लव्ह बाइट्स : एकाचं जुळणं, डझनभरांचं जळणं !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:06 PM2018-01-24T15:06:02+5:302018-01-25T10:05:31+5:30

इनबॉक्स-इनबॉक्स, व्हॉटसप-व्हॉटअप खेळून कुठंतरी पुढचा/पुढची काय लेवलची आहे ते दिसतं. त्यावरून पुढच्या पिकपाण्याचा अंदाज येतो. मग काही लोक कंटिन्यू करतात, प्रपोज मारायचं ठरवतात; पण..  एकाचं जुळणं डझनभराचं जळणं !

Love bytes ... Modern love story from the villages | लव्ह बाइट्स : एकाचं जुळणं, डझनभरांचं जळणं !

लव्ह बाइट्स : एकाचं जुळणं, डझनभरांचं जळणं !

googlenewsNext

- श्रेणिक नरदे

आपल्याला कुणीतरी पसंत करणं, आपण कुणाच्या तरी आवडीचं असणं ही जगातली सगळ्यात आनंददायी गोष्ट. पण त्याहीपेक्षा आपल्याला जी कुणी आवडते तिला आपण आवडणं हे फार महत्त्वाचं, म्हणजे परमोच्च सुखाची गोष्ट वगैरे.
पण त्या व्यक्तीला आपण आवडतो, ही आवड ओळखायची तरी कशी? तुम्ही लाख त्या व्यक्तीला आपली भावना अप्रत्यक्षरीत्या दाखवली, उपयोग काय? एक हात नुस्ता आदळत बसलं तर हात दुखू लागतो. त्या हाताला दुसरा हात मिळाला की शेकहॅण्ड होतो, टाळी वाजते, कळी खुलते, खळी पडते. पण हात मिळवायला पाहिजे, टाळी वाजवायला पाहिजे, पाहिजे म्हणजे काहीतरी करायला तर पाहिजे..
नुस्ता इनबॉक्स-इनबॉक्स किंवा व्हॉटसप-व्हॉटसप खेळून कुठंतरी पुढचा/ची काय लेवलची आहे ते दिसते. त्यावरून पुढच्या पिकपाण्याचा अंदाज येतोय. मग काही लोक कंटिन्यू करतात. काही ब्लॉकून टाकतात. तर काही गुडमॉर्निंग-गुडनाइट विथ सुविचार एवढ्यापुरतीच मर्यादित राहतात.
माझ्या एका सख्ख्या दोस्ताची तर स्टोरी तर निराळीच. त्याचं एफवायला एकीवर प्रेम जडलं म्हणजे तो आमाला तसं सांगायचा. पण बघू बघूपर्यंत एसवायला दुसरीलाच प्रपोज केला. म्हणजे काय तर माणसांची निवड ही कधी कुणाला कळून न येण्यासारखी गोष्ट. मला तर एकेकदा वाटतं आंतरराष्ट्रीय सुरक्षितता बाळगणाºया लोकांपेक्षा प्रेमी लोकं जबरदस्त गोपनीयता बाळगत असतात. हिम्मत, धाडस, जिगर असणारी पोरच कशाला, दोन देऊ दोन घेऊ असं साधं तत्त्व असणारी पोरंही धाडदिशी आपली भावना बोलून रिकामी होतात.
पण फार लोकांकडं हे धाडस नसतं. तळतळत बसण्यापेक्षा दुसरं काय हाती लागत नाही. आपण योग्य वेळी बोललो असतो तर कसं बरं झालं असतं वगैरे आठवून झक मारत बसावं लागतं, ते वेगळंच.
पूर्वीच्या चिठ्ठ्या वगैरे गेल्या आता असं म्हणतो आपण पण तसं नसतंही. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल बॅचमध्ये एक नमुना प्रेमवीर दोस्त भेटला, त्याचा दिल आमच्याच बॅचमधील एका हुशार पोरीवर आला. आम्हा सगळ्या दोस्तमंडळ लोकांना तो सांगे, मला ती भेटली तर असं करेन, तसं करेन, ती फक्त हां म्हणूदे मी चंद्रच काय आणि दोनचार ग्रह तोडून आणून टाकेन वगैरे...
आम्ही आपलं प्रॅक्टिकलला सर - मॅडमांच्या शिव्या न खाता प्रॅक्टिकल कसं पार पडेल याचा विचार करत असू. तर ह्यो गडी काय दम काढीनाच. आम्ही कायमसारखं दुर्लक्ष केलं. तर चारेक दिवसानं त्या मुलीबरोबर ह्याचं जुळल्याची बातमी आली. अखंड मित्रमंडळ हादरलं.
इथं एखाद्याचं जुळनं म्हणजे डझनभरांचं जळणं असतंय. तर ज्याचं जुळलं ते पोरगं आम्हाला म्हणजे गावातल्या पोरांना ओळखी द्यायचं बंद करालं. त्याहीपेक्षा ह्याच्यात आणि तिच्यात जुळणारं कायच नव्हतं. हे पन्नास टक्केवालं ती अब्व्ह नाइण्टी. हे वाकडंतिकडं चालणारं-बोलणारं तर ती अगदी अभ्यासू वगैरे.
मग शेवटला पोरांनी त्याला विचारलं म्हटलं, असा काय लिंबू फिरवलास ती तुला पटली? तर याने केमेस्ट्रीच्या प्रॅक्टिकललाच तिला प्रपोज केलतं.
कसं? तर फिल्टर पेपरवर. (फिल्टर पेपर म्हणजे असतो प्रयोगशाळेत गाळण्यासाठीचा एक सछिद्र कागद). आय लव्ह यू असं शाईच्या पेनानं लिवलंतं. ती चिठ्ठी तिच्याकडं टाकली, तिनं ती वाचली. ती भडकली. नंतर भेट असा दम दिली. भेटल्यावर तिने तो कागद उघडेपर्यंत त्यावर लिहलेलं सगळं गिजमीट झालतं. मग ती हसली तिथंच फसली आणि केमेस्ट्री जुळली. पुढंपुढं जाऊन हादेखील सत्तर टक्के मार्क पाडला. हे बºयाचदा होतं असतंय, म्हणजे आईबाप घरदार सगळे सांगून ज्या वयात पोर ऐकत नसतंय त्या वयात हा आपल्या प्रेयसीचं प्रियकराच मन लावून ऐकतो.
आता बºयापैकी जमाना सुपरफास्ट झालाय. आवडल्या तिच्या फेसबुक अकाउंटलाच (तिकडून रिप्लाय न येताही) सरासरी किमान दहा प्रपोज केले जातात. पण प्रत्यक्ष प्रेमरणांगणावरचा प्रपोज करण्याअगोदर मित्रमैत्रिणीकडून चाचपणी केली जाते.
बºयाचदा समोर बोलून तोंड फोडून घ्यायचीच भीती वाटते. म्हणून मित्र-मैत्रिणीकडून विचारणा केली जाते; पण त्याला फारसा अर्थ नसतोय. हे म्हणजे तसं पाव्हण्यांनी स्थळ काढल्यातलाच प्रकार. त्यामुळं हा प्रकार तसा घाबरटपणाचाच ठरतोय.
याचा दुसरा एक तोटा बघण्यात आला, एका मित्राने जवळच्या मैत्रिणीकडून एका मुलीला प्रपोज केलवतं. चॉकलेट गुलाबपुष्प असा साधारणपणे कॉमन आहेर पाठवून प्रपोज केलत, तर ती मैत्रीण सांगत आली की, तिने नकार दिलाय. हे आहेर परत घे. गुलाबपुष्प घेतलं. चॉकलेट तिलाच खा म्हणून दिलं. तरी ह्यो गडी पट्टीचा प्रियकर. त्यानं एकतर्फी प्रेम चालू ठेवलं. पुढं जाऊन त्यानं स्वत:हून प्रपोज केलं. तिचा होकार आला. तेव्हा जाऊन समजलं की जिच्याकडून प्रपोज केलता तिनं तिथपर्यंत निरोपच पोहचवला नव्हता.
हे असे धोके लक्षात घेता तसं प्रेम करणारी मुलंमुली बरीच शाहणी झालीत.
आता हिंमत करून डायरेक्टच प्रपोज करतात.
त्यामुळेच कायमची जर कोणती गोष्ट लक्षात राहत असेल तर हे प्रपोज...
हिंमत लागते, करायची आणि काय..

(फुड टेक्नॉलॉजीत बी.एस्सी केलेला श्रेणिक जयसिंगपूरला राहतो, शेती करतो आणि मस्तमौला जगतो.)

Web Title: Love bytes ... Modern love story from the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.