एमओशिप करके देखो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 09:57 AM2017-11-16T09:57:47+5:302017-11-16T09:57:53+5:30

ग्रामीण भागात जा, वर्षभर काम करा, मग समजेल डॉक्टर म्हणून आपण नक्की काय शिकलोय!

Look at MOShip! | एमओशिप करके देखो!

एमओशिप करके देखो!

Next

- डॉ. स्वाती देशमुख

मी नांदेडची. इथेच वाढले, शिकले. एमबीबीएस केलं तेही अत्यंत प्रतिष्ठित अशा मुंबईच्या ग्राण्ट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. हॉस्पिटलमधून. २०१२ ची ही गोष्ट. शिकत होतेच तेव्हाच मी ‘निर्माण’च्या एका उपक्रमात सहभागी झाले होते. त्यानिमित्तानं गडचिरोलीला गेले. वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थी म्हणून गडचिरोलीतले आरोग्याचे प्रश्न पाहिले तेव्हाच ठरवलं की एमबीबीएसनंतर एमओशिप अर्थात बंधपत्रित सेवा गडचिरोली जिल्ह्यातच करायची. जे ठरवलं त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यतील उपजिल्हा रुग्णालयात (एसडीएच) सेवेसाठी रूजू झाले. वर्षभर तिथं मी काम केलं.
आता एमओशिपचा विषय ऐरणीवर असताना मी माझ्या त्या अनुभवाकडे मागे वळून पाहते तेव्हा मला खूप समाधान वाटतं. माझ्या बंधपत्रित सेवेबद्दल मला जर कोणी १ ते १० च्या स्केलमध्ये मार्क द्यायला लावले तर मी नक्कीच मी माझ्या या अनुभवाला ९ गुण देईल. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या कुणाही विद्यार्थ्यांनं ही एमओशिप करावीच असं मला वाटतं. अभ्यासक्रमातील एक संधी म्हणून या एमओशिपकडे पाहायला हवं. ग्रामीण भागात प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर डॉक्टर म्हणून खूप शिकायला आणि अनुभवायला मिळतं. मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिपदरम्यान आपण फक्त कारकुनी कामं करतो. एमओशिपदरम्यान रुग्णांना तपासताना आणि त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर म्हणूनही बरंच काही शिकायला मिळतं.
अर्थात, ही एमओशिप पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. कधी कधी आपल्यासमोर माहीत नसलेल्या आजाराचे रुग्ण येतात तेव्हा त्यांच्यावर कसे उपचार करावेत तेच कळत नाही. पण जशा अडचणी असतात तसे पर्यायही असतातच. पण आता ग्रामीण भागातही वाय-फाय कनेक्टिव्हिटी असलेली सुसज्ज टेलिमेडिसिन सुविधा आहे. त्या अशा समस्यांच्या वेळेस उपयोगी पडतात. ग्रामीण भागात पटकन प्रतिसाद मिळत नाही; पण तरीही नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ डॉक्टर अशावेळी मार्गदर्शन, निदान, सल्ला अशी मदत करतातच.
ही एमओशिप पूर्ण केल्यानंतर सर्वसाधारण आजारांबद्दल माझ्या ज्ञानामध्ये वाढच झाली. हा सेवा करार पूर्ण केल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. मी आत्मविश्वासानं रुग्ण तपासू लागले, आणीबाणीचे प्रसंग हाताळू लागले. एमओशिप करताना मला सरकारकडून माझ्या सेवेचा चांगला आर्थिक मोबदलाही मिळत होता. हा सेवा करार पूर्ण करत असतानाच प्रसूतिशास्र आणि स्त्रीरोग अभ्यासातली माझी रूची वाढली. त्यामुळे मी माझ्या पीजीसाठी प्रसूतिशास्त्र हाच विषय निवडला. मी सध्या हैदराबाद येथे प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग अभ्यासक्रमाच्या तिसºया वर्षात शिकते आहे.
मी सध्या डीएनबीद्वारे पीजी करतेय म्हणून सांगावंसं वाटतं की हे म्हणणंच चुकीचं, की एमओशिपला एक वर्ष दिलं म्हणून पीजी लांबलं किंवा करताच आलं नाही. आम्ही अनेकजण एमओशिप करून आता पीजी करतो आहोत.
मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं की शासनानं हा बॉण्ड डॉक्टर पूर्ण करतील, ग्रामीण भागात वर्षभर सेवा देतील हे निकष आवर्जून पाळावेत. कारण ग्रामीण भागामध्ये साधन/सुविधा असतात; पण रुग्णांवर उपचार करायला मनुष्यबळ खूपच कमी पडतं. त्यासाठी डॉक्टरांनी हा बॉण्ड पूर्ण करायला हवा.
वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या मित्र -मैत्रिणींना मी आवूर्जन सांगेल की एकट्यानं किंवा ग्रुपनं ग्रामीण भागात आपली पोस्टिंग करून घ्या. टेलिमेडिसिनद्वारे संपर्कात राहा. आपल्या एमओशिपचा हा काळ डॉक्टर म्हणून तुम्हाला अत्यंत समृद्ध करेल.
पण त्यासाठी एमओशिप करके देखो!

(डॉ. स्वाती देशमुख सध्या डीएनबी निवासी डॉक्टर म्हणून हैदराबाद येथे प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)

Web Title: Look at MOShip!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.