मल्लखांब- वेगानं ग्लोबल होणार्या एक लोकल खेळाचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:30 PM2019-02-06T17:30:44+5:302019-02-06T17:31:43+5:30
फ्रेंच मुली मल्लखांबावर सरसर चढतात. जर्मन पालक मुलांना हौशीनं मल्लखांब शिकवतात, हे चित्र मुंबईतलं! आणि आता तर मल्लखांबची जागतिक स्पर्धाच मुंबईत आयोजित होते आहे.
- चिन्मय भावे
नाताळची सकाळ, मुंबईतल्या फ्रेंच इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी आणि पालक हा सण साजरा करण्यासाठी जमले आहेत. गाणी, डान्स एकंदर उत्सव रंगात आलेला आहे. आणि मग समर्थ व्यायाम मंदिराच्या ड्रेसमध्ये चार छोटय़ाशा मुली मल्लखांबाजवळ येतात आणि कोच स्वप्निल खेसेकडे आश्वासक नजरेनं पाहात पुरलेल्या मल्लखांबावर काही वेधक प्रात्यक्षिके करून दाखवतात. आणि मग थरार अजून वाढतो जेव्हा 5-12 वर्षे वयोगटातील या चिमुरडय़ा पिरॅमिडसुद्धा करून दाखवतात. नाताळचे प्रतीक असलेलं ािसमस ट्री मल्लखांबावर साकार होतं आणि टाळ्यांच्या गजरात हा कार्यक्र म संपन्न होतो.
‘आम्ही नेहमीच असा प्रयत्न करतो की आमच्या मुलांना भारतात राहण्याचा परिपूर्ण सांस्कृतिक अनुभव मिळेल आणि त्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टींचे प्रशिक्षण शाळेत मिळेल असा प्रयत्न असतो. म्हणूनच उदय देशपांडे आणि स्वप्निलच्या मदतीने आम्ही इथं मल्लखांब सुरू केला. आणि मुलांना हा खेळ इतका आवडलाय की आता आमच्या कार्यक्र माचा तो जणू एक अविभाज्य भागच होऊन गेला आहे’ या शाळेत समन्वय करणारा अमारो सांगतो.
स्वप्निलचे मल्लखांब प्रशिक्षण शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायाम मंदिरात झाले. आज तो व्यावसायिक फोटोग्राफर असला तरीही मल्लखांब शिक्षक म्हणून नियमितपणे वेळ काढतो. या खेळाने ताकद, वेग आणि लवचिकता तर वाढतेच पण बरोबरच मानसिक एकाग्रता आणि संतुलन यांच्यामुळे मुलांची जडणघडण उत्तम प्रकारे होते, असे स्वप्निल मानतो; परंतु स्वप्निल शिकवत असताना आक्र मक पवित्ना कधीही घेत नाही. ‘प्रत्येकाला आपले शरीर कसं आहे आणि त्याची मर्यादा किती आहे याची जाणीव असते, त्या मर्यादेपलीकडे कोचने जबरदस्ती केली म्हणून पोहोचता येत नाही. आमचे काम हे प्रोत्साहन देणं आणि मार्गदर्शन करणं हे आहे’, स्वप्निल त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल सांगतो. उदय देशपांडे यांनी मल्लखांबाचा प्रसार करताना हीच दृष्टी समर्थच्या युवा प्रशिक्षकांना दिली आहे आणि त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
हा खेळ पाहून खूप कठीण वाटतो. दुखापत होण्याची भीती पालकांना असते. पुरेशी काळजी घेतली जाईल का, ही भीती तर परदेशी पालकांना अजून जास्ती प्रमाणात भेडसावत असते. अशावेळी उदय देशपांडे चतुराईने यावर मार्ग काढतात. फ्रेंच स्कूलमध्ये मल्लखांब शिकणार्या मुलींपैकी एकीची आई गेल तेसोरी तिचा मजेशीर अनुभव सांगते, ‘मी लहानपणी एक जिम्नॅस्ट होते आणि 14 व्या वर्षी मी कोपराचे हाड मोडून घेतले. मला मुलीच्या बाबतीत हीच भीती होती. आणि आम्ही फ्रेंच आया तर खूपच जास्त काळजी करत असतो. त्यामुळे मी खूपच साशंक होते. मग उदय म्हणाला की तुम्ही स्वतर् मल्लखांब करून पाहा आणि जर हा खेळ सोपा, सुरक्षित वाटला तर मुलीला शिकवा! मग मी स्वतर् काही बेसिक गोष्टी करून पाहिल्या आणि मी लवकर न घाबरता शिकू शकले. कोच किती सावध असतो आणि किती काळजी घेतो हे अनुभवलं आणि मग माझ्या मुलीला ग्रीन सिग्नल दिला.’
भारतात नोकरीनिमित्त आल्यानंतर इथं नवीन लोकं जोडणं, देश पाहणं, इथले सांस्कृतिक अनुभव घेणं यासाठी बरेच परदेशी उत्सुक असतात; पण नवीन समाजात आपण सामावले जाऊ का, ही भीतीसुद्धा असते. मल्लखांबासारखे खेळ मुलांसाठी तरी हे काम सोप्प करतात, असं काही पालक मानतात. नवीन ठिकाणी जुळवून घेणं मुलांसाठी कठीण असतं आणि मुलं रुळली नाहीत तर काय, या प्रश्नानं पालकही चिंतित असतात. मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळतील का, ही भीती असते. या दृष्टीने मल्लखांब खूप काही साध्य करतो असा अनुभव असल्याचं अमारो सांगतो. ‘आमच्या मुली टीमवर्क शिकल्या, एकमेकांची काळजी घेऊ लागल्या, निर्णयक्षम झाल्या. त्या खूप एकाग्रतेनं गोष्टी करत असत, मग मोबाइल आणि टॅब्सनी थोडी गडबड केली. मल्लखांब सुरू झाल्यावर एकाग्रता पुन्हा पूर्ववत झाली. मल्लखांब तुम्हाला त्या क्षणापुरतं जगण्याचा अनुभव देतो. हे खूप महत्त्वाचं आहे’ - फिलिप त्याच्या मुलीबद्दल सांगतो.
पार्लेश्वर व्यायामशाळेचा कोच गणेश देवरुखकर स्पर्धात्मक मल्लखांबावर अधिक लक्ष देतो आहे. जिम्नॅस्टिक्स ज्याप्रमाणे पंचांनी अंक देऊन स्पर्धात्मक मूल्यमापन केला जाणारा खेळ आहे तसाच मल्लखांब आहे आणि इतर देशांनी भारताला आव्हान द्यावं इतका मल्लखांब ग्लोबल व्हावा, असं गणेश मानतो.
ज्याप्रमाणे कोरियाने तायक्वांदो, चीनने वुशु आणि मलेशियाने सेपक टकरावचा प्रसार केला आहे तसेच भारतानं मल्लखांबाच्या बाबतीत करण्याची गरज आहे, असं उदय देशपांडे मानतात. म्हणूनच 2019 मध्ये मल्लखांबाची पहिली जागतिक स्पर्धा मुंबईत आयोजित केली जाणार आहे. फेब्रुवारीत या स्पर्धेत पंधरा किंवा अधिक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. सांस्कृतिकदृष्टय़ा ग्लोबल मल्लखांब झालाच आहे आणि ऑलिम्पिक चळवळीत जर या खेळाला स्थान मिळालं तर त्याची व्याप्ती एक स्पर्धात्मक खेळ म्हणूनही वाढेल हा विश्वास मल्लखांबप्रेमींना आहे.
***
समर्थने मल्लखांबाला ग्लोबल करण्याचं मिशन अनेक वर्षे सुरू ठेवलं आहे. आज जर्मनीत मल्लखांब फेडरेशनसुद्धा आहे; पण मल्लखांब ग्लोबल तेव्हाच होईल जेव्हा फक्त परदेशी लोकच नाहीत तर भारताच्या प्रत्येक कानाकोपर्यात या खेळाचा प्रसार होईल, असे उदय देशपांडे मानतात. अरुणाचल प्रदेशातील पापुम पारे जिल्ह्यातील विद्यार्थी आता उन्हाळी सुटीत मुंबईत येऊन मल्लखांब शिकतात आणि यावर्षी या कार्यक्र माला विवेकानंद केंद्र शाळांचे शंभरहून अधिक विद्यार्थी येण्याची शक्यता आहे.