माधुरी दीक्षितसारखं ‘फ्युजन’ आपल्याला जमेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 06:06 PM2018-10-11T18:06:12+5:302018-10-11T18:06:17+5:30
जिन्सवर टॉप किंवा कुर्ता हे कॉम्बिनेशन बोअर झालं. हा घ्या नवीन ट्रेण्ड.
- श्रुती साठे
एखादा वेस्टर्न किंवा इंडियन टॉप आणि जिन्स हे कॉम्बिनेशन तसं आता आपल्या सरावाचं झालंय. पण या त्याच त्या कॉम्बिनेशनचाही कंटाळा येतो. वेस्टर्न कपडे वापरणार्यांनाही सगळीकडे सरसकट क्र ॉप टॉप किंवा ब्रालेट कुठंही, कधीही वापरता येत नाही. कितीही म्हणलं तरी विचारच करावा लागतो असे कपडे वापरताना! अशावेळी धावून येतं आपल्याकडे असलेलं आपलं फेव्हरीट एथनिक वेअर कलेक्शन! आपल्याकडे असलेले वेस्टर्न आणि एथनिक वेअर यांचा हुशारीने वापर करून त्यातून एक अनोखा फ्युजन ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. पारंपरिक आणि आधुनिकतेचा हा मिलाफ सहज जमू शकतो.
तो जमवलाय खुद्द आपल्या आवडत्या एव्हरग्रीन माधुरी दीक्षितनं. ती अशा फ्युजन वेअरमध्ये अलीकडेच दिसली. ब्रालेट हा कॉलेजला जाणार्या मुलींचा फेवरिट टॉप प्रकार. डिझायनर अनुश्रीने या ब्रालेट स्टाइलला एथनिक प्रिण्ट आणि एम्ब्रॉयडरीची जोड दिली. यासोबत फुल लेन्थ प्रिण्टेड पलाझो पॅण्ट आणि प्लेन लांब श्रग वापरून तिने हा लूक पूर्ण केला. फिकट हिरव्या रंगाचं, प्लेन आणि प्रिण्टचं उत्तम बॅलन्स असलेला हा फ्युजन ड्रेस माधुरीवर उठून दिसला.
आपणसुद्धा असं फ्युजन नक्की ट्राय करू शकतो. एखादा प्लेन आणि प्रिण्टेड क्र ॉप टॉप असेल तर तो डेनिमवर वापरायच्या ऐवजी एथनिक प्रिण्टेड पलाझोवर वापरून पाहा. यावर नेहमी स्टोल घेत असाल तर तसे न करता लांब श्रग वापरून पाहा. असे कॉम्बिनेशन करताना प्लेन आणि प्रिण्टेड कपडय़ांचा योग्य बॅलन्स सांभाळणं गरजेचं असतं. नुसतंच सगळं प्लेन नको किंवा प्रिण्टचा अतिरेकसुद्धा नको. माधुरीसारखं एकाच रंगाचे टॉप, पॅण्ट आणि श्रग किंवा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हेसुद्धा सुंदर दिसतं.