मी असा, मी तसा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:33 AM2018-04-19T08:33:47+5:302018-04-19T08:33:47+5:30
कॉलेजात गेल्यावर आपण हिरो-हिरोईन असतो. आपण कुणाच्या किंवा कुणीतरी आपल्या प्रेमात पडावंसं वाटतं. कधीतरी प्रेमप्रकरणही जमतं, पण त्यावेळी पुढं काय, असले प्रश्न पडत नाहीत. ते थोड्या दिवसांत कळायला चालू होतं.
- श्रेणिक नरदे
या जगातील प्रत्येक जीव हा वेगळा असतो, त्यात अगदी एकाच वेळी एकच ठिकाणी एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली दोन सख्खी भावंडं जरी असली तरी ते एकसारखे दिसायला असतील; पण त्या दोघांची विचार करायची पद्धत निरनिराळी असते. एक सहज निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की आई-वडिलांशी मतभेद नसलेलं एकही लेकरू सापडत नाही. याला काही घटक जबाबदार असतात.
आपण ज्यावेळी इयत्ता पहिलीत जातो, तेव्हा आपला वेळ हा घरच्यांपेक्षा अधिक शाळेत जात राहतो. शाळा म्हणजे मित्र-मैत्रीण आले. शिक्षक आले. ते सोडून घर ते शाळा जात-येत असतानाचा परिसर आला. या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी बघत असताना आपण जसंजसं मोठ्ठं होत जाऊ तसंतसं आपल्यावर या गोष्टींचा परिणाम होत असतो. दुपारी जेवायच्या सुट्टीत तर आपण सगळे लोक डब्बे घेऊन बसतो, तेव्हा आपल्या घरच्या डब्यापेक्षा मित्र-मैत्रिणीचा डबा आवडू लागतो. मग देण्याघेण्यात आपण ते हक्क दाखवून मागून घेऊ लागतो. असंच अगदी काही दोस्त हे प्रभावशाली लोक असतात. त्यांच्या काही सवयी आपल्याला आवडतात आणि आपणही तसं वागू लागतो. अगदी मराठी शाळेत असताना शर्टाची दोन बटणं उघडी ठेवायची फॅशन आमच्या शाळेत एका पोरानं आणली होती, ते आम्हाला आवडून दहा-बारा जणांनी तसंच शर्टाची बटणं उघडी ठेवून हिंडायचो. आता मी त्यावेळी सगळ्यांबरोबर बार्इंचा मार खाल्लाता म्हणून आठवतंय की त्या मित्रानं आम्हाला सांगितलंन की शर्टाचं बटण उघडं ठेवल्यानं हवा खेळती राहून बॉडी वाढते. यासाठी त्यानं पिच्चरात नटं तशी का हिंडत्यात? अशी विचारणा केल्यानंतर आम्हाला ते पटलं आणि आम्ही त्याचं अनुयायी झालो. शेवटी मार खाल्ला; पण त्या मित्रावरची श्रद्धा मात्र कमी झाली नाही.
हे हळूहळू असं वय वाढत राहतं, तसतसं सभोवतालचे दोस्त, आजूबाजूचं वातावरण या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत राहतात. आठवी ते दहावी दरम्यान सगळ्याच मुलांमुलीत शारीरिक बदलाची सुरुवात होते. तिथून प्रत्येकजणांची सुरुवात ही मुक्त संचारपद्धतीच्या नव्या गोठ्यातील जनावरांसारखी होते. त्याला पौगंडावस्था असं कायतर म्हटलं जातं. आता पोरांना लैंगिक शिक्षण त्या वयात दिलं जातं. त्या वयाबद्दल, त्यातल्या विशेष वागण्यावर काय बरोबर, काय चूक? हे सांगितलं जातंय. पण, मुळात ते वय ऐकण्याचं नसल्यानं विशेषत: कुणाचं ऐकत नाही किंवा ऐकू येत नाही. हे वय ते वयवर्षे २०-२१ यात आपण काही करतो ते बेभरवश्याचं असतं. बहुतेक चुकीचे निर्णय या काळात घेतले जातात. समाजात काही असेही लोक असतात की ते आपल्या मुलाला म्हणेल त्या पद्धतीत वागू देतात; पण त्याची टक्केवारी कमी असते. सहजपणे एक निरीक्षण १२ वीत विद्यार्थी असताना करायचं. त्यामध्ये ५० टक्के मुलं सांगतात मला सायन्स करायच होतं. पण, घरातल्यांनी इंजिनिअरिंगला घातलं. मला डिप्लोमा करायचा होता; पण मला सायन्सला अॅडमिशन घेऊन दिलं घरातल्यांनी. म्हणजेच घरातले लोक आपलं भविष्य बिघडवायला बसलेत ही धारणा १७-१८ वय असताना होते. सगळ्यांची नाही पण बऱ्यापैकी लोकांबद्दल हे होतं.
मग १२ वीनंतर पालक लोक जरा ढवळाढवळ करायचं कमी करतात. तुला करायचं ते करं म्हणतात. इतक्या वेळेत समाज, नातेवाईक यांच्या दृष्टीनं आपण कामातून गेलेले असतो. त्यामुळे त्याबद्दल तिरस्कार तयार होतो. मध्यंतरी आलेल्या थ्री इडियट्स या सिनेमानं एक चांगलं काय केलं असेल तर पालक आणि समाजातील लोकांना पोरांची अवस्था काय असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. एक मुलांबद्दल सहानुभूती तयार झाली हेही मोठ्ठं काम होतं. त्यावेळी लोकांच्यात चर्चा असायची की मुलांवर आपण प्रेशर टाकायला नको. या सगळ्या सहानुभूतीचे आम्ही लाभार्थी होतो याचा मला विशेष आनंद वाटतो.
या सगळ्या १८-२० वयाच्या दरम्यान आपली अशी काही मतं तयार होतात, म्हणजे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता?, मी पुढं काय करणार?, मला हे करायचंच..!, मी असा मी तसा.
आता या वयात झालेल्या शारीरिक बदलांतून भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटत असलेलं आकर्षण, त्यात आपण हिरो-हिरोईन असतो. आपण कुणाच्या तर प्रेमात पडावे किंवा आपल्या प्रेमात कोणतर पडावं. बाकीची जनता आपल्या दोघांमागे नाचत राहावी. हे असं वाटत राहतं. त्यातून प्रेमप्रकरण जमतं, त्यावेळी पुढं काय? हे असले प्रश्न पडत नाहीत. थोड्या दिवसांत कळायला चालू होतं.
आई-वडील, आपले नातेवाईक, समाज यांच्या काही अपेक्षा असतात. ज्यावेळी आपण एखादा निर्णय मनात तयार करतो आणि आई-वडिलांपुढं तो मांडतो तेव्हा बहुतांश घरातले आई-वडील एक प्रश्न विचारतात, लोकं काय म्हणतील?
आई-वडील किंवा घरचे आपले पालनपोषणकर्ते हे आपलं नेहमीच भलं चिंतत असतात. त्यांच्यावर दबाव असतो तो समाजाचा. यासाठी खेड्यापाड्यांपेक्षा शहरं बरी वाटतात. समाजही असा काही मस्त असतो की काय विचारूच नका. चांगल्या मार्कानं आपण पास झालो तर कुणीही विचारत नाही; पण जर नापास झालो तर दारावर येऊन समाज विचारतो, आपलाच चहा पिऊन तासभर लेक्चर देतो. एखाद्या मुला-मुलीने आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न केलं की त्या घरातील सर्वांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेणारा समाज असतो. खेड्यात जगणं सन्मानाचं तेव्हाच असतं की आपल्याबरोबर समाज असतो. या सगळ्या घटकांचा दबाव आपल्या आई-बाबांच्या, पालणपोषणकर्त्यांच्यावर असतो. त्यातून त्यांना वाटतं की आपण समाजमान्य वागावं. आपण जर काही थोडं चाकोरीबाहेर जाऊन वागलो तर त्या वागण्याची सजा आपल्या घराण्याला समाज देतोय. हाच समाज कित्येकदा स्वत:च्या लेकराचा जीवही घ्यायला लावतोय हे आपण आॅनर किलिंगसारख्या घटनेतून अनुभवतोय. कुठंतरी समाज सुधारित होतोय असं दिसत असताना अत्यंत विकृत असं स्वरूप अलीकडे पुढं येतंय. ज्यावेळी आपल्या स्वत:च्या जीवनात समाजाचा हस्तक्षेप होणार नाही, त्यावेळी बरेच लोक सुखी होतील, निदान सुरक्षित तरी राहतील.