कर के देखो

By Admin | Published: August 25, 2016 04:59 PM2016-08-25T16:59:46+5:302016-08-25T17:29:45+5:30

तिकडे अमेरिकेत साशा ओबामाने समर जॉब सुरू केला आणि आपण गेल्या शुक्रवारी औरंगाबादच्या दोन मित्रांना भेटलो.

Look at | कर के देखो

कर के देखो

googlenewsNext

 
- मयूर देवकर

तिकडे अमेरिकेत साशा ओबामाने समर जॉब सुरू केला आणि आपण गेल्या शुक्रवारी औरंगाबादच्या दोन मित्रांना भेटलो. त्यातला एकनाथ गरजेपोटी नोकरी करून शिकत शिकत वर निघालेला आणि प्रसाद आरजे होण्याच्या वेडापायी रेडिओच्या स्टुडिओत ठाण मांडून बसलेला. अमेरिकेतली साशा ओबामा असो नाहीतर आपला औरंगाबादचा एकनाथ, नाहीतर प्रसाद; यांच्या स्टोऱ्या ‘आॅक्सिजन’ने इथे काही टाइमपास म्हणून नाही सांगितलेल्या.
हे वाचून तुमच्याही डोक्यात काहीतरी वळवळायला लागलं तर बरं असा एक विचार आहे त्यामागे.
- पण गोची अशी की तुमच्यातल्या अनेक वाचकांनी ईमेल करून, फोनवरून विचारलं की, ही आयडिया भारी आहे; पण मी करू काय राव? कॉलेज-क्लासेस-ट्युशनच्या टाइमटेबलमधून वेळ काढून मी करणार तरी काय? 
...आता हे असं विचारण्यापेक्षा थोडं डोकं चालवलं तर दिसेल की, अभ्यास-कॉलेज सांभाळून सुट्या नसतानाही आपण खूप काही करू शकतो. उदाहरण द्यायचंच झालं तर आता आपल्याकडे सणा-समारंभाचा सिझन सुरू होतोय. थोड्याच दिवसात गणपती बसणार. 
गल्लीतील गणेश मंडळात सहभागी व्हा. सहभागी व्हा म्हणजे केवळ स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचणं नाही. उत्सवाच्या आयोजन-नियोजनात हिरीरीने पुढाकार घ्या. लाईटिंग, डेकोरेटिंग, मूर्तीचं बुकिंग, वर्गणी, ढोलपथक, स्पर्धांचे आयोजन अशी किती किती कामं करता येतील... आता हा काही जॉब नव्हे, पण एक सुरुवात होऊ शकेल.
गणेशोत्सवापासून थेट दिवाळीपर्यंतचा काळ मार्केटमध्ये मोठी धामधूम असते. या काळात छोटे-मोठे मॉल्स, कपड्यांपासून तयार खाद्यपदार्थांपर्यंतची दुकानं यांच्याकडे तात्पुरतं काम मिळू शकतं, ते शोधा.
तुमचं डोकं क्रिएटिव्ह असेल तर इव्हेंट मॅनेजमेण्टसारख्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकेल. शक्यता पुष्कळ आहेत. त्या या दिवाळीत गाठायच्या असतील, तर आत्तापासून शोधायला सुरुवात करायला हवी.
आपण मित्रमंडळी जमतोच ना कट्ट्यावर. मारतो ना इकडच्या तिकडच्या गप्पा. मग याविषयीदेखील बोलू ना. काय सांगावं, तुमच्यापैकीच कोणाला तरी भन्नाट आयडिया सुचेल. गाठू एखादी एनजीओ आणि दर रविवारी करू थोडी मेहनत. तुम्ही फक्त एकदा करून बघा. तुम्हालाच फरक जाणवेल. ते म्हणतात ना, ‘करके देखो, अच्छा लगता है!’



शिकता शिकता पार्टटाइम किंवा सुटीमध्ये काम करून पैसा तर मिळतोच पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं काहीतरी आपल्याला मिळतं. ते म्हणजे-

१. आत्मविश्वास : 
विद्यार्थिदशेत काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. आजच्या जगात ‘कॉन्फिडन्स इज द की’ असं म्हणतात. तो आतून असेल तर बाहेर दिसेल. ‘दोन पैसे कमवण्याची अक्कल’ आली की आपोआप आत्मविश्वास येतो. काम करत असताना येणारी विविध आव्हानं यशस्वीपणे पार केल्यावर कोणाच्या अंगावर मूठभर मांस चढणार नाही?

२. टाइम मॅनेजमेंट :
सुट्यांमध्ये घरी मस्तपैकी ताणून देता येईल पण त्याऐवजी कुठेतरी काम केल्यावर निदान वेळेचा सदुपयोग आणि व्यवस्थापन कसं करायचं हे कळेल. ‘सेल्फ-हेल्प’ बुक्समध्ये सर्वाधिक पुस्तके तुम्हाला टाइम मॅनेजमेंटवरच दिसतील. एकदा का वेळेचं गणित जमवता आलं तर ते संपूर्ण आयुष्यात कामी येईल. ‘टाइम इज मनी’ खरंय ना!

३. अनुभव :
स्पर्धेच्या युगात मिळेल तो अ‍ॅडव्हाण्टेज घेतला पाहिजे. कॉलेज संपल्यावर नोकरी शोधत असताना रेझ्युमवर ‘एक्सपेरियन्स’चा रकाना रिकामा चांगला वाटणार नाही. शिकत असतानाच जर काम केलं तर निदान रेझ्युममध्ये लिहायला इतरांपेक्षा एक गोष्ट जास्त असेल. तसेही, कुठल्याही कामाचा प्रॅक्टिकल अनुभव असलेल्या उमेदवाराला निवडण्यास कोणीही प्राधान्य देईल, नाही का?

४. स्व-ओळख :
बऱ्याचदा आपल्याला आपण काय आहोत हेच माहीत नसतं. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत, आपण नेमके कशात कमी पडतो हेच आपल्याला माहिती नसतं. मात्र जॉब केल्यामुळे स्वत:च्या क्षमतांची ओळख पटते. ‘आपण हे करू शकतो’ अशी सकारात्मक वृत्ती बळावते. कॉलेज आणि रिअल लाइफमधला खरा फरक कळतो. टीमवर्क, वर्क एथिक असे ‘करिअरवर्धक’ गुण बिंबवले जातात.

५. नेटवर्क :
कामाच्या ठिकाणी भविष्यात तुमच्या करिअरला ‘अप लिफ्ट’ देणारे लोक भेटतील. तुमचं प्रोफेशनल नेटवर्क निर्माण होईल. लहान वयातच इंडस्ट्रीच्या आतल्या वर्तुळात प्रवेश मिळवला तर चार ओळखी वाढतात. पुढे चालून याच ओळखींचा खूप फायदा होऊ शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या ‘रेफरन्स’चं महत्त्व काय हे जॉब करणाऱ्या तुमच्या मोठ्या भावंडांना विचारा.


..........................

Web Title: Look at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.