तुम्ही उमेदवार पाहून तुमचं मत देणार की पक्षाला मत देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 04:49 PM2019-04-11T16:49:20+5:302019-04-11T16:52:26+5:30
प्रथम मतदान करणारे मतदार अखेरच्या क्षणार्पयत कुंपणावर असतात, या पारंपरिक समजाला तडा र् मत कुणाला द्यायचं ते अद्याप ठरलेलं नाही असे तरुण मतदार सरासरी 15 टक्क्यांच्या आत. मुलींचं ‘कन्फ्यूजन’ मुलांपेक्षा थोडं अधिक!
-ऑक्सिजन टीम
‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’.नुसत्या ‘चमत्कारा’ला भुलून आम्ही तुम्हाला ‘नमस्कार’ घालणार नाही हे तरुणांनी प्रत्येक क्षेत्रात आजवर दाखवून दिलं आहे. त्याचंच प्रत्यंतर आता राजकारणातही दिसतं आहे.
यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदारांचा टक्का आजवरच्या सर्वच निवडणुकांमध्ये सर्वाधिक आहे. अशावेळी सर्वाचाच या तरुण मतदारांवर डोळा असणंही साहजिकच, पण त्या सर्वाना हे तरुण मतदार बजावताहेत, आधी आपली लायकी सिद्ध करा आणि त्यानंतरच आमच्याकडे मत मागायला या. तुमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा असेल; पण आमच्यासाठी तुमची पत, लायकीच तुमचं प्रगतिपुस्तक आहे. या प्रगतिपुस्तकातला तुमचा इतिहास आणि वर्तमान जर काही वेगळंच सांगत असेल, तर तुमची काही खैर नाही.
नुसत्या नावाला, परंपरेला आणि पक्षाला आम्ही भुलणार नाही, तर तुम्हाला तुमचं कर्तृत्व आधी सिद्ध करावं लागेल. राजकीय पक्षांनाही एक प्रकारे हा इशाराच आहे. तुम्ही जर चांगले उमेदवार दिले नाहीत, तर या देशावर राज्य करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही असं हे पहिल्यांदाच मत देणारे नवमतदार ठणकावून सांगताहेत.
‘लायक’ उमेदवारच आम्हाला कोणी दिसत नाही असंही अनेकांचं मत आहे. मतच देणार नाही किंवा ‘नोटा’चं बटन दाबू असं मात्र त्यांचं ठरलेलं नाही.
मात्र उमेदवार ‘लायक’ नाहीत असं म्हणणारे अनेकजण आहेत.
तरुणांची ही भाषा जर पक्ष आणि उमेदवारांना नीटपणे कळली तर ठीक, नाहीतर अवघड आहे.
एकूण प्रतिसाद काय सांगतो?
* उमेदवार कोण आहे, ते महत्त्वाचं! - 64.69 %
* पक्षाला मत देणार - 19.57 %
* कोणाला देणार, ते अजून ठरवलेलं नाही - 13.59 %
एकूण सहभागींपैकी 2.15 % तरुण-तरुणींनी
या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.
--------------------------------------------------------
मुली म्हणतात
* उमेदवार कोण आहे, ते महत्त्वाचं! - 64.41 %
* पक्षाला मत देणार - 17.56 %
* कोणाला देणार, ते अजून ठरवलेलं नाही. - 16.12 %
निवडणूक तोंडावर आली, तरी कुणाला मत देणार
याचा निर्णय न झालेल्या तरुण मतदारांमध्ये
मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.
-----------------------------------------------
मुलगे म्हणतात
* उमेदवार कोण आहे, ते महत्त्वाचं!- 64.97 %
* पक्षाला मत देणार - 21.59 %
* कोणाला देणार, ते अजून ठरवलेलं नाही - 11.3 %
राजकीय पक्षांना ‘कमिटेड’ असण्याची वृत्ती
तरुण मुलांमध्ये मुलींपेक्षा अधिक दिसते.
कोणाला मत द्यायचं याबाबतचं कन्फ्यूजनही
मुलांमध्ये कमी आहे.
***
2009 : ओन्ली फॉर अॅडल्ट्स -
दहा वर्षात नेमकं काय बदललं?
‘पक्षा’चं महत्त्व आणखी घटलं!
* घराणेशाही काही फक्त राजकीय पक्षांचीच नाही तर मतदारांचीही होतीच, अमुक एका जातीची, धर्माची मतं तमुकच पक्षाला असा हिशेब 2009 सालीच तरुण मतदारांनी नाकारला होता. राजकीय पक्षांचीच नाही तर घरातलीही पारंपरिक मतदानाची घराणेशाही मोडणार असल्याचं सांगितलं होतं. म्हणून तर तेव्हा 77 टक्के तरुण सांगत होते की, मत उमेदवार पाहूनच देणार. पक्ष, पक्षाप्रति निष्ठा नंतर, उमेदवार कसा तेच मत देताना महत्त्वाचं.
* पण मग दहा वर्षात असं काय बदललं की, आज फक्त 60 टक्केच तरुण मतदार उमेदवार महत्त्वाचा म्हणतात आणि 20 टक्केंना पक्ष महत्त्वाचा वाटतो आणि 20 टक्केंचं अजून काहीच ठरलेलं नाही. हे कुंपणावरचे मतदार नक्की काय विचार करत असतील?