मंडेला आणि महात्मा
By Admin | Published: April 8, 2017 06:40 PM2017-04-08T18:40:28+5:302017-04-08T18:40:28+5:30
दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.
दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.
साऊथ आफ्रिकेतली गोष्ट आहे. कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला अनेक वर्ष तुरुंगात होते. ते आता वर्षभरात सुटतील अशी शक्यता निर्माण झाली होती. सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्या सुटकेकडे लागून राहिलं होतं. मंडेला तरुंगातृन बाहेर आल्यावर काय होईल याबद्दल जगभर तर्कवितर्क लढवले जात होते. अनेकांचा असा अंदाज होता, की मंडेला तुरुंगातून बाहेर आले की वर्णविद्वेशाच्या दंगली उसळतील, रक्ताचे पाट वाहतील. आणि ही भीती अनाठायी नव्हती.
मात्र त्याच वेळेला साऊथ आफ्रिकेतला एक गट ठामपणे असं म्हणत होता, की असं होता कामा नये. पण मग हे टाळायचं कसं, असा विचार करणाऱ्या काही प्रभावशाली व्यक्तींनी एकत्र येऊन असं ठरवलं, की काहीही झालं, तरी अशा दंगली होऊ द्यायच्या नाहीत. मग त्यासाठी त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली.
सर्वप्रथम त्यांंनी मंडेलांचे समर्थक आणि विरोधक असलेल्या कडव्या नेत्यांना एकत्र आणलं. राष्ट्रीय पातळीवरच्या परस्परांविरुद्ध आग ओकणाऱ्या या नेत्यांना एकत्र आणणं हे फारच अवघड काम होतं. पण या लोकांनी ते केलं. त्यांनी त्या कट्टर नेत्यांना एकत्र यायला भाग पाडलं.
त्यांना सांगितलं, की तुमची विचारसरणी खूप वेगवेगळी आहे हे आम्हाला मान्य आहे. तुम्ही तुमचं म्हणण मांडू नका असंही आम्ही सांगत नाही. मात्र जे बोलाल त्यात शब्द सांभाळून वापरा. भावना भडकवणारी विधानं करु नका. कारण त्यातून फक्त दंगली होतील. यात सगळ्यांचं फक्त नुकसान आणि नुकसानच आहे.
मग त्यांनी आपसात भाषेचे, बोलण्याचे नियम ठरवले. या नेतेमंडळींनी ते अनेकदा मोडले. अनेकदा ती बंधनं त्यांनी झुगारुन देण्याचा प्रयत्न केला; पण शांततावादी मंडळी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यांनी या नेत्यांना सांगितलं की असं नाही चालणार. तुम्ही मान्य केलेले नियम तुम्हाला पाळावेच लागतील.
असं एकूण वर्षभर चाललं. दोन्हीकडची कट्टर माणसं एकत्र आली. दोघांनीही आपापली बाजू मांडली; पण ती अॅग्रेसिव्हली नव्हे, तर अॅसर्टिव्हली!
अखेरीस नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘मी खूप वर्ष तुरुंगात राहिलो, पण माझा गोऱ्या माणसांवर अजिबात राग नाही. काही चुका आम्ही केल्या, काही चुका त्यांनी केल्या, पण आता आपण ते मागे ठेवूया. कारण आपल्याला आता देश पुढे न्यायचाच. प्रगती करायची आहे.
पुढेही नेल्सन मंडेलांना त्यांची भूमिका ठामपणे मांडावी लागली. लोकांना ती पटवून द्यावी लागली. त्यात त्यांनी कधीही आपला मुद्दा सोडला नाही. कधी तो अॅग्रेसिव्हली मांडलाही नाही. त्यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाबाबतही हे नमूद केलं गेलं, की स्वत:चं म्हणणं न सोडता ठामपणे मांडत राहणं आणि त्यात कुठेही आक्रमकता येऊ न देणं ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण स्वत:च्या विचारांवर ठाम राहणं आणि तरीही त्यात आक्रमकता येऊ न देणं यासाठी फार मोठी ताकद लागते.
असाच एक ठाम, पण तरीही आक्रमक नसलेला थोर माणूस आपल्या देशात होऊ गेला... मोहनदास करमचंद गांधी...
संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यातली कुठलीही घटना बघितली तरी लक्षात येतं की गांधीजींनी त्यांंचं म्हणणं कधीही सोडलं नाही. पण ते कधीही आक्रमक झाले नाहीत. कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर ठाम विश्वास होता. स्वत:ला काय हवं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांची ध्येयं सकारात्मक होती आणि त्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी लागणारा अथक ठामपणा त्यांच्याकडे होता.