युपीएससी करणाऱ्या मराठी मुलांना जेवू घालणारा दिल्लीतला मराठी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:25 PM2019-02-25T16:25:10+5:302019-02-25T16:28:22+5:30
एक मराठी आणि बाकीचे चार अमराठी आचारी असा दिल्लीकर प्रदीप काकांचा मराठी कट्टा
-शर्मिष्ठा भोसले
‘अर्रे, 13 बेटा, 18 ला दोन थाळी पाटव लवकर..’ ओल्ड राजिंदर नगरच्या एका छोटेखानी खानावळीत थेट मराठीत ऑर्डरी देणं-घेणं सुरू होतं. वर पाहिलं तर बोर्ड दिसला, ‘मराठी कट्टा’! आत डोकावून पाहावं म्हणून पायरी चढली तर समोर गल्ल्यावर बसलेले दादा मस्त गावरान मराठीत ‘या या ताई, बसा की’ म्हणत ऐसपैस स्वागत करत पुढे आले.
वर्षभरापूर्वी हा ‘मराठी कट्टा’ सुरू झालाय. प्रदीप काका सांगत होते, ‘त्याचं काय, की आम्ही आहोत गलाई लोक. म्हणजे सोनं गाळण्याचा धंदा करणारे. गलाई लोक सांगली भागातून, त्यातही विटा आणि आटपाडीमधून थेट भारतभरात ठिकठिकाणी जाऊन वसलेत. आमचाही हा पारंपरिक व्यवसाय. मी घरच्यांसोबत कामानिमित्त दिल्लीत येऊन-जाऊन असायचो. मग 2006 साली दिल्लीला स्थायिकच झालो. व्यवसायात चांगला जम बसला.’
प्रदीप काकांचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. 2016 मराठा मोर्चाचं वर्ष. महाराष्ट्रातल्या मोर्चाविषयी ऐकता-वाचताना दिल्लीत एक मोर्चा निघाला, त्यात प्रदीपकाकाही होते. शिवाय छत्र पतींचे वंशज संभाजीमहाराजांनी दिल्लीत वर्षभरापूर्वी शिवजयंती साजरी केली. या दोन्ही ठिकाणी खूप मराठी मुलं भेटली. बहुतेक जण युपीएससीचा अभ्यास करायला इथं आलेली होती. त्यांच्याशी बोलताना ‘इथं मराठी जेवण शोधूनही मिळत नाही’ असा एक सूर प्रदीप काकांना ऐकायला आला. मग त्यांनी आपल्या पत्नीशी प्रांजलशी, बोलताना ‘आपणच चालू करूत की मराठी जेवण देणारी मेस!’ अशी कल्पना सुचवली. प्रांजलनं ती लगेच उचलून धरली. पदर खोचत तिनं नेमलेल्या अमराठी शेफ्सना मराठी पद्धतीचं जेवणही शिकवायला सुरू केलं. एक मराठी आणि बाकीचे चार अमराठी आचारी असा प्रदीप काकांचा मराठी कट्टा सुरू झाला. झणझणीत तांबडय़ा-पांढर्या रश्श्यापासून पिठलं, भरीत, श्रीखंड असं बरंच काय-काय अस्सल मराठी चवीचं अन्न इथं मिळतं. इथली वर्दळ सकाळी 9 ते रात्नी 11-12 अशी सुरूच असते. सध्या सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी 70 थाळ्या मुलांच्या रूमवर किंवा अभ्यासिकेत पार्सल जातात. केवळ मराठीच नाही तर अमराठी मुलांनाही इथलं जेवण आवडतं हे विशेष!
मराठी कट्टात मिळणार्या भाकर्यांसाठी लागणारी ज्वारी आणि तांबडय़ा रश्श्याचे मसाले खास विटय़ाहून पार्सलनं दिल्लीत येतात. दरवर्षी युपीएससीसाठी शेकडो मुलं-मुली महाराष्ट्रातून दिल्ली गाठतात. प्रदीप काकांची पारखी नजर त्यांतल्या काही होतकरू मुलांना निवडते. कट्टय़ावर वर्षभर दोन मुलं मोफत आणि दोन मुलं अर्धी रक्कम देऊन जेवतात. प्रदीप काकांचा आणि मराठी मुला-मुलींचा आता छानच जिव्हाळा झालाय. मुलांशी होणार्या त्यांच्या संवादातून जाणवतं,
ते या पोरा-पोरींचे दिल्लीतले पालक बनलेत. सांगतात, ‘हो ना, विशेषतर् मुलींचे आई-वडील माझ्या आणि प्रांजलच्या नजरेसमोर मुलगी राहणार या भावनेतून खूप निर्धास्त होत तिला दिल्लीत सोडून जातात. अशाच एका मुलीला छेडछाडीचा त्र स होत होता, तेव्हा मी तिच्यासोबत पोलिसात जाऊन ते प्रकरण सोडवलं. या सगळ्या पोरांची पार्सलं-कुरियर्स सगळं कट्टय़ाच्याच पत्त्यावर येतं.’
नली भाभी मूळच्या झारखंडच्या. व्यसनी नवरा आणि तीन लहान मुलं असा संसार सांभाळतात. त्या कट्टय़ासाठी रोज चारेकशे चपात्या आणि तीसेक भाकरी करतात. हे काम प्रदीप काकांच्या घराच्या वर असलेल्या एका खोलीत चालतं. प्रांजलताई सांगतात, ‘कट्टा सुरू करण्यामागे नफा कमावण्याचा हेतू कधीच नव्हता. इथं आलं की मला माहेरी आल्याचा फील येतो!’
इकडे जेवताना भेटलेला वैभव करडाळे तसा मराठी मुलगा. मूळचा बिदर जिल्ह्यातल्या अमदाबादचा. पण शिक्षण महाराष्ट्रात झालं. दोन वर्षापासून ओल्ड राजेंद्र नगरमध्ये राहतो. या काळात त्याने यूपीएससीचे दोन अटेम्प्टस दिलेत. सोबतच तो दिल्ली विद्यापीठात लॉ करतोय.
वैभव सांगत होता, ‘मनात कुठंतरी सतत अस्वस्थता धुमसत असते. कितीही अभ्यास केला तरी कमीच वाटतो. मग एकमेकांशी बोलतो. तेवढय़ापुरते मोकळे होतो. इथे भारतभरातून मुलं येत असली तरी त्यांचे सहजच प्रांतवार ग्रुप्स बनतात. या असुरक्षिततेत ते कम्फर्ट झोन शोधत असावेत. मी अमराठी मुलांमध्येही आवर्जून राहतो. त्यामुळे आपण अधिक शहाणे होतो असं मला वाटतं.’
(...पुढे ? वाचा उद्या इथेच .. )
क्रमशः भाग 4
( लोकमत दीपोत्सव २०१८ दिवाळी अंकात "स्वप्नांचे गॅस चेंबर" हा लेख प्रसिद्ध झाला आहे. )