ए जिंदगी गले लगा ले..
By admin | Published: June 17, 2016 07:42 AM2016-06-17T07:42:12+5:302016-06-17T07:42:12+5:30
रेडिओ वाजत होता.. ट्रेन धावत होती.. नुकत्याच झिमझिमलेल्या पावसात आणि घामात ओला होत मी कशीबशी विडो सीट पकडून व्हीटी ते डोंबिवली प्रवासाला निघालो.. कानात रेडिओ वाजत होता..
रेडिओ वाजत होता.. ट्रेन धावत होती.. नुकत्याच झिमझिमलेल्या पावसात आणि घामात ओला होत मी कशीबशी विडो सीट पकडून व्हीटी ते डोंबिवली प्रवासाला निघालो..
कानात रेडिओ वाजत होता..
ए जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर इक गम को, गले से लगाया है.. है ना?
या गाण्यातलं है..ना?
या दोन एकाक्षरी शब्दावर मी थांबलो..
हरवलो स्वत:त..
कोण कुठला मी, जिंदगीचं बोट पकडून एक दिवस व्हाया पुणे असाच मुंबईत आलो..
मला कुठं शाहरुख खान व्हायचं होतं?
मी तर साधा इंजिनिअर..
एका वर्तमानपत्रात काम मिळालं, कळकट कम्प्युटर दुरुस्त करण्याचं..
ते दुरुस्तीच्या पलिकडे होते, पण चालत- बिघडत होते म्हणून माझी नोकरी टिकलेली होती..
पुढं ती सोडली, दुसरी धरली, मग तिसरी..
नोकऱ्या बदलत, घरं बदलत टिकलो या मुंबईत आणि आता डोंबिवली मजासवाडीत एक वनरुम किचन स्वत:च्या नावावर करुन घेत मजास दाखवतो, मिजास मिरवतो आणि मुंबईत घर आहे आपलं म्हणून माज करतो..
मी इंजिनिअर आहे म्हणून नाही तर डोंबिवलीत मालकीचं वनरुम किचन आहे म्हणून स्थळांची रांग लागलीये सध्या..
एका गाण्याच्या ओळीनं भूत-भविष्य-वर्तमान जागं केलं म्हणून मी स्वत:त हरवत बसलो.. एकटेपणा गेला आणि आपण कुठून कुठं पोहचलो म्हणून पाहिलं..
अर्थात फार लांब नाही, मुंब्रा आलं होतं..
दिवा पुढेच होतं..
आमच्याही आयुष्यात अजून बरेच दिवे, कल्याण, डोंबिवली बाकी आहेत..
आगे का आगे..
तबतक ए जिंदगी गले लगा ले..
( मुंबईत एकेकट्या राहणाऱ्या माझ्यासारख्यांच्या डायरीतलं हे एक ओलसर पान..)
अजय मालूसरे