सूर्याला उठवण्याचं वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 07:59 AM2021-02-25T07:59:27+5:302021-02-25T08:00:02+5:30

माझ्या मनात होतं की, अशी जागा कमवायला पाहिजे, जिथं कुणी ऊठ म्हणणार नाही! त्यासाठी मी मार्ग शोधत होतो, तो मार्ग सापडला आणि मला डोंगर हाका मारू लागले!

The madness of rising the sun | सूर्याला उठवण्याचं वेड

सूर्याला उठवण्याचं वेड

Next

- अंबादास गायकवाड

मला डोंगर फिरायला जायची आवड होती. मी घरच्यांनाही सोबत घेऊन जायचो. मनात काय माहिती पण वाटत राहायचं की, आपण काहीतरी जगावेगळं करू. परिस्थिती अशी की, जवळचे-नातेवाईक-मित्रही कधीकधी कमी लेखत. कधी आपण चांगलं वागूनही लोक धोका देत. हे सारं बोलायचं कुणाशी? निसर्गाशी बोलायचो. निसर्ग कधी कुणाला धोका देत नाही. मग, त्यालाच मनातल्या गोष्टी सांगायचो. कुणी अपमान केला, कुणी काही बोललं, आपण मनात काही ठरवलं की ते सांगायचो. मनात होतं की आपण मोठं झालं पाहिजे, तेही डोंगरावरच्या झाडापानांना सांगायचो. ५-६ वर्षांपूर्वी असंच डोंगरावर जाऊन बसलो, मनात आलं की अशा जागी जाऊन बसायला पाहिजे की जिथून कुणी ऊठ म्हणणार नाही. मग मी जरा पुस्तक, लेख वाचू लागलो की जे लोक मोठे होतात, नाव-यश कमावतात, ते नक्की काय करतात. तेव्हा कळलं की, हे लोक सूर्याला उठवतात. म्हणजे काय तर हे लोक पहाटे उठतात, आपलं काम करतात, अभ्यास करतात. सूर्य उगवण्यापूर्वी ते उठतात. मीही ठरवलं आपण असं सूर्याला उठवू शकतो का? मग, मी स्वत: पहाटे चार वाजता उठू लागलो. साडेचारला डोंगरावर जायचं, व्यायाम, श्वसनाचे प्रकार करायचो. सूर्य उगवताना बघायचो. ते दृश्य मला फार प्रेरणा द्यायचं. मला मनोमन पटलं होतं की, हे असं सूर्य येण्यापूर्वी उठलं तर आपली प्रगती होईल. त्यासोबत मी एक केलं की, माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचा प्रयत्न केला. जे लोक मला ओळखतात, त्यांच्यापासून ठरवून लांब होत जे लोक ओळखत नाहीत, ज्यांना मी माहिती नाही, जे यशस्वी आहेत, त्यांच्यासोबत राहू लागलो. ते अनेकदा अपमान करत, मला राग येई. माझा स्वभाव ताडकन् बोलण्याचा. मी त्याला आवर घातला. स्वत:ला पुन्हा विद्यार्थी समजून शिकू लागलो. स्वत:वर मेहनत घेणं सुरू केलं.

काही जवळचे मित्र म्हणायचे, पागल झालास का? लग्न झालं, लेकरं झाली तुला, डीप्रेशन आलंय का, कशाला नाही ते विचार करतोस?’

त्यांची काळजी चुकीची नव्हती. वडील गेले, मी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागतो. शिपाई म्हणून, शिक्षण चालू ठेवलं. मग क्लार्क आणि नंतर असिस्टंटचं प्रमाेशन मिळालं. गाव सोलापूर जिल्ह्यात वळसण, मी औरंगाबादला स्थायिक झालो. सगळं तसं चांगलं चाललं होतं. पण मला काहीतरी मोठं, युनिक करायचं होतं. माझ्या डोक्यात तेच विचार होते. मी आईशी, बायकोशी बोलायचो. पण, मोठं काही दिसत नव्हतं. आई म्हणायची, हेही दिवस जातील, मोठं काहीतरी तुला दिसेल, तू फक्त हताश, निराश होऊ नकोस. प्रयत्न करणं थांबवू नकोस.

मी तेच केलं. काश्मीरमध्ये, पहलगामला जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेअरिंग आहे. मी त्यांच्याशी संपर्क केला. त्या संस्थेत प्रवेश घेतला. तिथं जाऊन शिकलो. तिथं मला अनेक मित्र भेटले जे म्हणाले की, तू जो विचार करतोस ते चूक नाही. ट्रेकिंगच्या क्षेत्रात तू मोठं यश कमवू शकतोस, प्रयत्न कर. मग, मला कळलं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत. ट्रेकिंग क्षेत्रातल्या अनेक नामवंतांनीही मला मार्गदर्शन केलं. माझी आई, बायको, बहीण, भाऊ हे कुटुंबही सोबत होतं. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्यानंतर मी लडाखमधलं एक मोठं शिखरही सर करून आलो. तेव्हा मनात आलं की, आपण देशासाठी काहीतरी करू.

त्यानंतर मला किलीमांजारो शिखर मोहिमेची माहिती समजली आणि मी त्याचा ध्यास घेतला. वाटलं असं उंच ठिकाणी हातात तिरंगा घेऊन जाऊ, की इतरांनाच कशाला आपल्यालाही स्वत:चा अभिमान वाटेल.

मग मी माझा व्यायाम, सराव, आहार यांचं टाइमटेबल बनवलं. आपल्या अवतीभोवती जे घडतं ते सारं सकारात्मकच आहे, असं ठरवलं. मनात निगेटिव्ह विचार आले की त्यांना बाजूला केलं. सतत आपल्याच वाटेला कमीपणा का येतो असा विचार न करता, आपण काहीतरी खास करू असं मानून चालू लागलो. घरच्यांसोबतच माझ्या डिपार्टमेण्टचे सहकारी, वरिष्ठ सोबत होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं. मी सकारात्मक झालो तसं सारं सकारात्मक घडू लागलं; आणि म्हणता म्हणता मी किलीमांजारो मोहिमेवर गेलो.

एवढी मोठी मोहीम फत्ते करून आलो.

आता वाटतं की, या मोहिमेच्या यशाबद्दल इतरांना काय सांगू शकेन?

कष्ट, मेहनत, ट्रेकिंगचा सराव हे तर सारं आवश्यक असतंच. पण, त्याहून महत्त्वाचं हे असतं की, जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो, पडती बाजू असते तेव्हा खरंतर व्यसनांपासून लांब राहायला हवं. ते महत्त्वाचं. त्याचवेळी घरचे, मित्र, मार्गदर्शक जे सांगतात, ते ऐकायचं. ते पटेलच असं नाही, पटलंच पाहिजे असंही नाही. पण, उलट उत्तर न देता, शब्दानं शब्द न वाढवता गप्प राहून ऐकायचं. भांडण करून वातावरण बिघडवून टाकायचं नाही. त्यांना आपली काळजी आहे, त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर विचार करायचा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माणसं यशस्वी होतात, ती कायम विद्यार्थी असतात, हे मला पटलं आहे. शिकत राहायचं, समजून घ्यायचं. शिकण्याचा ध्यास सोडायचा नाही. या मोहिमेच्या यशानं मलाही हेच शिकवलं आहे. यशस्वी होणं या दिशेनं जातं हे मला पटलं आहे.

(शब्दांकन - ऑक्सिजन टीम)

Web Title: The madness of rising the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.