भविष्यातील शास्त्रज्ञांचा शोध

By admin | Published: April 4, 2017 05:23 PM2017-04-04T17:23:23+5:302017-04-04T17:23:23+5:30

जागतिक हेरीटेज दर्जा असलेल्या सह्याद्रीमध्ये प्राण्यांची भरपूर विविधता आहे. परंतू सातत्याने सह्याद्री मध्ये होत असलेली जंगलतोड, विविध प्रकल्पांमुळे अधिवासांचा नाश, चोरटी शिकार इत्यादी विविध बाबींमुळेही प्राण्यांची विविधता धोक्यात आली आहे.

Looking for future scientists | भविष्यातील शास्त्रज्ञांचा शोध

भविष्यातील शास्त्रज्ञांचा शोध

Next

- सह्याद्रीच्या हाकेला तरुणांचा ‘अत्याधुनिक’ प्रतिसाद

जागतिक हेरीटेज दर्जा असलेल्या सह्याद्रीमध्ये प्राण्यांची भरपूर विविधता आहे. परंतू सातत्याने सह्याद्री मध्ये होत असलेली जंगलतोड, विविध प्रकल्पांमुळे अधिवासांचा नाश, चोरटी शिकार इत्यादी विविध बाबींमुळेही प्राण्यांची विविधता धोक्यात आली आहे.
या सर्व विषयाबाबत नविन पिढीला माहिती व्हावी, सह्याद्री मधे प्राण्यांची काय विविधता आहे हे जावळून पाहता यावे, त्यांना असलेल्या धोक्याची कल्पना यावी तसेच एकूणच त्यांचे निसर्ग साखळीतील महत्व व संवर्धनाची गरज या सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध संस्थांच्या प्रयत्नातून आकाराला येत आहे. ‘ई-मॅमल सीटीझन सायन्स’ असे या प्रकल्पाचे नाव आहे.
आयसीआयसीआय बँकेने पुरस्कृत केलेला व सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या वतीने नॉर्थ कॅरोलिना म्युझयिम आॅफ नॅचरल सायन्स, अमेरिका यांच्या सहकार्याने शाळाशाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यातील शास्त्रज्ञ बनवण्याचा हा एक प्रकल्प आहे. 
ई-मॅमल सीटीझन सायन्स प्रकल्प हा आपल्या गावात व आजूबाजूला असणा-या सस्तन प्राण्यांच्या अभ्यासाचा प्रकल्प असून त्यामध्ये सह्याद्रीतील सात जिल्ह्यातील २० शाळांतील आठवी व नववीचे विद्यार्थी आधुनिक ट्रॅप कॅमेरे, लॅपटॉप यांच्या वापरातून निरीक्षणे करणार आहेत. 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, सातारा व कोल्हापूर या सात जिल्ह्यातील २० शाळांची निवड या प्रकल्पात करण्यात आली आहे. सह्याद्री निसर्ग मित्र व बी.एन.एच.एस.चे कार्यकर्ते सातत्याने दोन वर्ष या शाळामध्ये भेट देतील. प्रत्येक शाळेला अत्याधुनिक स्वयंचलीत व रात्रीच्या अंधारात प्राण्यांची हालचाल होताच फोटो काढणारे तीन कॅमेरे, लॅपटॉप व प्रोजेक्टर पुरवण्यात आले असून ते चालवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 
हे विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या आजुबाजूला तसेच गावात विविध ठिकाणी हे कॅमेरे बसवतील. दर पंधरा दिवसानंतर त्यामध्ये येणारे फोटो हे लॅपटॉपच्या माध्यमातून ई-मॅमल या अमेरिकन अलायन्स आॅफ म्युझयिम्स, अमेरिका यांनी चालवलेल्या वेबसाईट्वर अपलोड करण्यात येतील. हा प्रकल्प सद्ध्या १९ देशांमध्ये राबवण्यात येत आहे. 
या प्रकल्पातून आपल्या भागात कोणकोणते प्राणी दिसतात हे समजून येईल व त्याबाबत इंटरनेटच्या माध्यमातून हे विद्यार्थी जिल्ह्यातील २० शाळांना संपर्क करू शकतील तसेच जगभरात चालू असलेल्या या प्रकल्पातील विविध विद्यार्थी गटाशी संपर्क करू शकतील. दोन वर्ष चालणा-या या प्रकल्पात दोन वेळा यामध्ये आलेल्या फोटोंचे प्रदर्शन मांडण्यात येणार असुन सर्व शाळांमध्ये निसर्ग सहली, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक पातळीवर पोचण्याची संधी या प्रकल्पातून प्राप्त झाली आहे.

Web Title: Looking for future scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.