्याच होतं करून टाकणं म्हणजे नागपूरी प्रेमाचा ठसका होय! हे सांगण जरा विचित्न असेल मात्न ‘जे हाय ते हाय आन जे नाई ते नाई’. इथं प्रेम करावं लागतच नाही, ते होऊन जातं. म्हणजे ‘मले बी एक सखी-साजनी पाईजे नं बापू’ किंवा ‘मले बी एक माया दिलाचा साजण पाईजे न बये’ अशाप्रकारचं.
‘तुले जेव्हा बी पायतो, तेव्हा माया दिलाची स्पिड बुलेट ट्रेनवानी होते वं. चाल चाय पिऊ’. हे अशा प्रकारचे डायलॉग सेन्सॉरशिपच्या गराड्यातही इथे शहरानिजकच्या खेड्यात आणि शहरातही अधामधात कानावर पडतात. 
हो इथे प्रेमाला सेन्सॉरशिप आहेच! प्रेम हे बेमालून होत असलं तरी इथं मालूमपणाने प्रेम करणं म्हणजे मोठ्ठं आकांडतांडव करावं लागतं.
 सगळेच ओळखीचे असतात नं हो.
 घरातून निघालेली बापडी किंवा बापडा पंक्चरवाला, सलूनवाला, टपरीवाल्याच्या रडारवर असतात. एवढंच कशाला, ऑटोवालेही ‘काऊन वं पोट्टे / काऊन रे पोट्टया’ असं विचारतातच की! त्याला कारण म्हणजे, ती बापडी आणि तो बापडा, यांच्यातील जोरदार संवादाचे गवाईदारच असतात हे लोक.़ एखादवेळी तो बापडा दुसया एखाद्या मैत्नीणीशी बोलताना दिसला तर या बापडीचा तिळपापडच होतो. ‘तू तियाशी काऊनच बोल्ला. मले भेटाले होत नाई आन तियाशी गुटूरगुटूर करु न रायला’ असा तिचा संताप असतो. त्यावर तो ‘तू नं शकीलीच हायेस. तुयीच मैतरीन ते थे मंग कायल भूनभून करतेस वं. जाऊ दे मले नाई बोलाचं तुयाशी’ अशा त्याच्या तडक वाक्यावर ती नरमते.ही सगळी कथा त्या गवाईदारांपुढेच तर घडत असते. 
आता म्हणाल, एवढ्या मोठ्या शहरात एवढ्या चौकशा कोण करतो? पण इथे आजही अशा चौकशा केल्या जातात. त्याने पोलीसांचं कामही सोपं होतं.म्हणजे, एखादी पोरगी गेली कुणासोबत पळून! पोरगीच कशाला? पोरही पळून जातात लेकाचे!  तर हे सुत्नरूपाने तैनात असणारे रडार पोलीसांना सगळंच सांगून टाकतात. आणि हा सारा ड्रामा येथे राजरोस बघता येतो. शेवटी सगळंच निभाऊन नेलं जातं. 
याच सेन्सॉरशिपपासून मार्ग काढत काही पोरासोरांनी शहरातल्या बागा फुलवल्या आणि  त्याला सिनेमांनीही धक्का दिला. सिनेमाचे असे एकेक डायलॉग त्या बागांत कानावर पडतात, की ऐकणारा ऐकतच राहतो. सेमिनरी हिल्सवर असलेलं  जपानी गार्डन, बालोद्यानमध्ये स्पर्धा लागल्यागत बसलेले कपल्स. ‘तू साथ देशील तर मी जगातला सर्वात श्रीमंत असेल’ अशा तहेचे प्रपोजलही ऐकू येतात. ‘ 
तिकडे जवळच असलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये वनस्पती शास्त्न जरा जास्तच विकसित झाले. मात्र तिथं गर्दी वाढली आणि ते ही बंद झालं.
 जरा खाली उतरलं की तेलंगखेडी बाग आहेच. या ऐतिहासिक बागेत जरा वातावरण मोकळंढाकळं असतं. पुढे अंबाझरी गार्डन. तलावाच्या काठावर इथं बरेच जण इतरांच्या नजरेस येतात.
हे असे असले तरी ‘कटती मेरी शाम फुटाळा किनारे’ म्हणावसं वाटणारी फुटाळा चौपाटी आहेच. हा तलाव अनेक प्रेमीयुगुलांनी खुललेला असतो. नजिक असणार्‍या सेमिनरी हिल्सच्या हिरवळीसोबतच तरु ण-तरु णीच्या भेटी रंगतात.  
हे असं चालूच राहतंय इथं. नागपुरात ऊन, पाऊस आणि गारठा हे तीनही ऋतू सारख्याच तिव्रतेचे. उन्हाळ्यात ऊन नको असते, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात गारठा नकोसाच वाटतो. मात्न, या ऋतूंचा अतिरेक येथील जनमाणसातही सारखाच रूजला असल्याने, तारूण्यात हा अतिरेक व्हायचाच.
नागपूर हे देशाचे केंद्रबिंदू. रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक इथेच असल्याने, देशभरातून येणाया गाड्या इथेच थांबतात. त्यामुळे, इथे बहुभाषिक प्रेमही त्या त्या शैलीत बघता येतात. कुणी दक्षिणेतून पळून येतात, कुणी उत्तरेतून, कुणी पश्चिमेकडून तर कुणी पूर्वेकडून. आपल्या निरागस वृत्तीने नागपूरकर त्या सगळ्यांना सामावूनही घेतात.  आपला नागपूरी ठसका सोडत नाहीत.
 यहाँ का पानीच ऐसा है की सब रंग घुल जाते है.

 

Web Title: life & Love in Metro cities, a report about love in orange city Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.