झाडवालं लव्ह
By admin | Published: October 16, 2014 06:52 PM2014-10-16T18:52:45+5:302014-10-16T18:52:45+5:30
झाडं मोठी झाली. रस्त्यावर सावली धरू लागली. फुलं-पानं तर डवरलीच पण मुख्य म्हणजे १५-१६ प्रकारचे पक्षी आता आमच्या भागात दिसू लागले
सुचेता पाटील,( इचलकरंजी) -
प मोठय़ा ग्रुपनं केलेलं खूप मोठं काम नाहीये आमचं ! आम्ही दोघी मैत्रिणी. चौदा वर्षांपूर्वी नवीन घर बांधलं. वास्तुशांतीला तिनं मला एक झाड भेट दिलं. त्या दिवसापासूनच मी कॉलनीत झाडं लावायला सुरुवात केली. वेड्यासारखी झाडंच लावत सुटले. त्यातही दुर्मीळ, देशी, औेषधी गुणधर्म असलेली आणि विदेशी नसलेली झाडं लावली. आपल्याच माणसांना आता जी देशी झाडं अनोळखी वाटतात, ती शोधून शोधून आणून लावली. दुपारी झोपा न काढता शेळ्यामेंढय़ापासून ती झाडं वाचावीत म्हणून रखवालीही केली.
झाडं मोठी झाली. रस्त्यावर सावली धरू लागली. फुलं-पानं तर डवरलीच पण मुख्य म्हणजे १५-१६ प्रकारचे पक्षी आता आमच्या भागात दिसू लागले. पक्ष्यांची घरटी बघायला मिळू लागली. सुरुवातीला मला हसणारे, उदासीन असणारे लोकं आता झाडांची स्वत:ही काळजी घेऊ लागले. आणि आजही माझ्या मैत्रिणीनं दिलेला ‘बहावा’ सुंदर मनमोहक रूप घेऊन आमच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून दारात उभा आहे. एक ‘नेवरा’ आणून मी लावला होता. तो मूलचा समुद्रकिनारी प्रदेशातला. तो आपल्या भागात जगणारच नाही असं सार्याचं मत. पण तो जगला. आणि तुळशीचं तर जंगलच झालंय माझ्या घरी. आता भेट म्हणून मी ती रोपंच वाटत असते.
आता कॉलनीतली जागा कमी पडतेय तर दुसरीकडे कुठं झाडं लावता येतील का हे शोधतेय. आणि हे सारं समाजासाठी नाही तर स्वत:साठीच.
हे झपाटलेपण फक्त झाडं आणि पक्षी प्रेमातून आलंय.