जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे, असं वाटतं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:35 PM2019-04-11T17:35:10+5:302019-04-11T17:36:12+5:30
राजकारणाची दिशा बदलते आहे यावर निम्म्या मुला-मुलींचा विश्वास आहे . मुली जास्त आशावादी! दोघांच्याही मनातलं कन्फ्यूजन मात्र सारखंच!
-ऑक्सिजन टीम
अभ्यासिका की मंदिराचा जीर्णोद्धार?
दांडिया आयोजन की तरुणांसाठी वाचनालय? स्पर्धा परीक्षा सराव शिबिरं?
हे असे प्रश्न घेऊन गावात तरुण मुलांच्यात होणारे वाद नवे नाहीत. गावातलं ‘राजकारणाचं’ पारडंही कधी इकडं झुकतं तर कधी तिकडे.
मत देतानाही तरुण मुलं हाच विचार करतात का?
एकीकडे आपल्या रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे हे त्यांना मान्यच आहे मग तरी जाती-धर्माच्या अस्मितेचे प्रश्न टोक काढतात ते का?
40 टक्के तरुण-तरुणी सांगतात की हो, जात-धर्म हाच राजकारणाचा आधार आहे असं आम्हाला वाटतं, तर हे विधान काय सांगतं?
आपल्या अवतीभोवतीचं चित्र बदलत आहे असं हे तरुण सांगतात की, त्यांची तशी अपेक्षा आहे?
त्याच्या अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायला हवं, मात्र ही आकडेवारी सांगते ते धक्का देणारं आहेच.
याबाबतीत तरुणी मात्र तरुणांपेक्षा जास्त आशावादी दिसतात. राजकारणात असलेलं जाती-धर्माचं वर्चस्व यापुढील काळात सरसकट चालू राहणार नाही असं त्यांना वाटतं.
वास्तव आणि अपेक्षेचा तोल साधताना तरुणाईची कसरत होतेय, हे नक्की.
समाजातल्या बदलांचा या मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होताना स्पष्ट दिसतो आहे.
एकूण प्रतिसाद काय सांगतो?
* हो, हे खरं आहे! - 36.12 %
* नाही, परिस्थिती बदलते आहे - 48.42 %
* नक्की सांगता येणार नाही - 13.30%
* यापैकी नाही - 2.06%
एकूण सहभागींपैकी 2.16 % तरुण-तरुणींनी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही.
मुली म्हणतात
* हो, हे खरं आहे!- 30.82 %
* नाही, परिस्थिती बदलते आहे - 54.87%
* नक्की सांगता येणार नाही- 13.45 %
देशातल्या राजकारणाची प्रत बदलत असल्याचा आशावाद मुलींमध्ये अधिक दिसतो. परिस्थिती बदलते आहे, असा विश्वास व्यक्त करणार्या मुलींची संख्या मुलांपेक्षा तब्बल 13 टक्के जास्त आहे; पण हेही खरं, की ‘नक्की सांगता येणार नाही’ असा गोंधळही मुलींच्याच मनात अधिक दिसतो.
मुलगे म्हणतात
* हो, हे खरे आहे! - 41.45 %
* नाही, परिस्थिती बदलते आहे - 41.93%
* नक्की सांगता येणार नाही _ 13.14 %
तब्बल 4.8 टक्के तरुणांनी या प्रश्नाचे उत्तर देणंच टाळलेलं आहे.
जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे की परिस्थिती बदलू लागली आहे; यावरून मुलांचे सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात.
2009 - ओन्ली फॉर अॅडल्ट्स :
दहा वर्षात नेमकं काय बदललं?
दुर्दैव असं, की
काहीच बदललं नाही!
*जात-धर्माचं राजकारण या देशात होतंच असं सांगणारे तरुण तेव्हाही सांगत होते की यापुढे विकासाचे प्रश्न महत्त्वाचे होतील आणि जात-धर्मावरून मत देणं कमी होईल.
* तेव्हा तर सव्र्हेत सहभागी 36 टक्के तरुण सांगत होते की या देशात जाती-धर्माचं राजकारण यशस्वीच होणार नाही.
* जात किंवा धर्माला व्होट बॅँक म्हणून गृहीत धरणं बंद करा, विकासाचं बोला असंच दहा वर्षापूर्वीचा तो सव्र्र्हेही सांगत होता.