मतदार यादीत तुमचं नाव आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:06 PM2019-04-11T18:06:54+5:302019-04-11T18:09:17+5:30
16 टक्के मुलामुलींचं मतदार यादीत नावच नाही. 17 टक्क्यांनी नोंदवलं तर होतं; पण नाव यादीत आलं की नाही, हे पाहिलेलं नाही. मुलं आळशी; पण त्यांच्या दुप्पट मुली आळशी!
-ऑक्सिजन टीम
बोगस आहे आपली सिस्टीम.
बोगस आहे यंत्रणा. राजकारणी तर काही कामाचे नाहीत, लोकांना फसवतात. राजकारण म्हणजे गलिच्छ काम. आमच्या शिक्षणाचं बोला, उगीच जातीधर्माचं राजकारण करू नका.
- केवढा तो संताप तरुण मतदारांचा. वयाची नव्हाळी, बंडखोरी सगळंच मान्य. सोशल मीडियातून झालेली ज्ञानप्राप्ती तर अनेकांना ‘एक्सपर्ट’च बनवते.
त्यामुळे सगळ्या विषयांवर हे तरुण हजरजबाबी.
मग सगळे प्रश्न विचारून झाल्यावर प्रश्नावलीत तळाशी एक प्रश्न होता.
- तुमचं नाव आहे का मतदार यादीत?
ंहा गुगली आहे, हे अनेकांना कळलंच नाही. आणि तिथंच विकेट गेली आपली ते ही कळलं नाही.
अर्थात तरुण मतदारांनाच दोष देण्याचं कारण नाही, आपल्या समाजाचं हे तरुण वास्तव आहे. अपेक्षा ढीगभर, कर्तव्याचं काय?
मतं सगळ्यांना, कृती करायची वेळ आली की पाऊल मागे. केवळ लाइक मारले, फॉरवर्ड केले म्हणजे आपली सामाजिक जबाबदारी पार पडली असं होत नाही याचंही भान सुटत चालल्याचं हे लक्षण आहे.
किती ती रोखठोक मतं.
पण मग साधा प्रश्न येतो की, या देशात लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हायचं तर तुमचं नाव आहे का मतदार यादीत? मत देऊन सरकार निवडण्याची ताकद आहे का तुमच्याकडे? लागणार का बोटाला शाई?
तर जेमतेम 50 टक्के म्हणतात की हो आमचं नाव मतदार यादीत आहे.
बाकीचे निवांत. ते म्हणतात, नोंदवलं होतं; पण आलंय की नाही नाव यादीत हे माहिती नाही. पाहू तेव्हाचं तेव्हा. आणि नसेल नाव मतदार यादीत तर करू फेसबुकवर स्टेटस अपडेट की, बघा ही बेजबाबदार यंत्रणा, आमचं नाव नाही यादीत.
पण ऑनलाइन जाऊन एका क्लिकवर नाव आहे की नाही याची वेळेत खात्री करणार नाहीत. एरव्ही नाही म्हणायला ही जनता सतत ऑनलाइनच असते.
ज्यांनी मतदार यादीत नावच नोंदवलं नाही ते कोडगेपणानं सांगतात, की नाहीये नाव, त्यात काय?
आणि मुली.
त्या तर जास्तच आळशी.
हा हू केअर्स अॅटिटय़ूड फक्त मतदानापुरता आहे की, एकूण जगण्यालाच?
एकूण प्रतिसाद काय सांगतो?
* हो, आहे! - 64.78 %
* नाव नोंदवलं होतं; पण आलं का ते माहिती नाही - 16.75 %
* मतदार यादीत नाव नोंदवलंच नाही - 15.84 %
या चर्चेत हिरिरीने उतरलेल्यांपैकी 32 टक्के मुला-मुलींचं नाव एकतर मतदार यादीत नोंदवलेलंच नाही, किंवा नोंदवलेलं होतं; पण ते प्रत्यक्षात यादीत आलं का, हे पाहण्याची तसदी या मुलांनी घेतलेली नाही.
--------------------------------------------------------
मुली म्हणतात
* हो, आहे! - 56.77 %
* नाव नोंदवलं होते; पण आले का ते माहिती नाही - 21.47 %
* मतदार यादीत नाव नोंदवलेलंच नाही - 19.75 %
‘फस्र्ट टाइम व्होटर’ असलेल्या तरुण मुलींच्या निष्क्रिय आळशीपणाचा पुरावा देणारी आकडेवारी. याबाबतीत मुलांच्या तुलनेत मुलींना आपले ‘ढू’ हलवून थोडे कष्ट घेणं जमलं नसल्याचं दिसतं. मतदार यादीत नाव नोंदवलेल्यांच्या आकडेवारीत मुली मुलांपेक्षा तब्बल 16 टक्क्यांनी कमी आहेत. आणि ‘नाव नोंदवले तर होते; पण ते यादीत आले का माहिती नाही’, असे सांगणार्या मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे!
मुलगे म्हणतात -
* हो, आहे!- 72.84 %
* नाव नोंदवले होते; पण आले का ते माहिती नाही - 12 %
* मतदार यादीत नाव नोंदवलेलंच नाही - 12 %
मतदार यादीत नाव नोंदवण्याची जबाबदारी पार पाडण्याबाबत मुलांची कामगिरी मुलींपेक्षा फारच सरस दिसते. चर्चेत सहभागी असलेल्यांपैकी 72 टक्के मुलांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवलेली आहेत.