लव्ह बाइट्स, व्हायचं असं प्रॅक्टिकल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:41 AM2018-03-15T08:41:01+5:302018-03-15T08:41:01+5:30

Love Bites, Is It Practical? | लव्ह बाइट्स, व्हायचं असं प्रॅक्टिकल?

लव्ह बाइट्स, व्हायचं असं प्रॅक्टिकल?

Next

- श्रुती मधुदीप

जात एक, वडिलांचा मोठा बिझनेस, घरदार उत्तम आईवडिलांना पसंत पडेल असा मुलगा निवडून आपणच त्याच्या प्रेमात ठरवून ‘पडलं’ तर? -सोप्पं नाही का?
एके दिवशी कधी नव्हे ते लाडक्या आईची लाडकी मनू दुपारी चक्क घरी होती. रोज दुपारी घराच्या भिंती आईशी बोलू लागायच्या. आई त्या भिंतींना आपली सगळी दु:ख सांगत राहायची, मनूच्या-ओमच्या आठवणी काढत आई भिंतींच्या हातावर टाळी द्यायची. आणि दोघी दिलखुलास हसायच्या. पण आज मनू घरी असल्याने तिला कशाकशाची गरज पडणार नव्हती. किती दिवसांचं असं भरभरून बोलणं बाकी होतं. आई मनूच्या केसातून हात फिरवू लागली. मग मनू आईशी लाडीकपणे बोलू लागली.
‘आई, तुला माहीतेय, ती काव्या आहे ना आमच्या ग्रुपमधली ती मला म्हणत होती की, तुला मोठा भाऊ आहे ना? मी म्हटलं हो. तर तिला खूप आनंद झाला. मी म्हटलं का गं? असं एकदम का विचारलंस ? तर ती काय म्हणाली असेल आई, सांग बरं..’
‘ ए मला कसं ठाऊक असेल ते. तिला स्वत:ला मोठा भाऊ नसेल म्हणून विचारलं असेल. आणि छोटी बहीण असायला कुणाला आवडत नाही मनू ?
‘अं असं काही नाही. ऐक तर तिचं म्हणणं होतं की, तुझ्या भावाला मी पटवीन. कारण तुमच्याकडे इतका पैसा आहे! वडिलांचा मोठा बिझनेस आणि मुख्य म्हणजे जात एक आहे! काही प्रॉब्लेम नाही ना. ती म्हणे की, पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन लग्न करेपर्यंत तीन वर्षं हातात आहेत. एखादा आपल्या जातीतला, वेल सेटल्ड मुलगा बघून ठेवायचा. अफेअर सुरू करायचं. आणि मग घरी लग्नाचं बोलणं सुरू झालं की सांगून टाकायचं. म्हणजे कसं, किमान आपल्याला मुलगा माहीत असतो आणि इकॉनॉमिकली आपण सिक्युअर! नाहीतर आई-बाबा स्थळ आणणार, एका महिन्यात एंगेजमेंट, आणि दोन महिन्यात लग्न! कशाला ना ते ! त्यात लग्नाआधी काही मोजके दिवस सोबत घालवायला मिळणार. त्यात काय कळणार मला त्या मुलाविषयी ? आणि खरं सांगू, जात किंवा पैसा हा माझा मुद्दा नाहीच. हा क्र ायटेरिया आई बाबांनी तयार केलेला. पण मला समजून घेणारा मुलगा हवा हा माझा क्रायटेरिया आहे. सो त्यातल्या त्यात हेच बरं, ज्यात दोघांचा क्रायटेरिया पूर्ण होतो. आई, मला तर कळतच नव्हतं मी आता काय बोलू हिला नक्की!’’
आईने मनूच्या केसातला हात काढला, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या आणि काहीशा गंभीर सुरात म्हणाली,
‘काव्याचे आई वडील काय करतात गं ?’
मनू आईच्या प्रश्नाने गोंधळलीच.
‘‘ते अं ते डॉक्टर आहेत. मोठं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांचं! आई पण डॉक्टर. तिचं एक वेगळं क्लिनिक आहे.’
‘ हं ’
आई पुढे काहीच बोलली नाही. मनूला ती शांतता असह्य झाली. त्या शांततेवर आघात करत ती म्हणाली,
‘आई, पण अगं मी काहीतरी वेगळंच बोलत होते. तू तिच्या आई-वडिलांबद्दल काय विचारतेयस !’
‘ मनू मला सांग’, हातातले कपडे कपाटात ठेवून, मनूच्या डोक्यावर हात फिरवत आई म्हणाली.
‘काय चूक आहे मनू काव्याच्या बोलण्यात ? किती प्रॅक्टिकल आणि जगणं साधं, सोपं आणि सुखकर बनवणारा विचार आहे हा ! इन फॅक्ट, तुही असाच विचार करायला हवास. ऐक बाळा, आपल्या जातीतला मुलगा खरंच शोधून ठेव. म्हणजे आपल्याला आणि मुख्य म्हणजे, तुला काही त्रास होणार नाही. उगाच कशाला नसते भांडण-तंटे, कशाला उगाच इनसिक्युरिटी घेऊन जगायचंय. हे बघ आमचं निभावलं आम्ही पण किती अडचणी आल्या. अरेंज मॅरेज होतं तरीही या अडचणींनी हात सोडला नाही. पण तुझे बाबा धडपडे, कधीही बसून राहणारे नव्हते आणि नाहीयेत म्हणून सगळं सुरळीत पार पडलं. पण तुम्ही आजकालच्या मुली काव्यासारख्या विचार करणाºया, फार पुढचा विचार करू लागलात. मॅच्युअर झालात. अर्थात तुमचा काळ पण तसा आहे. आम्हाला अशी सोय कुठं होती !’ आणि मग स्वत:च्या काळाला दोषारोपण देऊन आई पुढे म्हणाली ‘बरं ते जाऊ दे, मला सांग कॉफी करू आपल्या दोघींसाठी ? आज चहा नको वाटतोय..’
आणि आई किचनमधे गेली. मनू एकाच जागी खिळून गेली. आईने विचारलेला प्रश्न हवेत तरंगत राहायला. आणि शांत झालेली मनू आतून आतून अस्वस्थ झाली.
‘आपली आई इतकी प्रॅक्टिकल कशी झाली ? खरंतर प्रॅक्टिकल हा शब्द तरी वापरावा का ? एका क्षणात किती कोरडी वाटली मला ती. हीच ती माझी आई, जी मला पाळी आली तेव्हा म्हणाली होती, ‘मनू, तुझ्यासारख्या हळव्या मुलीला कोण समजून घेईल गं?’ यावर मी हसले तर स्वत:लाच उत्तर देत ती म्हणाली होती, ‘ अशा हळव्या माणसांना समजून घेणारा पार्टनर मिळतोही म्हणा!’ मला काही कळलं होतं की नाही तेव्हा काय माहीत ! पण मला कुणीतरी समजून घेणारा माझा पार्टनर मिळावा, ही पहिली गरज वाटली होती तिला. इकॉनॉमिक सिक्युरिटी, जात या असल्या गोष्टी कधीपासून इतक्या महत्त्वाच्या ठरायला लागल्या तिच्यासाठी ! आणि मला हे कळलंदेखील नाही. आई, मला सांग ना, मी लग्न करेन तेव्हा मी नक्की त्या विशिष्ट मुलाशी लग्न करेन की त्याच्या जातीशी, त्याच्या पैशांशी ! यापल्याड जाऊन तो मुलगा कसा आहे? आजूबाजूच्या लोकांशी तो कसा वागतो ? एक मुलगी म्हणून, बायको म्हणून तो माझ्याशी कसा वागेल? तो जे बोलतोच तेच तो वागतो का? तो माणूस म्हणून किती खरा आहे ? हे महत्त्वाचं नसेल का गं आई ? कसल्या सिक्युरिटीच्या आणि सुखा-समाधानाच्या शोधात आहोत आपण आई? ज्याचं मूळ माणसाची जात, त्याच्याकडे असणारं घर आणि पैसा हे आहे! माणसाच्या जन्मानंतर त्याला लावलेली ही जातीची लेबल्स इतकी आड येतात का गं ? मला तर वाटत होतं, नावा-आडनावाचं डिसेक्शन होऊ शकेल तिथे तुझ्या मनूला तिचं घर सापडेल; पण असं कुठलं तंट्याविना, भांडणाविना निर्माण होणारं नातं हवंय आपल्याला आई?
- मला भीती वाटते! भीती वाटते असं जगण्याची जिथे इतकी जास्त सुरक्षितता असेल की आपण एकमेकांना ओळखू शकणार नाही, एका घरात राहूनही !

dancershrutu@gmail.com 

Web Title: Love Bites, Is It Practical?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.