पुण्यात प्रेमात पडून झेड ब्रिजला गेला नाहीत तर काय मग प्रेमात पडलात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 05:16 PM2020-02-20T17:16:56+5:302020-02-20T17:18:59+5:30

पुण्यात पूल कमी नाहीत. पण झेडब्रीज आपलं वेगळेपण टिकवून आहे. झेडब्रीज वरची गर्दी म्हणजे खास. ती तरुण आहे. बंडखोर आहे. का?

life-love-metro-cities-report-about-Zed Bridge in Pune. | पुण्यात प्रेमात पडून झेड ब्रिजला गेला नाहीत तर काय मग प्रेमात पडलात?

पुण्यात प्रेमात पडून झेड ब्रिजला गेला नाहीत तर काय मग प्रेमात पडलात?

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात राहता  आणि  झेडब्रिजवर नाही गेलात?

- राहुल गायकवाड

जान- पहचान की जगह से 
अनजान जगहों में जाना ही,  
 इश्क में शहर होना है  
रवीश कुमार  यांच्या  इश्क में शहर होना  
या पुस्तकातील या ओळी..
प्रेमाच्या एका क्षणासाठी प्रेमी प्रेमिका शहरात किती दूर जात असतील ना? सबसे दूर, दुनियासे दूर!
पुण्यात तरी ही गोष्ट अशी कितीशी वेगळी असणार?
पुणं स्मार्ट असलं तरी गर्दी काही कमी नाही. 
त्यामुळे इथं हॉटेल्स भरपूर असली तरी तिथंही गर्दी आहेच. त्या बाहेर वेटिंगच्या रांगा. खा की पळा असाच एकुण मामला. त्यामुळं मनसोक्त गप्पा मारता येतील किंवा निव्वळ हातात हात घेऊन शांत बसता येईल अशी जागा कुठंय? त्यात इथं प्रेम करणार्‍यांच्या मागे हजारो डोळयांचे सीसीटिव्ही सदैव लागलेले असतात. या सीसीटिव्हींच्या पासून दूर एखादी हक्काची जागा जोडप्याला हवी असते. 
ती पुण्यातली हक्काची जागा म्हणजे  झेड ब्रीज. 
पुण्याचा झेड ब्रिज म्हणजे प्रेम करणार्‍यांची हक्काची जागा 
तसं पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. आधी पेठांपुरतं मर्यादित असणारं पुणं हळूहळू विस्तारत गेलं. आता तर त्याच्या सीमांना अंतच राहिलेला नाही. पुण्यात मेट्रो येतीये त्यामुळे पुण्याला सुद्धा मेट्रोसिटी म्हणायला हरकत नाही. पण कधीकाळी शांत असणारं शहर आता हळूहळू धकाधकीचं होत चाललंय. नाही म्हंटलं तरी पुण्याला लागलीये मुंबईची हवा. पळतायेत इकडे सुद्धा सगळे. परंतु या धकाधकीच्या आयुष्यात जोडप्याला काहीक्षण शांततेचे हवे असतात. कॅफे, मॉल्समध्ये ती शांतता मिळत नाही. 
मग काय पुण्यातले पूल त्यांच्यासाठी आसरा होतात. 
खरंतर पुण्याला पुलांचं शहर म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. या सगळ्या पुलांमध्ये झेडब्रीज आपलं वेगळेपण टिकवून आहे. इतर पुलांवर सुद्धा होते गर्दी पण झेडब्रीज वरची गर्दी म्हणजे खास. ती तरुण आहे. स्मार्ट आहे. ट्रेण्डी आहे. बंडखोर आहे का? असेलही. नसेलही. पण प्रेमात पडून झेड ब्रिजला  गेला नाहीतर तर काय मग प्रेमात पडलात?


 

जुन्या पुण्याची ओळख असणार्‍या पेठांना मॉर्डन पुण्याच्या डेक्कनशी हा पूल जोडतो. खरंतर हा पूलच तुम्हाला दोन्ही प्रकारचं पुणं दाखवतो. या पुलाला तुमच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचं काही देणंघेणं नाही. तो सगळ्यांनाच सामावून घेतो. त्याला प्रत्येकाचीच लव्ह स्टोरी स्पेशल करायची असते.
बरं झेड ब्रिजचं अजून एक वैशिष्टय ते म्हणजे केवळ टु व्हिलरसाठी हा पूल आहे. त्यामुळे वर्दळ तशी कमीच. इथं कुणी चारचाकीचा तोरा मिरवत येऊ शकत नाही. त्यामुळे टु व्हिलरवर झूम पळणार्‍या किंवा दोघांच्या दोन स्कुटरवर येऊन इथं निवांत गप्पा मारत बसणार्‍या जोडप्यांसाठी हा पूल खास आहे.
त्यातही सायंकाळ नंतर रात्री जरा दिवे लागल्यावर झेड ब्रिजवर चक्कर मारली की त्याचा नजारा काही वेगळा दिसतो. 
मंद प्रकाशात आपल्या टु व्हिलर कडेला लावून त्या मागे बसलेली अनेक जोडपी दिसतात. कोणी हातात हात धरु न पुलावरु न नदी न्याहळतायेत, कोणी पुलाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत फेरफटका मारतायेत. एके ठिकाणी दोन मैत्नीणी बसल्यात तर कुठे दोघे मित्न. आजूबाजूला तुरळक वाहूतक आणि  डोक्यावर निरभ्र, मोकळं आकाश. काही मिनिटे का होईना जोडप्यांना हे ठिकाण आपलं, हक्काचं ठिकाण वाटतं. इथे आपल्याला कोणी बघणारं नाही आणि हटकणार नाही याची त्यांना खात्नी. तशीही प्रेमाचे काहीक्षण एकत्न घालविण्यासाठीच्या जागा राहिल्यातच कुठे शहरांमध्ये ? हा ब्रीज त्यांची मनं जोडतो. त्यांना मनसोक्त गप्पा मारण्याची मोकळीक देतो, हातात हात घेण्याचं स्वातंत्र्य देतो. सोशल मीडियाच्या जंजाळात हा ब्रीज त्यांना काही वेळाची स्पेस देतो.
मग कोणी आपल्या ऑफिस मधल्या गोष्टी सांगतं तर कोणी आयुष्यातील सुख दुर्‍खांची उजळणी करत असतं. मनात साठलेले, मनाला वाटणारं ते सांगण्यासाठी कोणीतरी हवं असतं. जे आपल्या हक्काचं असेल, आपलं सगळं ऐकून घेईल आणि आपल्याला जज करणार नाही असं कोणीतरी. या पुलावर अनेक जोडपी आपली सुखर्‍ दुर्‍ख वाटताना दिसून येतील. 
सिंगल्सला सुद्धा हा पूल एकटा सोडत नाही बरं का.. त्याच्यासाठी असते शांतता, संथ वाहणारी नदी आणि सोबतीला गाणी, ज्याच्यात्याच्या आवडीची फोनमधली प्लेलिस्ट. आणि निव्वळ शांतता. एकटेपणा घालवायलाही अनेकजण या पुलाचाच आसरा घेतात. त्यात सिंगल्स असतात, तसे ब्रेकअपवालेही.
या पुलाकडे शेकडो प्रेम कहाण्या आहेत. 
शेकडो सुखर्‍ दुर्‍ख आहेत. 
प्रेमाच्याआणाभाकांचा हा पूल साक्षिदार आहे. आता सोशल मीडियाच्या काळात या पुलावर गर्दी कमी होईल की काय अशी ही शक्यता आहेच.  पण तरी जे यायचे ते येतातच.
या पुलावर. हसतात, रडतात, गातात अन निघून जातात. 
पूल तिथंच आहे. तिथंच असतो. नव्या जोडप्याची वाट बघत.


( राहुल लोकमत ऑनलाइनचा पुण्यातला वार्ताहर आहे.)
 

Web Title: life-love-metro-cities-report-about-Zed Bridge in Pune.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.