मॅड मित्र
By admin | Published: August 18, 2016 03:51 PM2016-08-18T15:51:34+5:302016-08-18T15:51:34+5:30
कानावर रेडिओ जॉकीचा आवाज पडला आणि प्रसादला ‘आरजे’ होण्याचं वेड जडलं.वयाच्या सोळाव्या वर्षी दहावीत असतानाच त्याने स्वत:च्या बळावर पहिला रेडिओ शो केला. पुढं शिक्षण आणि रेडिओ दोन्ही चालू ठेवलं. आज औरंगाबादचा मॉर्निंग जॉकी म्हणून त्यानं चांगलंच नाव कमावलंय तेदेखील शिकता शिकताच. रेडिओच्या पॅशनने पुरता मॅड झालेल्या आरजे प्रसादची कहाणी त्यांच्या शो सारखीच सुपरहीट आहे.
- आरजे प्रसाद
तुम्ही जर औरंगाबादमध्ये असाल तर सकाळी सकाळी रेडिओ चालू केला की, एकदम खट्याळ आवाज कानावर पडतो. तो आवाज म्हणजे ‘आरजे प्रसाद’. औरंगाबादला रेड एफएम या रेडिओ स्टेशनचा तो मॉर्निंग आरजे़ प्रसाद देशमुख हे त्याचं पूर्ण नाव. वयाच्या केवळ २३व्या वर्षीच त्याला रेडिओमध्ये काम करण्याचा आॅफिशियल पाच वर्षांचा आणि हौस म्हणून आठ-नऊ वर्षांचा अनुभव आहे. या दरम्यान त्याने मुंबई, नगर, नाशिक, औरंगाबाद अशा चार शहरांत काम केलं. कसं जमलं हे त्याला?
प्रसादला यात फार काही ग्रेटबिट वाटत नाही. तो सांगतो, ‘माझ्या घरी काही कलेचं किंवा क्रिएटिव्ह वातावरण नव्हतं. मला लहानपणापासूनच रेडिओवर काम करायचं असं काही नव्हतं. घरी अधूनमधून आकाशवाणी ऐकायचो, तेवढंच पण रेडिओशी माझी खरा संबंध आला तो नववीत असताना. तेव्हा नाशिकमध्ये कमर्शियल रेडिओला सुरवात झाली. माझ्यासाठी ते एकदम नवीन होतं. रेडिओवर ‘आरजे’ला ऐकताना मला पण तसं व्हावंसं वाटू लागलं. ते जसे बोलायचे तसं बोलण्याचा प्रयत्न करायचो. आपणही रेडिओवर आरजे व्हावं म्हणून मी त्यांच्या आॅफिसला खेट्या मारू लागलो. मला नाही माहीत की, काय विचार करून मी जायचो. नववी-दहावीत असेन मी तेव्हा. आली हुक्की म्हणून गेलो. फक्त स्टेशनवर जाऊन मला आरजे व्हायचंय म्हणून सांगायचो. माझं वय आणि त्यांच्या दृष्टीने माझा ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ पाहून मला नकारच मिळायचा.’
पण प्रसादने काही पिच्छा सोडला नाही. अखेर एका रेडिओ स्टेशनने त्याला एक तासाचा शो करण्याची परवानगी दिली. दहावीच्या मुलासाठी ही किती मोठी गोष्ट होती! संपूर्ण तयारीनिशी तो स्टुडिओमध्ये पोहचला. फुल्ल आत्मविश्वासात शोसुद्धा केला. तेव्हा जो त्याला ‘बूस्ट’ मिळाला तो आजतागायत कायम आहे.
माणसामध्ये ना ‘क्युरिओसिटी’ असली पाहिजे. नवं जे काही दिसेल ते जाणून घेण्याचा, ते करून पाहण्याचा ‘किडा’ असला पाहिजे. प्रसादला भेटल्यावर तुम्हाला लगेच कळेल की, मला काय म्हणतोय. प्रसाद सांगतो, ‘माझा स्वभाव म्हणजे महाखट्याळ. पाहुणे तर आईसोबत नसेल तर मला त्यांच्या घरी येऊच नको असे म्हणायचे. नाशिकला आम्ही राहायचो. मस्तीखोर, खोडकर, वात्रट अशी विशेषणं माझ्यावर चपखल बसतात. काही नवीन पाहिलं ना, ते काय आहे ते जाणूनच घेतल्याशिवाय मला चैन नाही पडत. स्टुडिओमध्ये पहिल्या वेळेस गेल्यावर मी डोळेभरून सगळं पाहिलं. माईक कसा आहे, कंम्प्युटरवर काय होतंय, सॉफ्टवेअर कोणतंय, असं सगळं सगळं लक्षात ठेवलं. आणि मग सुरू झाला ते सगळं जमवाजमव करण्याचा खटाटोप.’
वडिलांकडून काही पैसे आणि काका-मामांनी कपडे घेण्यासाठी दिलेले पैसे, पॉकेटमनी असं सगळं सहा महिने जमा करून त्याने माईक, कन्सोल, रेकॉर्डर अशा वस्तू घेतल्या आणि घरी सुरू झाला ‘रेडिओ प्रसाद’. त्या वयात स्टेशनमध्ये काम करता येत नाही म्हणून काय झालं, निदान घरी तरी ‘आरजे’ होण्याची हौस भागवता येतच होती. त्याचा छंद पाहून घरचे पण खुश व्हायचे. चला पोरगं काही तरी करतंय, यातच त्यांना आनंद. अकरावी-बारावीतही प्रसादचा हा घरगुती ‘सेल्फ रेडिओ’ चालूच होता.
मग पुढे काय झालं?
प्रसाद सांगतो, ‘‘बारावीनंतर बीसीएला अॅडमिशन घेतलं. तेव्हा वाटलेलं, १८ वर्षे पूर्ण झाली आपल्याला, आता आरजे बनू. पण वडील म्हणाले, ‘तुला रेडिओत काम करायचं तर कर पण आधी डिग्री तर मिळवं.’ म्हणून मग फर्स्ट इयरला रेडिओकडे थोडं दुर्लक्ष केलं. पण अभ्यासात मी कधीच हुशार नव्हतो. म्हणून पहिल्याच वर्षी निकाल नापास आणि वर्ष ड्रॉप करण्याची वेळ आली. ही तर माझ्यासाठी आयती संधीच चालून आली होती. मी तेव्हा नातेवाईकांक डे मुंबईला गेलो होतो. तिथं इंटरनेटवर आरजेच्या इंटर्नशिपबद्दल कळालं. लगेच आमची स्वारी तिथे. खूप विनंती केल्यावर त्यांनी चान्स दिला. सहा महिने तेथे राहिलो. या काळात सगळं शिकलो. मग या सहा महिन्यांच्या अनुभवावर नगरमध्ये एका कम्युनिटी रेडिओमध्ये आॅफर मिळाली. पगार चार हजार रुपये. वडिल म्हणाले, तुझ्यासाठी तो चाळीस हजारांच्या बरोबर आहे. मग तर आणखीच हुरूप आला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संपूर्ण अनोळखी शहरात मी जाऊन पोहचलो. केवळ रेडिओचं पॅशन म्हणून!’’
- प्रसाद हे सांगतो, तेव्हा ऐकतच राहावंसं वाटतं.
म्हणजे वर्ष गेलं म्हणून घरी बसून वाया घालवण्यापेक्षा त्याने ती संधी मानून करिअर बनवायला घेतलं. आपल्या प्रत्येकाला काही ना काही करायचे असतं. आपल्यातील काहीजण प्रयत्नही करतात. परंतु एक-दोन वेळा अपयश आल्यामुळे ते प्रयत्न करणं सोडून देतात. पण प्रत्येक नकार ही नवं शिकण्याची, स्वत:ला ‘इम्प्रुव्ह’ करण्याची संधी असते. मुळात आपली पॅशन पूर्ण करायला ‘मॅडनेस’ लागतो. तो प्रसादमध्ये ठासून भरलेला आहे.
त्याने काय वाट्टेल ते केलंय त्यासाठी. प्रसाद सांगत होता, ‘मी एका आरजेला रोज रात्री फोन करायचो अन् आरजे बनण्यासाठी काय करायला पाहिजे ते विचारायचो. तो मला म्हणाला की, वाचन वाढव. तर मी अधाशासारखी तीन-चार पुस्तकं वाचून काढली, तो म्हणाला पेपर वाच, मी घरी तीन-चार पेपर लावले. वहीचे कागद फाडून ‘आरजे टिप्स’ म्हणून डायरीपण बनवली. त्याच्या प्रत्येक सल्ल्याचं मी तंतोतंत पालन करत राहिलो. परिस्थिती अशी होती की, नाशिकच्या रेडिओ कम्युनिटीमध्ये मला लोक ‘रेडिओसाठी पागल’ म्हणू लागले. पण मला फरक पडत नव्हता.’
वर्ष सरल्यावर कॉलेज सुरू झालं. म्हणून त्याने नाशिकमध्ये कम्युनिटी रेडिओ जॉईन केला. इथं तर त्याने दोन महिने रेडिओच्या तांत्रिक व क्रिएटिव्ह बाजू एकट्याने सांभाळल्या. याचा लाभ काय झाला असं विचारल्यावर त्याने फार मस्त किस्सा सांगितला.
‘‘त्याचं झालं असं की, ‘फर्स्ट इयर रिपीट करत असताना कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले होते. मी पात्र नसुनही कॉलेजने माझं नाव दिलं. मी मुलाखत दिली. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी दिलेलं उत्तर ऐकून ते म्हणाले की, तुझी शैक्षणिक पात्रता पूर्ण असती तर तुझी नक्की निवड केली असती. माझ्यामध्ये असा प्रचंड आत्मविश्वास आला. रेडिओसारख्या क्रिएटिव्ह फिल्डमध्ये शिकतानाच काम करण्याची संधी मिळाल्याने मला जे ‘एक्सपोजर’ मिळालं, व्यापक ज्ञान-अनुभवाची दारं उघडली त्याचा नक्कीच माझ्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या दुनियादारीशी माझा संबंध आला.’
आरजे म्हणून प्रसिद्धी, थोडसं ग्लॅमर ओघानं येतंच. पण त्यापेक्षाही लोक तुमच्या मताला, बोलण्याला महत्त्व देऊ लागतात. चार-चौघात तुमची प्रतिष्ठादेखील वाढते. ‘मॅच्युअर’ होणं म्हणतात ना, ते होतं. जॉब म्हणजे काय तर एक जबाबदारी असते. ती व्यवस्थित पार पाडणं तुमच्याकडून अपेक्षित असतं. विद्यार्थी दशेतच जबाबदारी पेलणं आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळाली तर अतिउत्तम! प्रसादच्या बाबतीतही तेच झालं. तो म्हणाला, ‘लहानपणी माझा वात्रटपणा पाहून नातेवाईक आई-पप्पांना म्हणायचे याचं काही खरं नाही. पोराचं कशातच लक्ष नाही. पण मला काम करताना पाहून त्यांचा दृष्टीकोन बदलला.’
शिकताना कामं करावंच असं नाही. परंतु शिक्षणावर परिणाम न होऊ देता सुट्यांमध्ये काही अनुभव घ्यायचा म्हणून, काही नवीन शिकायला मिळणार म्हणून नक्कीच कु ठे तरी हातपाय मारायला पाहिजे. खऱ्या आयुष्याची चव चाखलीच पाहिजे. कॉलेजनंतर बाहेर पडण्यापूर्वी निदान मुलभूत स्वरुपाचा तरी प्रक्टिकल अनुभव गाठीशी असावा. प्रसादचं पॅशन आहे म्हणून त्याने रेडिओमध्ये स्वत:ला झोकून दिलं. औरंगाबादला रेडिओ जॉईन केला तेव्हा तर तो पहिल्यांदाच शहरात आला होता. कोणी नातेवाईक नाही ना कोणी मित्र. आला नाशिकहून थेट औरंगाबादमध्ये. केवळ आपल्या टॅलेंटच्या डेअरिंगवर. इथं मित्र जमवले, शहरभर फिरला, लोकांशी बोलला, शहरालाच आपलसं केलं. इव्हिनिंग जॉकी वरून त्याने मॉर्निंग जॉकी होण्यापर्यंत मजल मारली.
‘मनात असेल ना तर सगळं शक्य आहे’ असं म्हणून तो ट्यून आॅफ करतो.
------------
पान 6 साठी बॉक्स
शिकता शिकता
जॉब करून
काय मिळतं?
ती तिकडली अमेरिकेतली साशा ओबामा असो
नाहीतर आपला औरंगाबादचा एकनाथ, नाहीतर प्रसाद;
यांच्या स्टोऱ्या आॅक्सिजनने इथे काही
टाईमम्पास म्हणून नाही सांगीतलेल्या.
काय सांगावं, हे वाचून कोणातरी डोक्यात
काहीतरी चमकेल... कसलातरी प्लान होईल...
काहीतरी धडपड सुरू होईल...
निदान विचार तरी शिरेल कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये!
ही अशी धडपड करकरून काय मिळतं?
.................................
पुढच्या अंकात!