LOVE in the time corona - रोमान्स इज नॉट डेड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 04:23 PM2020-04-30T16:23:30+5:302020-04-30T16:32:05+5:30
प्रेम कशावरही मात करतं, कशालाही पुरून उरतंच. एकमेकांना जगवायला, तगवायला, कोरोनाच्या उपचारांइतकंच जीवनदायी काही असेल, तर ते प्रेम! प्रेम ही एकमेव पॉङिाटिव्हीटी साऱ्या नकारात्मकतेला शेवटी पुरून उरतेच.
-शर्मिष्ठा भोसले
प्रेम इस तरह किया जाए कि दुनिया का कारोबार चलता रहे
किसी को ख़बर तक न हो कि प्रेम हो गया
खुद तुम्हें भी पता न चले किसी को सुनाना अपने प्रेम की कहानी
तो कोई यक़ीन तक न करे.
- गीत चतुर्वेदी यांच्या ‘चोरी’ कवितेतले हे काही तुकडे आठवतातच आजच्या काळातल्या काही प्रेमकथा वाचताना, पाहताना, ऐकताना.
अदृश्य विषाणूच्या तावडीत सापडलेला हा काळ. कल्पनेपलीकडचं वास्तव तुमच्या-माङया जगात -देशात-गावाशहरात आणून ठेवणारा.
या काळातल्या प्रेमकहाण्याही अगदी अशाच, विश्वास ठेवायला अवघड, अनवट.
एकीकडे दूर अमेरिकेत हजारोंनी घडणारे मृत्यू आणि नंतरचा अखंड आकांत दरदिवशी मना-मेंदूवर आदळत राहतो. तसंच न्यू यॉर्क टाइम्सचं एक पॉडकास्ट ऐकत होते. त्यांची थीम होती ‘लव डय़ुरिंग द टाइम्स ऑफ कोविड-19.’
महामारीच्या ऐन वादळात जगणा:यांनी अनुभवलेल्या प्रेमकथा.
त्यांनी जगभरातल्या नागरिकांना आपापल्या प्रेमाचे अनुभव सांगणारे व्हॉइस मेमोज पाठवायला सांगितले होते.
त्यातले निवडक पॉडकास्टमध्ये सादर करणारी होस्ट मेगन सांगते, ‘या काळानं तुम्हा-आम्हाला कमालीचं असुरक्षित बनवलंय. साहजिकच प्रेमाचं मोल अजूनच वाढल्याचं जाणवत राहतं.’
पहिलीच कथा डेटिंगची. एकदम फिल्मी. क्लेअर नावाची कुणी चुलबुली तरुणी बोलत असते, ‘‘आम्ही दोघं ना, पहिल्यांदाच भेटलो. सोमवार होता. मंगळवारी दोघांनाही समजलं, की आम्ही ‘पॉङिाटिव्ह’ आहोत. मग काय? सोबतच क्वॉरण्टिन झालो ! दोन आठवडे एकमेकांसोबत खूप वेळ घालवला, गप्पा मारल्या, समजून घेतल्या मनच्या गोष्टी !’’
ती काय सांगतेय, आपण काय ऐकतोय कळतच नाही क्षणभर, असं हे लव्ह इन टाइम ऑफ कोरोना.
**
तिची गोड गुलाबी कथा ऐकून संपते तशी कुणी जरा तिशीतली वाटावी अशी एक जण, कोरी तिचं नाव. तिची आणि मार्कची अजूनच ट्विस्टवाली लवस्टोरी.
ती सांगू लागते. ‘‘आम्ही दोघं गेली पाचेक र्वष लॉँग डिस्ट्न्स रिलेशनशिपमध्ये होतो. मग मी माझं शहर सोडून मार्ककडे, न्यू यॉर्कला येऊन राहायचं ठरवलं. मी शहरात येऊन दाखल झाले आणि कोरोनाचा तडाखा बसला. दोघांनाही घरात बंदिस्त व्हावं लागलं. अशा विचित्न परिस्थितीत आम्ही नात्याचं हे बदललेलं रूप जमेल तसं सेलिब्रेट करतोय, अजून करणार तरी काय ना?’’
कोरीची कहाणी संपता संपता अजून एकजण म्हणते, ‘जे नातं या क्वॉरण्टिन अवस्थेतून सहीसलामत बाहेर निघेल ना, ते उद्या कुठल्याही संकटाचा सामना करू शकेल!’
***
एक डेबी आहे. येत्या काही महिन्यात तिच्या प्रिय पॅट्रिकसोबत लग्न करणार होती. ठरलेल्या तारखेचं बुकिंग करायला दोघं नोंदणी कार्यालयात गेले तसा तिथल्या अधिका:यांनी नकार दिला. कारण होतं समोर अगदी टप्प्यात आलेलं कोरोना संकटाचं. दोघं हिरमुसले.
तितक्यात पॅट्रिकनं विचारलं, ‘‘ठीके, आज, आत्ता कसं राहील? इथे लगेच लावता का आमच्या दोघांचं लग्न?’’
त्या अधिका:यानं मान डोलावली. साक्षीदारांची जमवाजमव झाली. आणि तिथल्या तिथं लगA करून डेबी आणि पॅट्रिक नवरा-बायको झाले.
‘आज आत्ता’ या क्षणाच्या जगण्याचं मोल हरेकाला समजावणारा हा असा अनोखा काळ..
**
एक तरुण आवाज मलूलपणो बोलतो, ‘‘मी एकटी राहते. कुणीच नसतं सोबत, अगदी पाळलेला कुत्नापण नाही एखादा. दोन आठवडे झालं कुणाचा स्पर्श नसल्याला. ‘इट्स लोनली हियर !’ प्रेमाविना-स्पर्शाविना जगणा:या तिचे थंड उद्गार अंगावर येतात.
एकीनं आपल्या दुख:या आवाजात पायलट असलेल्या जोडीदारानं केलेल्या ब्रेक-अपची कथाही ऐकवली.
अर्थात, तीही प्रेमाचा, जगण्याचा आणि याच काळाचा वजा न करता येणारा भाग आहे.
***
पॉडकास्ट संपल्यावरही मनात वाजत राहतो तो केटी आजीचा लोण्यासारखा मऊ आवाज.
केटी सांगते, ‘‘मी आणि क्रि स एकत्न राहतो त्याला आता 5क् र्वष उलटलीत. गेल्या 2क् वर्षापासून क्रिसला अल्जायमर आहे. मला अजिबातच ओळखत नाही तो. गेल्या 4 वर्षापासून क्रि स एका संस्थेत उपचार घेतोय, तिथेच राहतो. मी दिवसातून दोनदा त्याला भेटायला जायचे. या काळात ही भेट दोन दिवसातून एकदाच होतेय. आता तर त्याला एका काचेच्या खोलीत ठेवलंय. भलेही त्याच्या नजरेत ओळख नसेल; पण पूर्वी त्याला स्पर्श तरी करता यायचा, आता फक्त दुरून पाहून घरी यायचं. व्हॉटएव्हर इट इज, आय रिअली लव धिस मॅन..’’
- अनोळखी प्रदेशातल्या अनोळखी माणसांच्या आवाजांत या कथा ऐकताना थोडंफार काहीतरी ओळखीचं सापडत राहतं..
या पॉडकास्टची प्रायोजक एक विमा कंपनी असणं हेसुद्धा खासच. कारण प्रेमसुद्धा तुमच्या जगण्याला विम्यासारखंच सुरक्षित कवच देतं, नाही का?
*****
डेट इन क्वॉरण्टाइन
दुसरीकडं या ‘ट्रॅजिक’ काळाला जरा ‘रोमॅण्टिक’ बनवायला डॅनियल आणि ािस्तोफरने थेट ‘क्वॉरण्टिन टुगेदर’ नावानं डेटिंग अॅपच बनवलंय.
‘गेट क्लोज इवन वेन यू कान्ट बी टुगेदर’ असं आवाहन करत मॅच मेकिंग करून दिल्यावर मिळणारा पैसा आरोग्यसेवकांना निधी म्हणून दिला जातोय.
यांना मिळालेल्या हाउसफुल प्रतिसादानंतर आता लोक वेटिंगवर लाइन लावून ऑनलाइन ताटकळलेत !
‘लव इज क्वॉरण्टिन’ हा अजून एक प्रयोग लोकांना आपापल्या घरात बसून ब्लाइण्ड व्हर्चुअल डेटिंग करायला सांगतोय.
विदेशात बंबल आणि टिंडरसारख्या डेटिंग अॅप्सला या काळात जास्त प्रतिसाद मिळत असल्याचं वास्तवही बरंच बोलकं आहे.
कोरोनाचा कहर आणि लग्नाचा बार
भारतात कोरोनाची चाहूल लागली ती मार्चच्या मध्यात. या विषाणूनं तोवर चीनमध्ये बरेच हातपाय पसरले होते. साहजिकच 14 फेब्रुवारीला आलेल्या ‘व्हॅलेण्टाइन डे’वरही कोरोनाचा प्रभाव होता.
फिलिपिन्समध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला डेट करत आहात तिची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासून मगच काय ते करा.’ असं फर्मानच तिथल्या आरोग्य खात्यानं काढल्याची बातमी ‘सन स्टार’ वृत्तपत्नानं दिली.
सिंगापूरमध्ये एका जोडप्यानं लग्न उरकून घेतलं; पण ऑनलाइन वेडिंग रिसेप्शन दिलं. भेट सगळ्यांची ऑनलाइन. गिफ्टचं काय केलं ते काही कळलं नाही, जेवणाखाण्याला कात्री.
इकडं भारतातही जालीम जमान्यासोबतच कोरोनाविरोधातही बगावत करत एका बिहारी बाबूनं आपल्या दिलरुबासोबत व्हिडीओ कॉलवर निकाह केलाय.
दोघांनी एकमेकांशी आपापल्या घरात टांगलेल्या व्हिडीओ कॉलवर नजरानजर करत आणाभाका घेतल्या.
आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात राहणारी चित्कला भवानी वय वर्ष 19. पुन्नाया वय वर्ष 21. नकळत्या वयापासूनचं एकमेकांवर प्रेम. आता सज्ञान झाले तसं दोघांनी ठरवलं, लग्न करायचं. इथेही तोच खानदान की इज्जतचा प्राचीन सवाल आला. तो अडथळा ओलांडून दोघं घरातून पळाले तोच कोरोना वाट अडवून उभा राहिला. भवानी तिच्या गावापासून दूर तब्बल 6क् किलोमीटर पुन्नायाच्या गावी चालत गेली. दोघांनी गुपचूप लग्न केलं. तोवर इकडं घरच्यांच्या धमक्याही सुरू झाल्या. मग दोघं तडक पोलीस स्टेशनला गेले आणि संरक्षण मिळवलं.
हैदराबादेत एका कपलनं ऑनलाइन ‘कबूल है’ म्हणत निकाह पढला. दिल्लीत एका कपलचं लग्न पुढं ढकलण्याची वेळ आली तसं त्यांच्या यारदोस्तांनी संगीत पार्टी धूमधडाक्यात डिजिटल केली.
****
प्रेमाभोवती फेक न्यूजचा व्हायरल ट्रॅप
या सगळ्या अनिश्चिततेच्या काळात अफवा आणि फेक न्यूजचीही साथ आलीच. प्रेमही या फेकपणाला अपवाद नाही. कोरोनाकाळात स्पेनच्या विमानतळावर निरोप घेण्याआधी एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या जोडप्याचा फोटो ‘आणीबाणीच्या काळात लढणारं इटालियन डॉक्टर कपल’ म्हणूनही व्हायरल केला गेला.
तिकडं ब्रुकलिन शहरात फ्रीलान्स फोटोग्राफर जर्मी कोहेन आपल्या गोड शेजारणीला ड्रोन मेसेज पाठवून प्रपोज करण्याचा प्रयत्न करतोय. दुस:या दिवशी तिला भेटण्याआधी त्यानं स्वत:ला एका पारदर्शक प्लॅस्टिक बबलमध्ये बंद केलंय. त्याला बघून ती हसत सुटते. मग हा बबलमध्येच असताना दोघं सुनसान शहरात वॉकला निघतात तर पोलीस त्यांना अडवतात. प्रकरण कळल्यावर प्रेमवीरांसोबत सेल्फी घेतात. या दोघांची स्टोरी टीव्हीवरही झळकते. ‘हाउ टू डेट अ क्वॉरण्टिन क्युटी’ या शीर्षकाचा व्हिडीओ हिट झालाय. व्हिडीओ शेअर करताना लोक लिहितात, ‘शेवटी प्रेम कशावरही मात करतं, कशालाही पुरून उरतंच. रोमान्स इज नॉट डेड!’
आसपासच्या सगळ्या वातावरणात संशय, भीती, दुरावा भरून उरलाय. काही वेळा वाटतं, साहजिकच आहे हे. भूक, स्थलांतर, द्वेष, जातीय-धार्मिक तेढ यांची नकोशी रूपं रोज समोर दिसत राहतात. वर्तमानाची भीती, भविष्याची अनिश्चितता जगभरात भरून वाहतेय. अमेरिकेसारखी महासत्ता असो, की इटली-चीनसारखा प्रगत देश, सगळे तितकेच हतबल आहेत. यात एकमेकांना जगवायला तगवायला कोरोनाच्या उपचारांइतकंच जीवनदायी काही असेल, तर ते प्रेम !
प्रेम ही एकमेव पॉङिाटिव्हीटी सा:या नकारात्मकतेला शेवटी पुरून उरतेच.
लव्ह इन टाइम ऑफ कोरोना हे तरी दुसरं काय सांगतंय.
अमेरिकेत एका भारतीय जोडप्याची साथसोबत
प्रियांका सातपुते आणि बालाजी वाघमारे. प्रियांका माझी जुनी मैत्रीण. सध्या हे दोघे आपल्या छोटय़ा बाळाची वाट पाहत आहेत.
प्रियांका एडिटिंगची कामं करते, चांगली फोटोग्राफरही आहे. बालाजी सॉफ्टवेअर कंपनीत ग्राफिक डिझायनर आहे. खूप संघर्ष करून तो शिकलाय आणि इथवर पोहोचलाय. दोघेही गेली 2 र्वष कॅलिफोर्नियाच्या डब्लिन शहरात राहतात.
दोघांच्याही घरचे या पहिलटकरणीचं बाळंतपण करायला येणार होते. तेवढय़ात अमेरिकेत कोरोना उद्भवला. विमानाची तिकिटं रद्द करावी लागली.
प्रियांका सांगते, ‘‘आता एकमेकांसाठी आम्ही दोघंच आहोत. काय नीट न कळताच लॉकडाउन झालं. हे असं इतकं वाढेल याचा अंदाज आलाच नव्हता. गरोदरपणाच्या काळात शारीरिक - मानसिक बदल खूप होतात. मूड्स बदलतात. हे सगळं आम्ही चुकतमाकत एकमेकांच्या सोबतीनं करतोय.
बाहेरचं चित्र कळत असलं तरी या काळात मेंटली हेल्दी राहणं माङयासह बाळासाठीही खूप महत्त्वाचं आहे. मला किती सुरक्षित आणि आनंदी ठेवता येईल हीच आता आमची प्रायोरिटी बनलीय. बालाजी ऑफिस सांभाळून मला सांभाळतो. घरात तो खूप जास्त लक्ष द्यायला लागलाय. लहानसहान गोष्टींनी मला आनंदी ठेवू लागलाय. बाळंतपण आपण दोघं करू शकतो हे आम्ही सतत सांगतोय एकमेकांना. कोरोनानं आम्हाला खूप केअरिंग बनवलंय. आता रात्नी झोपेतही बालाजी सतत सावध असतो. दिवसा सतत बारकाईनं आसपास लक्ष ठेवतो. मला आवडीचे सिनेमे देतो, गाणी ऐकवतो. त्याची थोडीबहुत चिडचिड आणि राग तर आता विरघळूनच गेलाय. तिकडं भारतात घरचे आमची काळजी करतात. माहेरचे आणि सासरचे दोघांशीही फोनवर सविस्तर बोलत बाला त्यांना आश्वस्त करतो. एकमेकांची सोबत आम्हाला आनंदी ठेवते.’’ बालाजीच्या मते, नातं आता नवीनच रूपात समोर आल्यासारखं वाटतं. तो सांगतो, ‘‘मी आता खूप वेगवेगळ्या भूमिका निभावायला शिकलोय. यातून स्वत:तलेच नवनवे ‘मी’ सापडत जातात. पूर्वी दोघेही तुलनेने कॅज्युअली घ्यायचो गोष्टी. आता खूप विचारी बनलोय. हा काळ आहे त्यातच जुगाड करून कसं भागवायचं याचे धडे देणारा, दोघांनाही अनेक अर्थानी मॅचुअर बनवणारा आहे. कुठलाही ताण असो, तो जणू एखादं फिल्टर लावल्यासारखा तिच्यार्पयत जाण्याआधी आपणच शोषून घ्यायचा, असा माझा प्रयत्न असतो. हेच तर प्रेम असतं ना!’’
काहींनी ऑनलाइनलग्न लावली, काहींनी शेतात
तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या जमान्यातही लग्न मात्र त्यांनी केलंच, तो मुहूर्त टळला नाही.
भारत ‘बिग फॅट वेडिंग्ज’चा देश आहे.
त्यातही भर उन्हाळ्यात घामाघूम होतानाही व:हाड, शामियाने, पंगती, शालू, शेरवानी अशा ‘समृद्ध अडगळी’चा सोस ओसरता ओसरत नाही.
कोरोनाने या उत्साहावर पाणी फिरवू पाहिलं असलं तरी काही न काही ‘देसी जुगाड’ शोधून काढणार नाहीत ते भारतीय कसले!
अनेकांनी मस्त सजून-धजून मास्कलाही नवा दागिना मानत तो गुमान चेह:यावर चढवला. झोकात जोडीनं फोटोसेशनही केलं !
अशा अनेक जोडप्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
हरयाणातल्या एका तरु णानं मेक्सिकन तरुणीशी लग्न केलं.
बिहारच्या गया इथं काही दिवसांपूर्वी अनंत कुमार आणि नसरीन यांनी जमानेकी निगाहोसे छुपकर शहरातल्या मंदिरात लग्नगाठ बांधली.
लॉकडाउनचे नियम पाळत रोहतकच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात लग्न पार पडलं.
एका न झालेल्या लग्नाची गोष्टही फिल्मीच. उत्तर प्रदेशातल्या गोंडा इथं एका लुधियानात राहणा:या तरुणाचं लग्न 15 एप्रिलला नियोजित होतं.
पण अचानक लॉकडाउन जाहीर झालं. मग तो सायकलवर टांग मारत निघाला आणि चक्क 85क् किमी अंतर त्यानं कापलं. त्याला लगA करायचंच होतं.
पण बैरी जमाना ! आपल्या प्रियतमेशी लग्नाच्या बेडीत बांधून घेण्याआधी पोलिसांची हथकडी नशिबात आली आणि क्वॉरण्टाइन व्हावं लागलं !
सातारच्या रविकिरण काकडे आणि मनीषा कुमठेकरनं मात्न 1क् एप्रिलला त्यांचं ‘मिशन मॅरेज’ यशस्वीपणो पार पडलं.
चार भिंतीत बंद दरवज्याआड झालेल्या या लग्नाला मामा-मामीसकट सगळ्या नातेवाइकांनी व्हिडीओ कॉलवर आशीर्वाद दिले.
कोकणातल्या सावंतवाडीजवळच्या स्वप्नील आणि रसिकाच्या आईवडिलांच्या अनुपस्थितीत साधेपणाने लागलेल्या लग्नानंतर बाईकवरूनच घरार्पयत वरात निघाली.
ओझरच्या मनीष आणि वैष्णवीनेही शेतात चार लोकांच्या उपस्थितीत सगळ्या नियमांचे पालन करत लग्नगाठ बांधली.
वर्धा जिल्ह्यात आकाश आणि विद्याने पोलीसपाटील आणि मोजके नातेवाईक यांच्या साक्षीनं आणाभाका घेतल्या.
यवतमाळच्या एका लहान गावात दुर्गा आणि अमोलनं अवघ्या 6क् रुपयात सोहळा साजरा केला आणि आनंद साजरा झाला तो मुरमुरे वाटून!
मानपान, रुसवे-फुगवे, श्रीमंतीचं भडक प्रदर्शन या सगळ्या गोष्टी किती निर्थक आणि फसव्या आहेत याचा अनेकांना साक्षात्कार घडवणारा हा काळ म्हणता येईल.
थोडक्यात काय ‘प्रेम सत्य, त्याचा बडेजाव मिथ्या’ हे या कोरोनाकाळानं शिकवलेलं शहाणपण.
ते टिको, वाढो, हीच आशा.