लव्ह बंड - वाचा प्रेमाने भडकलेल्या काळाची एक थरारक गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:26 PM2019-02-14T13:26:54+5:302019-02-14T13:27:10+5:30

उदारीकरणानं जागतिक वारं शिरलं आणि मार्केटनं तरुणांना दिला एक निधर्मी सण प्रेमाचा इजहार-इकरार त्याचं भांडवल. मात्र त्यानं भडकलेल्या काळाची एक थरारक गोष्ट काहीतरी भलतंच सांगत होती.

Love rebellion - A thrilling story of love and passion -once upon a time. | लव्ह बंड - वाचा प्रेमाने भडकलेल्या काळाची एक थरारक गोष्ट

लव्ह बंड - वाचा प्रेमाने भडकलेल्या काळाची एक थरारक गोष्ट

Next
ठळक मुद्देप्रेमाचे बंडही सरले, संस्कृती रक्षणाचा ज्वरही ओसरला ते कशानं?

मुक्ता चैतन्य

साधारण वीस-बावीस वर्षापूर्वीची गोष्ट! 
उदारीकरणानंतरचा ताजा भारत होता तो. कुठल्याही मध्यम किंवा मोठय़ा आकाराच्या शहरात ज्या भागात कॉलेजेस असायची तिथं आजूबाजूला कॅफे कल्चरचा उदय मोठय़ा प्रमाणावर व्हायला सुरु वात झाली होती. तरु ण-तरु णी नावाचा एक मोठा ग्राहक वर्ग तयार झाला होता. त्यावेळी सगळ्यांना भरगोस पॉकेट्मनी मिळत नव्हते; पण हाताशी पैशांची चणचण नसणारे किंवा दोन-तीन, पाचात दहा करुन भागवणारे मात्र तुलनेनं बरेच होते. एकादोघांच्या बुडाखाली गाडी आणि त्यावर ट्रीपल सीट दोस्तांची गॅँग असा सगळा माहोल असायचा. कालर्पयत परदेशातून आलेल्या नातेवाइकांकडेच असलेल्या किंवा त्यांनी दिलेल्या, निदान सिनेमात किंवा नव्यानं सुरू झालेल्या खासगी वाहिन्यांवर पाहिलेल्या वस्तू शहरातल्या काही ‘विशेष’ दुकानांतून मिळायला सुरुवात झाली होती. ती दुकानं चकाचक दिसायची. कलरफुल. त्यातही काही फेमस ब्रॅण्ड्स होतेच. एखाद्या ब्रॅण्डची जीन्स घ्यायची तर मुंबईला जाण्याची गरज उरली नाही. मॉल संस्कृती हा शब्द अर्थात तेव्हा जन्मालाही आलेला नव्हता. पण चकाचक दुकानं, गिफ्ट शॉप्स यांची शहरातल्या तरुण दुकानांत गर्दी दिसायला लागली होती.  आर्चिस आणि हॉलमार्क अशासारख्या दुकानांच्या साखळ्या तयार झाल्या होत्या. 
हे सगळं एकीकडे कॉलेजमध्येही डे संस्कृती मूळ धरायला लागलेली होती. तमाम ‘डे’ एखाद्या ‘रिच्युअल’प्रमाणे साजरे व्हायचे. सगळ्यांना त्यात रस, अमुक डेला परवानगी मिळाली, तमुकला नाकारली याच्या बातम्या कॉलेज कॅम्पसमध्येच नाही तर वर्तमानपत्रातही गाजायला लागल्या होत्या. त्यासाठीचं शॉपिंग, ग्रीटिंग कार्डसची खरेदी, छोटी-मोठी गिफ्ट खरेदी करणं, पुष्पगुच्छ (तेच ते बुके) सुंदर पॅकेजिंगमध्ये मिळायला लागणं, लालचुटुक गुलाब, हार्टच्या आकाराचे लालेलाल फुगे, हे सगळं वातावरण भारून टाकायचं. ते सगळं घेणं, नटूनथटून एकटय़ानं किंवा ग्रुप फोटो काढून येणं हे सारं या रिच्युअलचा भाग होत गेलं.
उदारीकरणानंतरचा बाजार तयार होता. तरुण ग्राहक ‘घडवला’ जात होता. हे डे नवनवे ट्रेण्ड त्याला सांगत होते. कोणत्याही जातीधर्माचे नसलेले हे नवे सण फक्त तरुणांचे होत चाललेले होते.
या सगळ्यातच आला ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ नावाचा सण. सामान्य तरुण मुला-मुलींनी सहजी कधीही न ऐकलेल्या कुणा एका संताने सुरू केलेला प्रेमाचा सण. तो आधी बाजारपेठेनं आणि पाठोपाठ माध्यमांनी साजरा करायला घेतला. फेब्रुवारी जवळ आला की कॉलेज आणि कॉलेजेस असलेल्या रस्त्यांचा माहोलच बदलून जायचा.
हा हे साजरा करणं ही मोठी अस्तित्वाची, समाजाविरुद्ध केलेल्या बंडांची एक मोठी लढाईच मग तयार झाली. साजरा करणारे इरेला पेटले आणि संस्कृतीवर घाला म्हणून संस्कृतिरक्षक मोठय़ा जिद्दीनं मैदानात उतरले.
दुसरीकडे डेटिंग करणार्‍या ( म्हणजे ज्यांचं ‘काहीतरी’ सुरू असे अशी जोडपी, तेव्हा डेटिंग हा शब्द इतका सहज उच्चारणंही शक्य नव्हतं.) जोडप्यांचे प्लॅन्स सुरू व्हायचे. सरप्राईज गिफ्ट्ससाठी पैशांची जमवाजमव व्हायची. ज्यांचं सूत जुळण्याची लक्षणं असायची त्यांना स्वतर्‍च प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेण्टाइन्स डे ही संधी वाटायची. आजूबाजूला अशा अनेक मुलीही असायच्या ज्या 14 फेब्रुवारीच्या आधी आणि नंतर एकदोन दिवस कॉलेजला फिरकायच्याच नाहीत. कुणी विचारायला नको आणि कॉलेजमध्ये गॉसिप व्हायला नको. अर्थात अशांची संख्या तुरळक होती बाकी सगळा माहोल लालेलाल-गुलाबी झालेला असायचा. त्यात बाजारात मिळणारी सुंदर सुगंधी ग्रीटिंग कार्डस, निरनिराळ्या आकर्षक वस्तू यांनी वेगळाच बहर यायचा. कुणाला प्रपोज मारायचं, कोण कुणाला प्रपोज मारणार, कुणाला किती रेड रोज मिळणार याची चर्चा रंगायची.
त्यात बाजारानं दाबून धंदा केलेला असायचा. तरुण प्रेमीजीव उत्साहात प्रेमाचा दिवस साजरा करायची.
मग सुरू झाला संस्कृती रक्षणाचा एक विद्रुप खेळ. 
व्हॅलेण्टाइन्स डेसाठीच्या खास वस्तू विकणारी दुकानं फोडणं, तिथे उपस्थित ग्राहकांना दमदाटी करून हाकलून लावणं, मारामार्‍या करणं या सगळ्या प्रकारांनी प्रचंड जोर धरला. पुढली काही र्वष या तोडफोडीतच गेली. यादरम्यान कॉलेजेसच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर एक मुलगा आणि एक मुलगी नुसते एकत्न दिसले तरीही संस्कृतिरक्षक आणि पोलीस येऊन दमदाटी करायचे. मग ते प्रेमीयुगुल आहे, सहकारी आहेत, नातेवाईक आहेत की अजून कुणी याच्याशी कुणालाही काहीही देणं-घेणं नसायचं. एका मुलानं आणि मुलीनं एकत्न दिसता कामा नये असा अघोषित नियम असलेलं ते वातावरण असायचं. किमान आठवडाभर तरी संस्कृतिरक्षकांचा आणि त्यांच्या आडून काही प्रमाणात पोलिसांचा धिंगाणा चालू असायचा. वर्तमानपत्नात तोडफोडीच्या बातम्या पहिल्या पानावर असायच्या. व्हॅलेण्टाइन्स डेला अमुकचा विरोध, तमुकचा पाठिंबा या हेडलाइन व्हायच्या. ‘प्रेम दिवस’ योग्य की  अयोग्य ? या चर्चानी पुरवण्या सजायच्या. अनेक ठिकाणी प्रेमदिन संस्कृतीला विरोध म्हणून चर्चासत्रं व्हायची. प्रेम व्यक्त करायला एक दिवसच कशाला वगैरे भयंकर गंभीर चर्चा व्हायच्या. 
आणि तरुणही या सार्‍या विरोधात उभे ठाकत, कोण होतंय प्यार के दुश्मन पाहूच म्हणत हा दिवस साजरा करायचे. पोलिसांच्या पहार्‍यात तरुणांचं चुपचुपके सेलिब्रेशन अशा मथळ्यांच्या बातम्या व्हायच्या. 
तरुण मुलं-मुली संस्कृतिरक्षकांच्या आणि पोलिसांच्या नजरा चुकवून त्यांचा प्रेमदिवस कुठं निर्जनस्थळी जाऊन किंवा हॉटेल्समध्ये पार्टी करून साजरा करायचे. 
भररस्त्यात उभं राहायला, मित्न-मैत्रिणींशी बोलायला पोलीस परवानगी देत नाही तर आम्ही मुद्दामून रस्त्यात उभं राहणार. गाडीवरून एकमेकांना बिलगून फिरणार असं म्हणत तरुणाई बुंगाट फिरायची.
त्यात एक बंडखोरी होती. त्या काळची बंडखोरी.
तोंडावर स्कार्फ गुंडाळण्याची फॅशन नुकतीच आली होती. त्यामुळे बॉयफ्रेण्डच्या बाइकवर मागे चेहरा झाकून बिनधास्त फिरणार्‍या तरुणी सर्रास दिसायच्या. असं एखादं जोडपं दिसलं की पोलिसांच्या शिटय़ा सुरू व्हायच्या. संस्कृतिरक्षक मंडळी चित्नविचित्न चेहरे आणि हातवारे करत आरडाओरडा करताना दिसायचे. कुणाला अडवायचे. दोन्ही बाजूनं हे सेलिब्रेशन प्रतिष्ठेचा विषय झाला होता.
ते सारं इतकं तीव्र होतं की त्यासाठी मालमत्तेची नासधूस झाली. तरु णांची डोकी फुटली, राजकारण रंगलं.
तरीही ज्या बाजारपेठेनं हा सण रुजवला त्या बाजारपेठेला या विरोधानं आणि बंडासह पाठिंब्यानं भरपूर नफा मिळवून दिला. एक नवं प्रेम व्यक्त करण्याचं कल्चरही रुजवायला सुरुवात केली.
विरोध-पाठिंबा-बंड हे सगळंच हळूहळू क्षीण होत गेलं. हा दिवस बाजारपेठेनं रुजवला हे तरुणांच्याही लक्षात आलं. आणि तरुण आपल्याला जुमानत नाहीत हे संस्कृतिरक्षकांच्याही, मतांच्या राजकारणांसाठी तरुणांना दुखावून चालणार नाही इतपत भान राजकीय पक्षांनाही आलंच.
काळानंच त्या प्रश्नांची धार कमी करून टाकली. रक्षण आणि  बंड दोन्हीच्या स्ट्रॅटेजी आणि गरजा काळानेच बदलून टाकल्या. 
नाही म्हणायला व्हॅलेण्टाइन्स डे मात्न अजूनही शाबूत आहे. पण त्याच्यातला तो थरार, ती दीवानगी आणि प्यार किया तो डरना क्यावाली बंडखोरी मात्र आता सरली. 

***

प्रेमाचे बंडही सरले,
संस्कृती रक्षणाचा ज्वरही ओसरला
ते कशानं?

1. संस्कृतिरक्षकांचा विरोध झुगारून दणक्यात व्हॅलेण्टाइन डे साजरा करणं ही त्यावेळी तरुण मनांची गरज होती. त्यासाठी जमेल त्या पद्धतीने निषेध नोंदवले जायचे. सोशल मीडिया पूर्व काळ असल्यानं निषेध नोंदवण्याच्या पद्धती जास्त थेट होत्या. अशावेळी मग कॉलेजच्या रस्त्यांवर घिरटय़ा घालण्यापासून तिथे यायला रोखता तर आम्ही गावाबाहेर जाऊन धमाल करू म्हणत गावाबाहेरचे अनेक पर्यटन स्पॉट्स, हॉटेल्स, खास भटकंतीची ठिकाणं तरु णाईने भरून वाहत असायची. संस्कृतिरक्षकांच्या विरोधाला चोख उत्तर म्हणून तितक्याच दणक्यात व्हॅलेण्टाइन्स डे साजरे व्हायचे. 
2. एखादी फॅशन एखाद्या मौसमात जशी जोरात येते, पुढची फॅशन येईतो टिकते आणि मग तिची जागा दुसरी फॅशन घेते तसं काहीतरी व्हॅलेण्टाइन्स डेचं झालं. बाजारधार्जिण्या प्रेमदिनाची फॅशन सरली कारण पाठोपाठ स्मार्टफोन्स आले. सोशल मीडिया आला. मॉल्स आले. बाजार अजून मोठा आणि आक्र ाळविक्र ाळ होत होता. इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा शिरकाव झाला आणि जगण्यची समीकरणंच बदलून गेली. 
 

(लेखिका स्वतंत्र पत्रकार आहेत.)
 

Web Title: Love rebellion - A thrilling story of love and passion -once upon a time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.