माणूस, मशीन आणि हाताला काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 04:00 AM2017-11-30T04:00:00+5:302017-11-30T04:00:00+5:30
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयातले जगभर नावाजलेले तज्ज्ञ आणि फाइंड अॅबिलिटी सायन्सेस या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आनंद माहूरकर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बदलणाºया नव्या जगाचं चित्र...
गजानन दिवाण
एक मशीन शेकडो माणसांचं काम करू लागलं, तर रोजगार बुडतील का, तर अजिबात नाही! कॉम्प्युटर आला त्यावेळीदेखील लोकांच्या हातचं काम जाईल हीच भीती वाटत होती. पण तसं काहीच घडलं नाही. माणसाच्या कामाचं स्वरूप फक्त बदललं. आणि जे कॉम्प्युटर शिकले तेच टिकले. तेव्हा लक्षात घ्या, टेक्नॉलॉजीच्या सोबतीने जो पळेल तो टिकेल. ज्यानं तंत्राचा हात सोडला, तो मागे पडला...
कुठल्याही बिझनेससाठी भरपूर पैसाच लागतो असं नाही, तुमच्याकडे हिंमत असेल आणि भरपूर आयडियाही असतील तर महाराष्ट्रातल्या आयटी तरुणांनी नोकरीची वाट धरण्यापेक्षा उद्योगाकडे वळायला हवं..
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मध्ये जगभरात ज्यांचं मोठं नाव, ते मराठी उद्योजक हा बीजमंत्र देतात तेव्हा एक नवीन नजर येते या विषयाकडे पहायची. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसारख्या तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवून औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी केलं. पुणे-मुंबईत नोकरी केली. पण तिथेच न रमता हा तरुण आज आयटी उद्योगात टॉप रँकपर्यंत पोहचला आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयात आज काम करतोय. मात्र त्यासाठी त्यानं आयटीचे कुठलंही फॉर्मल शिक्षण घेतलेलं नाही. नोकरी करत करत एकेक कौशल्य आत्मसात केलं आणि आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मध्ये बापमाणूस म्हणून त्याची ओळख आहे.
आनंद माहूरकर त्यांचं नाव. ते ‘फाइंड अॅबिलिटी सायन्सेस’ या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अमेरिकेतील बोस्टनमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. सॉफ्ट बँक या जपानी कंपनीसोबत अलीकडेच झालेल्या करारानुसार औरंगाबादेत तयार झालेली सॉफ्टवेअर उत्पादनं ही कंपनी जपानमध्ये विकणार आहे. त्यानिमिटत्त त्यांच्याशी गप्पा झाल्या तेव्हा त्यांनी बदलत्या जगाकडे आणि व्यवसाय संधींकडे पहायची नजरच दिली..
आनंद माहूरकर सांगतात...
एक लक्षात घ्यायला हवं की अमेरिकेने जेव्हा चंद्रावर माणूस पाठवला त्यावेळेच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत आज आपण एक लक्ष पटीने पुढे आहोत. म्हणजेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण काय करू शकतो, याची नुस्ती कल्पना करून पाहा. पूर्वी राजे, महाराजे होते. काही काही गोष्टी केव्हाही, कधीही आणि कुठेही फक्त राजाने आॅर्डर दिली की हजर होत. आता आपण आॅनलाइन खरेदी करायची म्हणून एखादी आॅर्डर दिली तर ती आपल्याला घरपोच मिळते. आॅर्डर करणारा कोण, याला इथं फारसं महत्त्व नाही. तंत्रज्ञानाने प्रत्येकाला राजा बनवलं आहे. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आधी केबल लागायची. नंतर हे काम वाय-फायद्वारे होऊ लागलं. आता तर ते लाइटद्वारेही होऊ लागलं आहे. म्हणजेच आपण एखाद्या वस्तूवर हा लाइट टाकला तर त्याची संपूर्ण माहिती अगदी क्षणात आपल्याला स्क्रीनवर मिळते. आपल्या कारच्या बाजूने जाणाºया एखाद्या कारवर हा लाइट टाकला तर त्या कारचं इंजिन कुठलं, त्याची स्थिती काय, टायरची स्थिती कशी आहे ही सर्व माहिती काही क्षणात आपल्याला स्क्रीनवर दिसते. आश्चर्य म्हणजे मी लिहिलेला एखादा ब्लॉग पाहून मला कुठला रंग सूट होतो, माझं व्यक्तिमत्त्व कसं आहे हेदेखील आता मशीन सांगू शकते.’
ही सारी उदाहरणं काही आपल्या माहितीची, काही नवीन. पण यातल्या अनेक गोष्टींसाठीच्या सॉफ्टवेअरची निर्मिती माहूरकर यांनी स्वत: केली आहे. त्याचा डेमोही त्यांनी औरंगाबादेत दाखविला. आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स कसं काम करेल हे उलगडून सांगितलं. त्यावर एक महत्त्वाचा प्रश्न होताच. की या कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणासला धोका आहे का? माणसाची सर्व कामं मशीन करू लागली तर माणसांचं काय?
या प्रश्नानंच ‘नाही’ असं ठाम उत्तर देत माहूरकर सांगतात,
‘यासंदर्भात तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करायला हवा. नॅचरल लँॅग्वेज म्हणजे नैसर्गिक भाषा जी माणसालाच कळायची ती आता मशीनलाही समजू लागली आहे. डिसीजन म्हणजे निर्णयक्षमता आधी केवळ माणसांमध्येच होती. ती आता मशीनमध्येही आली आहे.
मात्र अजून एक दिसरी गोष्ट बाकी आहे. ती म्हणजे कुठलाही निर्णय घेण्यामागचं कारण काय, हे फक्त माणूस सांगू शकतो. सुदैवानं मशीनने हे कौशल्य अजूनतरी अवगत केलेलं नाही. म्हणजे माणसालाच तसं करण्यात यश आलं नाही. भविष्यात तेही जमेल कदाचित; पण म्हणून माणसांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. म्हणजे माणसाची सर्व कामे रोबोट करतील. अगदी तुम्हाला येऊन ते किसदेखील करतील. पण त्यात भावना कधीच असणार नाहीत. माणूस हा भावनाशील प्राणी आहे हे मशीनला कधीच जमणार नाही. त्यामुळे मशीनची भीती माणसाला वाटावी असं काही नाही.’
जपानमधील सॉफ्टबँकेने अलीकडेच एक रोबोट लाँच केला आहे. समजा अल्झायमर किंवा अंथरुणाला खिळून असलेला एखादा रुग्ण आहे. या रुग्णाची काळजी घेताना कुटुंबाला अनेक अडचणी येतात. आता मात्र हा रोबोट अशा रुग्णांची काळजी घेतो. अगदी न विसरता- न वैतागता. या रोबोटना माणसांप्रमाणेच डोळे, हात-पाय सारे काही आहे. फक्त भावना नाही. आपली टेक्नॉलॉजी रोबोटिक्सशी कशी जोडता येईल? आपले सामाजिक प्रश्न या माध्यमातून कसे सोडविता येतील, यादृष्टीने आता विचार व्हायला हवा.
आयबीएम कंपनीने वॉटसन नावाचा एक कॉम्प्युटर तयार केला आहे. ‘वॉटसन हेल्थकेअर’ हे एक मशीन आहे. ती डॉक्टरच्या शेजारीच ठेवलेली असते. त्याला माइकदेखील असतो. एखादा रुग्ण आल्यास त्याचं बोलणं ही मशीन ऐकेल. रुग्णाने दिलेला रिपोर्ट डॉक्टर या मशीनमध्ये टाकतील आणि ही मशीन तो रिपोर्ट स्कॅन करेल. काही क्षणात संपूर्ण रिपोर्ट म्हणजे रुग्णाला काय झालं, कुठलं औषध द्यायला हवं ही सारी माहिती मशीनच्या स्क्रीनवर दिसेल. आता मशीन हे काम करेल म्हणजे डॉक्टरांना कामच उरणार नाही असं काही आहे का, तर नाही. या मशीनचा सल्ला घेऊन डॉक्टर कमी वेळेत अधिकाधिक रुग्णांवर चांगले उपचार करू शकतील. भारतासारख्य देशात तर याची खूप मोठी मदत होऊ शकते. म्हणजे मेळघाटसारख्या भागात सध्या कुठेही इंटरनेट मिळेल पण डॉक्टर मिळणार नाही. अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिथे इंटरनेट आहे तिथे प्रत्येक अत्यावश्यक सेवा पुरविली जाऊ शकते.
तेच कॉलसेण्टरचंही. भविष्यात कॉलसेंटरमध्ये माणसं दिसणार नाहीत. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे मशीनच देतील. ५०० तरुणांचं काम एकटा सर्व्हर करेल. यामुळे रोजगार बुडतील का, तर अजिबात नाही. या टेक्नॉलॉजीच्या सोबतीने जो पळेल तो टिकेल. त्यामुळे तरुणांनी शिकणं आणि कायम शिकत राहणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला कॉम्प्युटर आला त्यावेळीदेखील लोकांच्या हातचं काम जाईल हीच भीती वाटत होती; पण तसं काहीच घडलं नाही. माणसाचं कामाचं स्वरूप फक्त बदललं. आणि त्याही काळात जे कॉम्प्युटर शिकले तेच टिकले.
सध्या जगभरात डेटा सायण्टिस्ट लोकांची खूप कमी आहे. एकट्या अमेरिकेत अशा १० लाख लोकांची गरज आहे. उदा. तुम्ही इन्शुरन्सचे एजंट आहात. तुम्हाला खूप चांगली माहिती आहे. कॉम्प्युटर शिकलात तर तुम्ही इन्शुरन्समधले खूप चांगले डेटा सायण्टिस्ट होऊ शकता; पण त्यासाठी स्वत:त बदल करण्याची गरज आहे. म्हणजे स्वत:च प्रोग्रामर व्हायचं असं अजिबात नाही. पण त्या मशीनला काय माहिती लागते ते देण्याचं स्किल आत्मसात केलं की झालं. आज ना उद्या प्रत्येक कंपनीला-प्रत्येक क्षेत्राला हा बदल स्वीकारावाच लागणार आहे. जो स्वीकारेल तो टिकेल.
आयटी कॅपिटल म्हणून भारताची ओळख आहे. पण आपण आपलं ज्ञान नोकरी करण्यातच घालवतो. अमेरिकेत जाऊन दुसºया एखाद्या कंपनीसाठी आपण झिजतो. हेच काम स्वत:ची कंपनी स्थापन करून आपण इथेच का करू शकत नाही? सध्या आपण म्हणजे आपल्या मोठमोठ्या कंपन्या काय करतात, तर अमेरिकेकडून सॉफ्टवेअर उत्पादनं विकत घेतात. बरं, अमेरिकेत ही उत्पादने निर्माण करणाºयांमध्ये भारतीयांचंच प्रमाण मोठं आहे. पण ते कर्मचारी, नोकरदार म्हणून हे काम करत असतात. हेच सॉफ्टवेअर उत्पादन आपण भारतातच केले तर आपल्याला तिकडे जाण्याची गरज राहणार नाही. अमेरिकेसारखे देशच आपल्याकडे येतील. कारण जगभराचा विचार केल्यास आयटी ब्रेन आपल्याकडेच चांगले आहे. मग ते दुसºया देशात नोकरी करण्यामध्ये कशासाठी झिजवायचे? मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात जर एखाद्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाऊ शकते आणि ते जगभरात निर्यात केले जाऊ शकते, तर हे आपल्या भारतभरात कुठेही होऊ शकते. मग इथल्या तरुणांनी जपान-अमेरिकेला कशासाठी जायचे?
आता परिस्थितीत खूप बदल झाला आहे. ज्या ऋतूत थंडी असायची आता उन्हाळा असतो आणि कधीकधी पाऊसही पडतो. अशा स्थितीत जुन्याच रीतीने पेरणी केली तर काय होणार? शेतकºयांचं आज तेच होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पाऊस पडला तर मी पेरणी कशाची करायची? त्यावर रोग पडू नये म्हणून आधीच काय करायचं, याची माहिती देण्याचं काम आता संगणकच करतील. हे सारं शक्य आहे. समजा, अंबाजोगाईतला एखादा शेतकरी मोबाइलवर मशीनला सल्ला विचारू शकेल. म्हणजे माझी म्हैस फार जास्त लाळ गाळत आहे काय करू? या त्याच्या प्रश्नावर ही मशीन अगदी काही क्षणात म्हशीला कुठलं औषध कसं द्यायचं हे सांगेल. कारण, मोबाइलवरून त्याचं लोकेशन या मशीनला समजेल, तेथील डेटा आधीच उपलब्ध असेल. म्हैस म्हणजे काय, त्या भागात म्हशींना कसला आजार जडला आहे याचा डेटा मशीनकडे उपलब्ध असेल. समजा शेतावरून ड्रोन फिरवला. त्या कॅमेºयातून मिळालेल्या चित्रांच्या आधारे उत्पादन किती होणार हेदेखील सांगता येऊ शकेल. त्यानुसार शेतकºयाला बाजारपेठेची आखणी करता येऊ शकेल. न्यूझीलंडमध्ये हा प्रयोग सध्याच सुरू आहे. भारतात तसं व्हायला फार वेळ लागणार नाही.
एका पैशाचे कर्ज घेतले नाही
मी माझ्या ज्ञानावर बोस्टनमध्ये पहिला कस्टमर मिळवला. त्याला मी माझी आयडिया सांगितली. तीन कोटींचं ते पहिलं काम मला मिळालं. मी ठरविलं की पुढे सात वर्षे कमीत कमी पगार आपण घ्यायचा. म्हणजे पत्नी, दोन मुली आणि मी बोस्टनमध्ये राहू शकू एवढेच पैसे यातून स्वत:साठी काढले. उर्वरित पैसे पुढे यात मी गुंतवत गेलो. नोकरी केली असती तर मी खूप पैसा कमविला असता. पण मी हे सारे फक्त भाकरी किंवा चपातीसाठी करीत नव्हतो. पोट भरणे हा काही माझा उद्देश नव्हता. मला काहीतरी क्रिएट करायचं होतं. मराठी माणूस म्हणून, एक मराठवाड्यातला तरुण म्हणून वेगळं काहीतरी करून दाखविण्याची इच्छा होती. प्रकल्प मिळवत गेलो आणि त्याच पैशांतून मी व्यवसाय वाढवत गेलो. यासाठी खूप पैसा खर्च केला, लॅव्हिश आॅफिस केले असेही नाही. गरजेनुसार आणि उपलब्ध पैशांनुसार मी व्यवसाय वाढवत गेलो. मी आतापर्यंत कोणाकडूनही कर्ज घेतले नाही.
इंजिनिअरिंग केलं, पुढे?
इंजिनिअरिंग शिकवले जाऊ शकतं. पण सॉफ्ट स्किलचा अभाव ही आपल्या तरुणांमधील फार मोठी अडचण आहे. राहायचं कसं, बोलायचं कसं, जेवायचं कसं यात आपण फार कमी पडतो. इंग्लिश ही आपल्याकडे तरुण मुलांची मोठी अडचण आहे. जे काही अनुभवास येते त्यातलं आपण काय घेतो याला खूप महत्त्व आहे. या गोष्टी शिकवता नाही येत. त्या स्वत:च शिकून घ्याव्या लागतात. लोकांकडे बघत बघत ते शिकायचं असतं. महाराष्टÑात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तरुणांना स्किल डेव्हलपमेंट शिकवायला हवं. इथल्या इंजिनिअरिंग महाविद्यालयांनी इंडस्ट्रीशी पार्टनशीप करायला हवी. यातून चांगले इंजिनिअर तयार होऊ शकतात. शिक्षणसंस्था आणि इंडस्ट्री यांनी एकत्रित काम केलं तर परिस्थिती बदलायला फार वेळ लागणार नाही.
अर्थात तरुण इंजिनिअर्सनीही काळाच्या सोबत राहत स्वत:ला अपडेट केलं पाहिजे.
( लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उप वृत्तसंपादक आहेत.)