क्या कश्मिरीयों को आप अपना मानते है?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 08:00 AM2019-02-28T08:00:00+5:302019-02-28T08:00:05+5:30
बेरोजगारी प्रचंड ! हात रिकामे, डोक्याला खुराक नाही ! ‘शांतता’ असली तर थोडंफार क्रिकेट किंवा फुटबॉल; पण अंगातली रग जिरेल आणि डोक्यातला अंगार विझेल यासाठी काहीच नाही.
- समीर मराठे
पथराव, हिंसाचार, जाळपोळ, निदर्शनं, संप, हरताळ, कफ्यरू, गोळीबार, ‘आजादी’चे नारे. या सार्या गोष्टी काश्मीरला नव्या नाहीत. काश्मीरमधलं पेटलेलं बर्फ विझलं असं फारसं कधी झालं नाही. कुठल्या ना कुठल्या कारणानं हे बर्फ पेटलेलंच राहातं आणि मग पुन्हा ते शांत होण्याचं नाव घेत नाही. काश्मीर पेटलं की वादविवादांच्या चर्चानी मग अख्खा भारतही पेटतो.
पुलवामा हल्ल्याच्या निमित्तानं आताही काश्मीर पेटलेलंच आहे आणि त्याचा वणवा भारतभर पसरू लागलाय. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे हे निश्चित; पण काश्मिरी तरुणांची यासंदर्भात भूमिका काय, यावरही चर्चा झडताहेत.
कोणी काश्मिरी तरुणांच्या बाजूनं उभं राहातंय, ते आपलेच म्हणून त्यांची पाठराखण करतंय, तर कुणाला दिसेल त्या काश्मिरी माणसावर ‘गद्दार’ असा शिक्का मारायची घाई झालीय.
देशभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकायला आलेले काश्मिरी तरुण या रागाचा मारा झेलत आहेत. त्यामध्ये पंतप्रधानांची खास शिष्यवृत्ती मिळवून उच्चशिक्षणासाठी आलेले गुणवंत तरुण विद्यार्थीही यात भरडले जात आहेत आणि तिकडल्या शांततेला कंटाळून आपली रोजीरोटी कमवायला म्हणून आलेली कुटुंबंही !
- काही तरुणांनी पुन्हा खोर्याचा रस्ता धरलाय, तर बर्याच तरुणांनी आहे तिथेच राहाण्याचा निर्णय घेतलाय ! आपल्याला काही होणार नाही, कोणी आपल्याला काही करणार नाही या पूर्वानुभावर आणि भरवशावर.
दोन्ही प्रकारच्या समज आणि अपसमजाला जागा आहे, तसंच त्यासंदर्भातले ठोस मुद्देही.
या पाश्र्वभूमीवर खोर्यात काही ठरावीक भेटीत, काही ठरावीक ठिकाणी मर्यादित प्रमाणात दिसलेला काश्मिरी तरुण नेमका कसा होता, याची ही काही निरीक्षणं.
***
2010ला मी पहिल्यांदा काश्मीरला गेलो, त्यावेळीही काश्मीर पूर्वीसारखंच धडधडून पेटलेलं होतं. कारणं वेगळी होती; पण उद्रेक तोच, संताप तोच आणि हिंसाचारही तसाच.
जवळपास वर्षभर काश्मीर पेटलेलं होतं. हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले होते. दगडफेक सुरू होती. पोलीस, जवान जखमी होत होते. गोळीबारात काही तरुण ठार झाले होते. प्रतिक्षिप्त क्रिया दोघांकडूनही सुरू होती. शाळा, कॉलेजेस बंद होती, फुटीरतावाद्यांकडून चिथावणी देणारी भाषणं सुरू होती. सगळीकडे कफ्यरू होता, कफ्यरू नसला तर हुर्रियत कॉन्फरन्सचे ‘हरताळ कॅलेंडर’ गल्लीबोळात लागले जात होते आणि त्यावेळी रस्त्यावर येण्याची, आपापली कामं सुरू ठेवण्याची हिंमत कोणातच नव्हती.
काश्मीरमधल्या तरुणांना नेमकं हवंय तरी काय, का होतोय त्यांच्या संतापाचा उद्रेक हे पाहताना अनेक तरुणांशी बोलणं झालं.
दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावेळी पाहायला, ऐकायला मिळाल्या. ‘इंडिया’, ‘हिंदुस्थान’च्या विरोधातल्या आणि प्रखर राष्ट्रवादीही..
काश्मिरात त्यावेळी भेटलेल्या तरुणांमध्ये भारतविरोधी प्रतिक्रिया फारशा आढळल्या नाहीत. ‘हिंदुस्थानी’ हमें अपना मानते नहीं’, ही त्यांची प्रमुख तक्रार. पाकिस्तानच्या बाजूचीही एकही प्रतिक्रिया त्यावेळी ऐकायला मिळाली नाही. उलट बहुतेकांचं म्हणणं होतं, ‘पाकिस्तान के खुद के खाने के लाले है, वो हमें क्या देगा?’.
‘पाकिस्तान को मारो गोली, हमने तो हिंदुस्थान का नमक खाया है, हम हिंदुस्थानी थे, है और मरते दम तक हिंदुस्थानीही रहेंगे’ अशी खुलेआम बेधडक राष्ट्रवादी प्रतिक्रिया देणार्या इकबालसारखे काही तरुणही तिथे भेटले.
2016ला परत काश्मिरात गेलो. यावेळीही तोच प्रकार. घोळक्या घोळक्यानं तरुण रस्त्यावर आलेले. घोषणा, निदर्शनं, संप, दगडफेक, गोळीबार, कफ्यरू..
अनेक ठिकाणी तर भर कफ्यरूतही तरुण दगडफेक करताना दिसले. रस्त्यावर घोळक्यानं उभं राहायचं. सायरन वाजवत जवानांची गाडी आली की क्षणार्धात पसार व्हायचं आणि त्यांची पाठ वळली की गाडीवर, जवानांवर दगडफेक करून क्षणार्धात गायबही व्हायचं.
पण दोन्ही दगडफेकीत एक प्रमुख फरकही दिसला.
दहशतवाद, आंतकवाद, हिंसाचार. यामुळे काश्मीर आणि काश्मिरी तरुण आधीच पोळलेले. त्यात शाळा बंद, कॉलेजेस बंद, खेळ बंद, करमणुकीचं एकही साधन नाही. हाताला काम नाही, डोक्याला खुराक नाही आणि विचारांना दिशा नाही. दिवसचे दिवस घरात. काही करमणूक करावी तर खोर्यात एकही चित्रपटगृहदेखील नाही. जी काही होती, ती आतंकवादामुळे बंद पडली, जाळली गेली, स्फोटात उडवली गेली. आजही श्रीनगरच काय, संपूर्ण काश्मीर खोर्यात एकही चित्रपटगृह नाही. आता इंटरनेट आहे; पण त्यावर बर्याचदा लगाम! टीव्ही आणि मोबाइल हीच करमणुकीची प्रमुख साधनं !
त्यात येता-जाता पालकांचा धोशा. इतका मोठा होऊनही पोरगा काही कामधाम करत नाही आणि घरात खाणारी तोंडं तर भरपूर; कमावता माणूस मात्र एकच. अशांत परिस्थितीमुळे आर्थिक ओढाताण कायमचीच, त्यातूनच घरातल्या वडीलधार्यांनी कामाचा आग्रह सुरू केल्यामुळे अनेक तरुणांनी हातात ‘दगड’ घेतले!
उत्स्फूर्तपणे हातात दगड घेतलेले तरुण त्यावेळीही होते; पण रस्त्यावरचे दगड वाढले, कारण या दगडांना ‘वजन’ होतं, ‘किंमत’ होती. सीमेपलीकडून आलेला पैसा म्हणजे या दगडफेकीचा दाम होता. दगडफेक हादेखील एक रोजगार होता !
अख्खं खोरंच पेटलेलं असताना हाताला काम तरी कसं असणार? पोटाची मारामार असल्यामुळेही अनेकांनी हा पर्याय त्यावेळी निवडला होता. पंचविशीच्या जमीलनं त्यावेळी स्पष्टच सांगितलं होतं, घर में अब्बाजान की गालियॉँ खाने से पत्थर फेकना कई बेहतर है!.
पण त्यामागे बेकारीचं असं आर्थिक कारणही होतं.
त्यावेळी काश्मीर युनिव्हर्सिटीत भेटलेल्या तरुणींशी झालेलं बोलणं आठवतंय.
अफरोज, नगिना आणि मसरत. तिघीही उच्चशिक्षित, तिघीही शाळेत शिक्षिका. पगार महिना दोन-अडीच हजार रुपयेच होता; पण त्याविषयी त्यांची फारशी तक्रार नव्हती.
हातात दगड घेतलेल्या काश्मिरी तरुणांविषयी त्यांचं म्हणणं होतं, ‘वो क्या कर रहे है, क्या चाहते है, वो उन्हे खुद को ही पता नहीं है. हालात कब बदलेंगे, हमें भी नहीं पता, जिम्मेदार नहीं बन सकते, लेकिन गैरजिम्मेदार तो मत बनो!.’
‘हालात’ आतातरी बदललेत का? काश्मिरी तरुणांची आज काय परिस्थिती आहे?
तुलनात्मकदृष्टय़ा त्यात फारसा फरक पडलेला नाही. बेरोजगारी तशीच आहे. हात अजूनही रिकामेच आहेत, डोक्याला खुराक अजूनही नाहीच. ‘शांतता’ असली तर थोडंफार क्रिकेट किंवा फुटबॉल; पण अंगातली रग जिरेल आणि डोक्यातला अंगार विझेल यासाठी काहीच नाही.
काश्मीरमध्ये पर्यटन हा सर्वासाठीच प्रमुख व्यवसाय. तोच त्यांचा प्रमुख रोजगार. मोठे उद्योग नाहीत, मोठय़ा कंपन्या नाहीत, सततच्या हिंसाचारामुळे शिक्षणावरही त्याचा परिणाम झालेला!
काश्मिरात हुशार, होतकरू तरुणांची कमी आहे असं नाही. डॉक्टर, इंजिनिअर, पीएच.डी.. असे असंख्य तरुण तिथे दिसतात; पण नोकर्या नाहीत. ज्यांची ऐपत आहे, त्यांनी काश्मीरलाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. काहीजण भारतात इतरत्र शिकायला, नोकरीसाठी आलेत, तर मोजक्या काहींनी थेट देशच सोडून अमेरिकेसारख्या देशांना प्राधान्य दिलंय.
पण या सार्यांचं तेव्हाही तेच म्हणणं होतं, आजही तेच आहे. रोजरोजच्या हिंसाचारानं, दहशतीनं आम्ही त्रासलोय, गांजलोय. त्रास देणारे, बॉम्बस्फोट घडवणारे दुसरेच; हाताच्या बोटावर मोजण्याइतके; पण त्याची शिक्षा आम्हाला मिळतेय. बॉम्बस्फोट अतिरेक्यांनी, आतंकवाद्यांनी केले. त्यांना ना जात असते, ना धर्म असतो, ना पंथ, ना भूमी.. आतंकवाद्यांना सजा मिळालीच पाहिजे, पण असं काही झालं की सरसकट सगळ्यांनाच धारेवर धरलं जातं. सगळेच ‘गुन्हेगार’! रोज उठून तलाशी आणि संशयी नजरा. आपल्याच देशाची आर्मी आपल्याच लोकांविरुद्ध वापरली गेली. आर्मीचं, लष्कराचं काम अशा लोकांना हुडकण्याचं, त्यांचा बंदोबस्त करण्याचं, सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करण्याचं; पण आपल्याच लोकांसाठी त्यांना वापरलं जातं.
काश्मिरातील एक कार्यकर्ते, लेखक फिरदोस मंजूर यांचं म्हणणं होतं, आपली धोरणं चुकीच्या पद्धतीनं राबविली जातात. काश्मिरींना आपलं म्हणेल, त्यांनाही आपलंसं वाटेल, अशी धोरणंच राबविली जात नाहीत. आर्मी का ओव्हरयूज किया गया, अपने ही लोगों के खिलाफ उन्हें बारबार इस्तेमाल किया गया. इसलिए नौजवानों के मन से मौत का खौफ भी कम हो गया. काश्मिरातील खदखद लवकर शांत होत नाही, ती यामुळेच.
‘पथराव’ करणारे आम्हीच, जवानांना जखमी करणारे आम्हीच, ‘देशद्रोही’ आम्हीच, त्यामुळे रोज उठून कफ्यरू, तलाशी, झडती. तीही आमचीच. कायम संशयाची ही भावनाच आम्हाला जास्त छळते, असं या तरुणांचं म्हणणं आहे.
***
..पुरा कश्मीर तो गद्दार नहीं हो सकता ना?
पुलवामा हल्ल्यानंतर काही काश्मिरी तरुणांशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं होतं, आम्हाला चांगला रोजगार नाही, नसू देत; चांगलं शिक्षण नसलं, नसू देत. त्यानं फारसा फरक पडत नाही. अभावात जगणारे आणि शिक्षण घेणारे आम्ही एकटेच नाहीत. देशभरात, सगळ्या प्रांतात, सगळ्या भागात असे लोक असतील, आहेत; पण आम्हाला ‘आपलं’ म्हणणारे लोक कमी झाले आहेत. सगळीकडे नुसता संशय आणि संशय ! इतरवेळी ते फारसं जाणवत नाही; पण काश्मिरात काही झालं की लगेच आमच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उमटवलं जातं. काश्मिरी आणि त्यात मुसलमान म्हटलं की लगेच आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आम्हाला राहायला जागा देण्यासाठी कोणी धजावत नाही. कॉलेजला अॅडमिशन देतानाही दहादा विचार केला जातो. इतरांबाबत हा भेदभाव देशात कुठे दिसत नाही. वर्षानुवर्षाची नाकारलेपणाची ही भावनाच आम्हाला जास्त त्रस्त करते.
‘कश्मीर को हिंदुस्थान का ताज मानते हो, कश्मीर की इंच इंच भूमी हिंदुस्थान की मानते हो, लेकिन क्या कश्मिरीयों को हिंदुस्थानी अपना मानते है?, असा सवालही हे तरुण आपल्यापुढे उभा करतात.
‘कश्मीर में 60 साल से जो हो रहा है, वहॉँ पर जो अनरेस्ट है, उसका क्या नतिजा निकला, निकाला गया? - हर एक कश्मिरी गद्दार है ! एक आदमी गद्दार हो सकता है, दो हो सकते है, दस हो सकते है, लेकिन पुरा कश्मीर तो गद्दार नहीं हो सकता ना? होगा भी कैसे?.
- हे तरुण आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तरही तेच देतात.
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उप-वृत्तसंपादक आहेत.)
sameer.marathe@lokmat.com