ग्रामपंचायतीवर तुमचा कण्ट्रोल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 02:46 PM2019-07-11T14:46:23+5:302019-07-11T14:46:43+5:30

तरुण पोरंही डायलागबाजी करतात, ग्राम पंचायतीला शिव्या देत म्हणतात, आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. गावचा काय इकासच झाला नाही; पण तो व्हावा म्हणून तुम्ही काय केलं?

THE MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT : how to use it? | ग्रामपंचायतीवर तुमचा कण्ट्रोल आहे का?

ग्रामपंचायतीवर तुमचा कण्ट्रोल आहे का?

Next

- मिलिंद थत्ते 

आमच्याकडे ग्रामसभा होतच नाय हो. कधी भरते काही कळतच नाही. पण तसंही आपल्याला काय करायचंय ग्रामसभेत जाऊन? तिथे नुसती भांडणं नि राजकारण! ते पंचायतीची मानसं सह्या घेत हिंडतात रजिस्टरवर, घरपोच सेवा म्हना की. आपण ग्रामपंचायतीत जायचं काही कामच पडत नाई बगा..
अशी डायलॉगबाजी सगळीकडे ऐकू येते. तरुण पोरंही हेच बोलतात. आणि मग दर पाच वर्षानी ‘आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही’, ‘गावचा काय इकासच झाला नाही’ म्हणत ग्रामपंचायतीला शिव्या देत राहातात. 
आपणच निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य, मग त्यांना नियंत्रितपण आपणच ठेवलं पाहिजे, आपणच नियंत्रित करण्याची असते ती ग्रामपंचायत. तसं केलं नाही तर आपण दिलेल्या शिव्या आरशावर आपटून परत आपल्याच मुस्काटीत बसतात. तेव्हा असंच आरशाशी खेळत राहण्यापेक्षा गावात काही बरं करायचं असेल तर ग्रामपंचायत कायदा थोडा समजून घेतला पाहिजे. 
फार मोठा नाही हा कायदा फक्त 90 पानांचा आहे, म्हणजे उशाखाली घ्यायला उपयोगाचा नाही. वाचायला फार मोठा नाही. सुरुवातीला कायदा वाचताना झोप येते खरी पण हळूहळू तो समजू लागतो. 
आपण एपिझोड करून कायदा वाचला तर लई सोपं जातंय. 
सुरू करूया? 
ओ, हा कायदा मिळणार कुठे पण? 
ही घ्या लिंक https://bhasha.maharashtra.gov.in/pdf/RajyaMarathiAdhiniyam/1959-3.pdf  

झाला ना डाउनलोड? 
प्रत्येक कायद्यात सुरुवातीला कलम ? मध्ये कायद्याचं नाव, कलम 2 मध्ये तो कायदा कुठे लागू असणार, व कलम 3 मध्ये कायद्यातील शब्दांच्या व्याख्या असतात. मग कायदा सुरू होतो. (‘कलम’ आसं कुटं लिवलेलं नस्तं. परिच्छेदाच्या सुरु वातीचा ठळक आकडा म्हंजी कलम)  
आत्ता हा कायदा वाचताना आपण थेट उडी मारूया कलम 7 वर. 
का म्हणजे? तिथे तुमचं नाव लिहिलंय हो! बघा आहे का?
1. ग्रामसभेच्या सभा 
ग्रामसभेच्या सभा निदान चार व्हायला हव्यात, दोन सभांमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त गॅप असता कामा नये, ग्रामसभेची सभा बोलावलीच नाही तर सरपंच व ग्रामसेवकावर कोणती कारवाई होऊ शकते असे सगळे या कलम 7 मध्ये आहे. त्यात अनेक पोटकलमे आहेत. त्यातले (9) बघा - ग्रामसभेतच पुढच्या ग्रामसभेची तारीख-वेळ-ठिकाण ठरवता येते. याचा अर्थ असा की तुम्ही ग्रामस्थ मतदारांनी मिळून मागणी केली तर दर महिन्याला/दर आठवडय़ालासुद्धा ग्रामसभा बसू शकते. आमच्या चळवळीतल्या अनेक गावांत अशा दरमहा ग्रामसभा होतात. त्यांची कामे लटकून राहात नाहीत, चालू कामांबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारले जातात. कामांच्या गुणवत्तेवर देखरेख राहाते. 
दुसरा अर्थ 7(9)चा असा की - ग्रामसभेचे ठिकाण व वेळसुद्धा तुम्ही ठरवू शकता. दरवेळी ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या आफिसातच भरली पाहिजे असं नाही. तुमच्या वस्तीतसुद्धा ग्रामसभा होऊ शकते. तुमच्या सोईच्या वेळी होऊ शकते. 
पुढच्या पोटकलमात म्हणजे 7(10)मधे आणखी भारी गोष्ट आहे.. 
पण मीच सगळं कशाला सांगू? बघा की वाचून.


    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
 

Web Title: THE MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT : how to use it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.