महाराष्ट्र शासनाची वेबसाईट
By Admin | Published: March 10, 2017 12:54 PM2017-03-10T12:54:10+5:302017-03-10T12:54:10+5:30
जर तुम्हाला हे शासन कसं काम करतं, नक्की निर्णय कसे घेतले जातात याबद्दल काहीही माहीत नसेल तर तुम्ही मतदान करणार तरी कशाच्या आधारे.
>प्रज्ञा शिदोरे
महाराष्ट्रात नुकत्याच निवडणुका झाल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक नेहमीचा विषय असतो, तो म्हणजे चांगले नागरिक बनण्याचा. मग मतदान कसं श्रेष्ठ दान आहे वगैरे गोष्टीही सुरू होतात. पण आहो, जर तुम्हाला हे शासन कसं काम करतं, नक्की निर्णय कसे घेतले जातात याबद्दल काहीही माहीत नसेल तर तुम्ही मतदान करणार तरी कशाच्या आधारे. मग जो कोणी जरा बडेजाव करत असेल त्याला देऊन टाका मत... काय!? पण चांगला नागरिक होण्यासाठी खरंच खूप प्रयत्न करावे लागतात मित्रांनो. लोकशाही म्हणावी तशी सोपी नक्कीच नाही. मग असं चांगला नागरिक व्हायला काय करावं लागतं? सर्वप्रथम म्हणजे शासनाच्या निर्णयांबद्दल जागरूक असणे. पण त्यासाठी केवळ वर्तमानपत्र वाचून पुरे नाही. माहितीच्या मुळापर्यंत जावं लागतं, तेव्हा कुठे तुम्हला सत्य सापडतं. तर याबद्दलच आज आपण पाहणार आहोत. हे संकेतस्थळ खरं तर अगदीच ‘आॅबियस’ आहे असं तुम्ही म्हणाल. पण तुम्ही यात खोलवर गेलात की तुम्हाला यातल्या मजा लक्षात येतील. हे संकेतस्थळ आहे mahagov.org म्हणजे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ. हे संकेतस्थळ खरं तर काही अपरिहार्यता म्हणून तयार करण्यात आलं असं काही काळापूर्वी वाटायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये यामधून मिळणारी माहिती खरंच उपयोगी ठरते. इथे आपल्याला महाराष्ट्र शासनाबद्दल सर्व माहिती मिळते. म्हणजे अगदी आपले मंत्री कोण आहेत, त्यांची पदं काय आहेत, प्रत्येक विभागामध्ये कोणाचे काम काय हे सर्व इथे वाचयला मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शासननिर्णय वाचायला मिळतात. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने याबद्दल माहिती घ्यायलाच हवी असं ठिकाणं. कारण इथे घेतलेले निर्णय तुमच्या- आमच्या जीवनावर थेट प्रभाव टाकतात! अगदी परवाच मी हे संकेतस्थळ पाहत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नागपूरहून मुंबईला जाणारा ‘समृद्धी’महामार्ग शासन तयार करणार आहे असं. मी वर्तमानपत्रातून वाचत होतेच याविषयी, पण थेट उत्तरचं मिळाली माझ्या प्रश्नांना इथे! हा निर्णय होता सार्वजनिक बांधकाम विभागाचा. अशाच अनेक विभागांचे दर आठवड्याला होणारे निर्णय या संकेतस्थळावर टाकले जातात. मित्रांनो, आठवड्यात अधिवेशन सुरू आहे. तेव्हा या संकेतस्थळावर या अधिवेशनाच्या बातम्या येतील. नेहमीच्या आरडाओरडा करत राहणाऱ्या वाहिन्यांपेक्षा हे संकेतस्थळ तुम्हाला तुमच्या शासनाबद्दल नक्कीच अधिक चांगले ज्ञान देईल हे नक्की!