लव्ह लोचा आणि हार्मोन्स! हार्मोन्सचा खेळ अकाली वयात आणतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 02:00 PM2019-02-14T14:00:17+5:302019-02-14T14:00:54+5:30
वजन भरभर वाढतंय, पाळी लवकर येतेय, शरीरात बदल दिसतोय आणि प्रेमात पडून सेक्शुअल ओढ वाढतेय हे सगळं ‘पटपट’ का होतंय?
-डॉ. यशपाल गोगटे
‘ मला वेड लागले प्रेमाचे’
किंवा
‘कहो ना प्यार है’..
या लोकप्रिय गाण्यांच्या ओळी कानावर पडल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हातात हात धरून बागेत फिरणारे लैला-मजनू येतात. प्यार किया नहीं जाता, हो जाता है असंही आपण म्हणतो. मात्र प्रेमाचं हे वेड लागतं त्याला कारणीभूत ठरतात आपल्याच शरीरातले हार्मोन्स!
म्हणजे दिलविलची गोष्ट असली तरी असते ती शारीरिक बदलांचीच गोष्ट. प्रेमात पडलेल्या युगुलांच्या शरीरात होणारा केमिकल लोचा अर्थात हार्मोन्स बदल हे सारी उलथापालथ करत असतात. अनेकदा त्यातून काही चांगल्या गोष्टी घडतात काही गडबड होते.
प्रेमाची भावना आणि जोडीनं राहाणं ही भावना मुख्यतर् सस्तन प्राणी व पक्षी यांच्यातच आढळते. सर्व प्रकारच्या प्रेमाचे मूळ हे मातृत्वाच्या भावनेतूनच निर्माण होतं. जन्मलेल्या बाळांसाठी आपोआपच आईचा पान्हा फुटतो. या क्रि येला मिल्क लेट डाउन रिफ्लेक्स असं म्हणतात आणि याकरता जबाबदार असतं हार्मोन ओक्सिटोसिन. पुढे जाऊन सर्व प्रकारच्या प्रेमभावना निर्माण होतात त्या या ओक्सिटोसिनच्या कमी-जास्त होणार्या प्रमाणामुळे. मेंदूच्या तळाशी वाटाण्याच्या आकाराच्या पिटय़ुटरी ग्रंथीतून हे हार्मोन तयार होतं. अर्थात शरीरातील संपूर्ण हार्मोनव्यवस्था ही प्रेमासाठी तत्परच असते.
मात्र लवकर वयात येणं, मुलींना पाळी लवकर येणं हेदेखील हार्मोनशीच संबंधित आहे. आता अगदी लहान वयात, किशोरवयीन मुलांचे अनेक प्रश्न दिसतात. पाळी लवकर येण्याची, वयात येण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण आहे वजन वाढणं. वजन वाढलं, होर्मोनल बदल झाले की पाळी लवकर येते. मात्र हाच एक बदल होत नाही तर त्यामुळे मानसिक असुरक्षितताही वाढीस लागते. तसंही मुली मुलांपेक्षा लवकर वयात येतात. आता शाळांत पाहिलं तर एकाच वर्गात बसलेल्या मुला-मुलींच्या वयात येण्याचा फरक लवकर लक्षात येतो. मुलींची चिडचिड तर वाढते; पण शारीरिक आकर्षण वाढीस लागतं, लैंगिक भावना उद्दीपित होता, एकाहून अधिक जोडीदार त्या आकर्षणापोटी शोधणं असंही सुरू होतं. त्याचवेळी मुलींच्या शरीरात झालेले बदल पाहता मुलांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.
हे सारं एकीकडे सुरू झालेलं असताना वजन वाढणं, ओबेसिटी हे प्रश्न निर्माण होतात. त्यातच पिंपल्स येणं, त्यांचं प्रमाण वाढणं, हार्मोनल असुंतलन त्यातून होणं, पीसीओडी हे सगळे आरोग्याचे प्रश्नही त्यातून निर्माण होतात. एकतर या वयात दिसण्याला अत्यंत महत्त्व असतं. पिंपल्स ही अत्यंत महत्त्वाची समस्या वाटते. आजही जगात तरुणांच्या आत्महत्येच्या कारणांत पिंपल्स हे नंबर 2 चं कारण आहे. या सगळ्याचा संबंध हार्मोन्सशी, बदलती लाइफ स्टाइल, वाढतं वजन, जंक फुड खाणं या सार्यांशी आहे. टीनएजर्समध्ये या सार्याचं प्रमाण वाढत आहे.
आणखी महत्त्वाचं म्हणजे वयात येण्याच्या या अडनिडय़ा वयात इंटरनेटसारखी माध्यमं आहे. लैंगिक ओढ, आकर्षण या सार्याविषयी शास्त्रीय माहिती न मिळता तिथं चुकीची माहिती मिळते, करून पाहण्याकडे कल वाढतो, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याखेरीज अकाली वयात येण्यासह डायबिटीस सारखे आजारही तारुण्यात मुलांना होऊ लागलेत. हार्मोन्स बदल आणि असुंतलन असं टीनएजर्सच्या जगात लव्ह लोचा करत आहे.
****
हा खेळ हार्मोन्सचा
* पिटय़ुटरी ग्रंथीतून निर्माण होणार्या ओक्सिटोसिनचा जोडीदार हार्मोन म्हणजे वॅसोप्रेसिन. याच बरोबर कार्यरत असणारी हार्मोन्सची दुसरी जोडगोळी ही सेरोटोनिन - डोपामिनची. मेंदूत तयार होणार्या या हार्मोन्सचे कार्यही कमी लेखता येणार नाही. या संपूर्ण व्यवस्थेला सक्रिय ठेवण्याकरता अॅड्रिनल ग्रंथीतून निर्माण होणारं कॉर्टिसॉल व जननग्रंथीतून निर्माण होणारे टेस्टोस्टेरॉनही तेवढेच जबाबदार ठरतात.
* शास्त्नीयदृष्टय़ा प्रेम हे तीन प्रकारे विभाजित केलं जाऊ शकतं. मातृप्रेम, प्रणय (रोमॅण्टिक लव्ह ) आणि बंधू-मित्नप्रेम. त्यानुसार शरीरातील विविध हार्मोन्स वेगवेगळ्या प्रेम प्रकारात सक्रिय होत असतात. मातृप्रेमासाठी गरजेचं हार्मोन हे ओक्सिटोसिन आहे.
* बंधू-मित्नप्रेम हे ऑक्सिटोसिन व डोपामिन यावर अवलंबून असतं. यात जिव्हाळा, आपुलकी व विश्वास अधिक असतो. या बंधू-मित्नप्रेमाचा अतिरेक म्हणजे प्रत्येक वेळेस फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट्सना मिळणार्या लाइक्स मोजणं. त्या अधिक असल्यास शरीरात डोपामिनचे प्रमाण वाढतं. अधीनता अर्थात अॅडिक्शनसाठी जबाबदार डोपामिन हे हार्मोन आहे, त्यामुळेच दारू, सिगारेट व तंबाखूसारखं फेसबुक-व्हॉट्सअॅपचंदेखील व्यसन लागू शकते.
* प्रणय अर्थात रोमॅण्टिक लव्ह ही भावना हार्मोनच्या दृष्टिकोनातून जटिल प्रकारात मोडते. या प्रेमाची सुरुवात ही ओक्सिटोसिनमुळेच होते, या बरोबरच कॉर्टिसॉल, सेरोटोनिन व टेस्टोस्टेरॉन हेदेखील सक्रिय होतात. हे हार्मोन्स या सुरुवातीच्या काळातील अनिश्चितता, उत्सुकता, असुरक्षितता अशा संमिश्र भावना निर्माण करतात. थोडक्यात ‘धड धड वाढते ठोक्यात’ अशी काहीशी अवस्था अनुभवाला येते.
* पुढे जाऊन हे प्रेम बहरलं व त्याचं रूपांतर सहजीवनाच्या आकर्षणात झाले की अनियमितता तयार करणारं कॉर्टिसॉल हे हार्मोन कमी होत जातं व ओक्सिटोसिन व डोपामिनचं प्रमाण वाढत जातं. स्टेबल रिलेशनचा हा काळ असतो व बरेच वेळा याचंच रूपांतर विवाहात होतं.
*त्यामुळे सुरुवातीच्या काळातील प्रेमात -पप्पी लव्हमध्ये व स्टेबल रिलेशनमधील फरक जाणून योग्य तो निर्णय घेणंही आवश्यक असतं. ओक्सिटोसिनचे प्रमाण संतुलित असल्यास प्रेमाचे रूपांतर आयुष्यभराच्या जोडीदारांमध्ये होतं व त्यातून सहजीवन सफल झालेलं आढळते.
* प्रेमाच्या विरु द्ध असलेले राग, क्र ोध अथवा हिंसा या भावनांमागेदेखील हार्मोन्सच जबाबदार असतात. ऑबसेसिव्ह लव्ह आणि पझेसिव्हनेस हेदेखील या हार्मोन्सच्या अतिरेकामुळे होतात. त्यामुळे कुठलंही नातं जोडताना व तोडताना सारासार विचार करणं गरजेचं असतं. काहीवेळेस आततायीपणानं घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात.
(लेखक हार्मोन्स तज्ज्ञ आहेत.)