दिवाळीत करा स्मार्ट शॉपिंग, काठापदराच्या साड्या, की अनारकली ड्रेस?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:38 PM2017-10-12T12:38:53+5:302017-10-12T12:40:01+5:30

शॉपिंग. आजकाल आपण कधीही केव्हाही खरेदी करतो. पूर्वी दिवाळीची खरेदी. त्याचं फार अप्रूप असे.

Make Diwali Smart Shopping, | दिवाळीत करा स्मार्ट शॉपिंग, काठापदराच्या साड्या, की अनारकली ड्रेस?

दिवाळीत करा स्मार्ट शॉपिंग, काठापदराच्या साड्या, की अनारकली ड्रेस?

googlenewsNext

-प्राची खाडे

शॉपिंग. आजकाल आपण कधीही केव्हाही खरेदी करतो.
पूर्वी दिवाळीची खरेदी. त्याचं फार अप्रूप असे.
आपल्या आजी-आईबाबांची पिढी तर या दिवाळसणाच्या कापडाचोपडाचे किती किस्से सांगतात.
आता काळ किती बदलला, आपण आपल्या मोबाइलवर टाइमपास म्हणून शॉपिंग साइट्स पाहतो. विशलिस्टमध्ये घालून ठेवतो, जे आवडेल ते. किंवा मित्र-मैत्रिणी मॉलमध्ये भेटणार असलो तर विंडो शॉपिंग करताना एखादा टॉप जाम आवडला म्हणून पटकन घेऊनही टाकला जातो. असे ‘फक्त आवडले’ म्हणून किंवा ‘सहजच’ कितीतरी कपडे अगदी सहज घेतले जातात. आॅनलाइन शॉपिंगची तर बातच न्यारी. त्या अलिबाबाच्या गुहेत तर फॅशनचे अनेक नवनवे ट्रेण्ड बघायला मिळतात. हे सर्व कपडे किंवा एकावेळी भली मोठी शॉपिंग पाहून घरचे म्हणतातही, तुमच्या एवढी शॉपिंग आम्ही कधी केलीच नाही. दिवाळीला काय ते नवीन दोन ड्रेस मिळायचे. ते आम्ही वर्षभर पुरवून वापरायचो. म्हणजेच दिवाळीच्या कपडे खरेदीला जुन्या काळापासून विशेष महत्त्व आहे.
पण मग ते आता नाही का?
वर्षभर शॉपिंग करतो म्हणून दिवाळीत काहीच घेत नाही असं थोडीच होतं. दिवाळीतही आपण हौसेनं खरेदी करतोच.
फक्त विचार करायला हवा की, दिवाळी आपण असं काय घेणार जे आपण वर्षभर घेत नाही?
किंवा असं काय घ्यावं, जे असं सणावाराला नाही तर वर्षभर वापरता येईल?
कपाटात पडून राहणार नाही? पैसे वाया जाणार नाही?
आणि मुख्य म्हणजे बजेट? आपण कधीतरीच म्हणजे ओकेजनली जे कपडे वापरणार, त्यासाठी आपण किती पैसे खर्च करणार?
दिवाळीच्या शॉपिंगची तुमची कितीही लगबग असली तरी शॉपिंगला जाण्यापूर्वी काही गोष्टींची लिस्ट करा. काही गोष्टी ठरवून घ्या, तर मग दिवाळीची शॉपिंग नुस्ती हौसेची ठरणार नाही तर वर्षभर आपल्याला ‘स्टायलिश’ दिसायला मदतही करेल..
ते कसं?
त्यासाठीच घ्या या काही टिप्स..
आणि मग जा शॉपिंगला..

काठापदराच्या साड्या, की अनारकली ड्रेस?

जरीकाठाच्या साड्या, शालू, पैठणी या कपड्यांचे सणावाराला असणारे महत्त्व दिवाळीत नेहमीच असते. त्याच्यावरच्या पारंपरिक ज्वेलरींबाबतही तीच परिस्थिती आहे. ही क्लासिक स्टाईल. आजकाल साडी गाऊनही ट्रेण्डमध्ये आहेत. पण आजकालच्या धावपळीच्या जगात तुम्ही किती वेळा साडी नेसता याचा विचार करून जरीकाठाच्या साड्या घ्या. आणि अजिबात वापरत नसाल तर मग सणावाराला, पारंपरिक कार्यक्रमांना वापरता येतील असे शॉर्ट कुर्ती आणि अनारकली गाऊन्स घ्या. सध्या ते ट्रेण्डमध्ये आहेत. बंद गळ्याचा हा ड्रेस असेल आणि त्या ड्रेसवर एम्ब्रॉयडरी असेल तर गळ्यात काही न घालता कानातलंच फक्त थोडं मोठं घाला. हातात सिंगल कडं घालण्याचा ट्रेण्ड आहेच. त्यामुळे दिवाळीत काय घ्यायचं या प्रश्नाचं हे सोपं उत्तर.

जॅकेट घेतलं का?
मुलांचा कल हा इंडो वेस्टर्न कपड्यांकडे जास्त आहे. त्यात मोदी जॅकेट, नेहरू जॅकेट यांची क्रेझ आहेच. याशिवाय जोधपुरी ट्राऊजरवर वर शर्ट घालून त्यावर बंडी घालण्याचाही ट्रेण्ड आहे. त्यामुळे तुम्हाला एक इंडियन टच मिळतो. याशिवाय ट्राऊजर वर डेनिम शर्टही घालता येतो. तसंच सिमेट्रिकल कुर्त्यांचीही सध्या फॅशन आहे. तो पायजमा, जीन्स कशावरही चालू शकतो. आॅफिसेसमध्ये सणासुदीच्या काळात असे कुर्ते घालतात येऊ शकतात.


खरेदीचं प्लॅनिंग करताना..
१) आपलं बजेट किती आहे ते पहिले ठरवा.
२) त्यानुसार कोणते कपडे घेणं गरजेचं आहे त्याची लिस्ट करा. या लिस्टमध्ये दिवाळीचे कपडे, त्यावर चपला, त्याचबरोबर जर आॅफिससाठी कपडे घेणार असाल तर ते अशी नोंद करा. आपल्यासाठी काय आवश्यक आहे हे त्यातून लक्षात येईल.
३) लिस्ट तयार झाल्यानंतर बेसिक बजेट ठरवा. म्हणजे अगदी किती रुपयांचा ड्रेस घेणार आहात ते ठरवून त्याप्रमाणे त्या बजेटच्या दुकानात जाऊनच खरेदी करा. म्हणजे जर तुमचं बजेट दीड हजार असेल तर त्यात चांगली खरेदी ही साध्या मार्केटमध्ये होऊ शकते. त्यासाठी मॉल गाठू नका. बजेट कमी आहे तरी तुम्ही अगदी मोठ्ठ्या दुकानात वा मॉलमध्ये गेलात तर तिथे योग्य ड्रेस न मिळाल्याने मूड जातो. ते टाळा. म्हणजेच बजेट ठरवा आणि त्यानुसार शॉपिंग करा. शहरातल्या जुन्या दुकानांत, जुन्या खरेदींच्या जागा पहा, तिथं उत्तम ड्रेसेस मिळतात.
४) मुख्य शॉपिंगनंतरच एक्स्ट्रा खरेदी करा.
इथं आपण नेहमी चुकतो..

१) एखादा ड्रेस घेताना आवडला म्हणून तो घेण्यापेक्षा प्रॅक्टिकली तो कितीवेळा वापरणार आहोत, हा विचार नक्की करा.
२) आपल्यापेक्षा कमी साईजचे कपडे घेणं टाळा. एखादा आवडला कमी साईजचा टॉप बारीक झाल्यावर घालता येईल म्हणून घेतला जातो. पण तशी वेळच येत नाही. तो टॉप तसाच पडून राहतो. त्यामुळे असे करणं टाळा. जे शरीराला योग्य आहे तेच घ्या.
३) आजकाल सगळ्यांकडे वेळ कमी असतो. म्हणून वेळेचा विचार करून शॉपिंगला जा, नाहीतर जे घ्यायचं तेच राहून जातं.
४) सेल आहे म्हणून भारंभार कपडे घेणं टाळा. बजेट बघूनच काय घ्यायचं याचा निर्णय घ्या.

फॅशन आॅन रेंट
भाड्यानं हवे ते कपडे पूर्वी कधीही मिळत होते. पण ते ठरावीक पद्धतीचेच होते. आता मात्र लोकांची फॅशनची आवड, स्टेट्स लक्षात घेता कपडे भाड्याने मिळू लागले आहेत. यात ट्रेडिशनलपासून इंडो वेस्टर्न स्टाईलचे कपडे आणि त्यावर मॅच होणारी ज्वलेरी असं जे पाहिजे ते यात मिळू शकतं. त्यामुळे दिवाळीत जर नवीन कपडे घेण्यासाठी वेळ नसेल किंवा तशी इच्छा नसेल, बजेट नसेल तर अशावेळी हा पर्याय बेस्ट ठरतो. कोणत्याही सण, समारंभाला हा पर्याय तुम्हाला वापरता येऊ शकतो. यात हजार रुपयांपासून दहा हजार किंवा त्यापुढेही दिवसांच्या हिशोबाने कपडे भाड्याने मिळतात. म्हणजे जर एखाद्या प्रसिद्ध साइटवरून लेहंगा सेट ४ दिवसांसाठी भाड्याने घेतला तर त्याचा दर १,४९९ ते दहा हजारापर्यंत असतो. अशा भाड्याने कपडे घेण्याचा ट्रेण्ड सध्या सुरू आहे. त्यासाठी जरा गूगल करा किंवा आपल्या शहरातच चौकशी करा.

सोशल मीडियासाठी शॉपिंग नको..
सोशल मीडियावर आजकाल सगळेजण असतात. तिथे असल्यावर एखादा कपडा रिपिट नको याची काळजीही आजकाल तरुणाई घेत असते. अशावेळी शॉपिंग करताना बेसिक कलर घ्या. जे परत वापरता येतात. म्हणजे एखादा सिम्पल कलरचा कुडता घेतलात तर त्यावर वेगळ्या बॉर्डरचा दुपट्टा घेता येतो. आणि आपण ड्रेस रिपिट केला हे कुणाला कळतही नाही. त्या टॉपवर तुम्ही स्कर्ट घातला आणि वर एखादी कलरफुल माळ घातली तरी लूक बदलेल. पण केवळ सोशल मीडियात त्यात त्या कपड्यातले फोटो रिपिट होतात म्हणून शॉपिंग करू नका.

मुलाखत आणि शब्दांकन
भक्ती सोमण

Web Title: Make Diwali Smart Shopping,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.