तुमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, असं वाटतं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 04:41 PM2019-04-11T16:41:43+5:302019-04-11T16:44:18+5:30
सामूहिक लोकशाहीवर पक्का विश्वास; पण व्यक्तिगत स्तरावर हतबलता मुलांना वाटतं, नागरिकांच्या ‘मता’ला ‘किंमत’ अर्थातच आहे; पण ‘माझ्या एका मता’ला ती आहे का, याविषयी मात्र शंका!
-ऑक्सिजन टीम
बाईच्या जातीला काय कळतं राजकारण, बाईची अक्कल चुलीपाशी, असं थेट आता कुणी म्हणत नसलं आणि निदान स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण असलं तरी ‘राजकारण’ बाईमाणसाचं काम नाही असं तरुण मुलींच्या मनातही आजही कुठंतरी खोल रुजलेलं असेल का?
वाचायला त्रासदायकच वाटली ही वाक्यं तरी निदान ही आकडेवारी तरी असंच सांगते. इथं तरुण मुलं ठामपणे म्हणतात की आमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, त्या मताची ताकद सत्ता उलथून टाकू शकते.
मात्र मुली? त्यांच्या म्हणण्यात तो ठामपणा नाही.
बिचकल्याच बहुतेक मुली या प्रश्नावर आणि एका प्रश्नानं त्यांच्या मनात अनेक गोष्टींचं काहूरही माजलं असावं. तसं नसतं तर 20 टक्के मुलींनी हा प्रश्नच स्किप का मारला असता? मुलींनी उत्तरच दिलं नाही; पण त्यांचं उत्तरच न देणं जास्त बोलकं आहे.
2019 साली प्रगत म्हणवणार्या महाराष्ट्रात 20 टक्के मुली या प्रश्नाचं उत्तरच टाळतात की, आपल्या एका मताला किंमत आहे की नाही?
कदाचित आपल्या मताला किंमत नाही, असाच त्यांचा अनुभव असेल?
किंवा
बाईच्या जातीनं शक्यतो आपलं मत मांडूच नये, गप्पच रहावं असं त्यांच्यावर बिंबवण्यात आलं असेल.
किंवा
मत मांडलं की येणारी जबाबदारी त्यांना नाकारायची असेल?
उत्तर काहीही येवो, ते वास्तव अस्वस्थ करणारंच असेल.
अजून एक म्हणजे राजकीय निर्णयप्रक्रियेत महिलांच्या मताची किंमत याचाही एक आरसा ही आकडेवारी दाखवते. आजही घरोघर कर्ते पुरुष सांगतील त्याच उमेदवाराला/पक्षाला घरातल्या बायकांना मत द्यावं लागतं असं उघड सिक्रेट चर्चेत असतंच.
त्यामुळे आपल्या मताला ‘किंमत’ ती काय असा प्रश्न मुलींना पडत असेल.
आणि म्हणून अवघड प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा तो प्रश्न स्किप मारणं जास्त सोपं जात असावं. मात्र स्किप मारण्यातली ‘कळ’ आणि ‘सल’ मात्र ठसठसणारी आहेच !
****
एकूण प्रतिसाद काय सांगतो?
* अर्थात, किंमत आहे - 62.78%
* माझ्या एका ‘मता’ला काहीही किंमत नाही - 15.38 %
* नक्की सांगता येत नाही - 10.86 %
एकूण सहभागींपैकी 10% तरुण-तरुणींनी
या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.
------------------------------------------
मुली म्हणतात
* अर्थात, किंमत आहे - 53.24 %
* माझ्या एका ‘मता’ला काहीही किंमत नाही - 14.40 %
* नक्की सांगता येत नाही - 12.40%
एकूण सहभागींपैकी तब्बल 20% तरुणींनी
या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.
मुलांमध्ये हे प्रमाण अवघं 2.2% एवढं आहे.
-----------------------------------------------
मुलगे म्हणतात
* अर्थात, किंमत आहे - 72.36 %
* माझ्या एका ‘मता’ला काहीही किंमत नाही - 16.31 %
* नक्की सांगता येत नाही - 9.31 %
एरवीही आपल्या मताला ‘किंमत’ असण्याचा अनुभव
मुलींपेक्षा मुलांच्याच वाटय़ाला अधिक येतो.
त्याचेच स्वच्छ प्रतिबिंब या प्रश्नाच्या प्रतिसादात पडलेलं दिसतं.
***
2009 : ओन्ली फॉर अॅडल्ट्स -
दहा वर्षात नेमकं काय बदललं?
‘मता’ची किंमत तेव्हा कमी वाटत होती,
आता नाही!
*तरुण मतदार कुणाच्या मागे, कुणाबरोबर जाणार, त्यामुळे राजकीय समीकरणं बदलणार का? हा प्रश्न तेव्हाही राजकीय पक्षांना जेरीस आणत होताच.
मात्र तेव्हा चित्र असं होतं की सर्वेक्षणात सहभागी जवळपास 40 टक्के तरुण-तरुणींना वाटत होतं की, आपल्या मताला लोकशाहीत काही किंमत नाही. आपल्या एका मतानं काही घडत-बिघडत नाही.