आयआयटीत MBA- शक्य आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 07:58 AM2021-01-14T07:58:08+5:302021-01-14T08:00:12+5:30
गुगलवरून माहिती मिळते; पण करिअरची दिशा सापडेल का? ती शोधण्याचा हा प्रयत्न.
-सुरेश वांदिले
मित्रांनो, नवे वर्ष येते, तेव्हा नव्या आशा, नव्या आकांक्षा मनात पल्लवित झालेल्या असतात. या वर्षाचे आगमन मात्र करोना विषाणू पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर झाले आहे. मार्च २०२० नंतर निर्माण झालेली अनिश्चितता किंचित कमी झाली असली तरी एकूणच सर्व व्यवस्थांसोबतच शैक्षणिक आणि करिअरविषयक व्यवस्था अद्यापही ठोस आणि ठाम दिशेने जाताना दिसत नाहीत. तथापि, आता लसीचे आगमन लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लस- मास्क- सोशल डिस्टन्सिंग- सॅनिटायझेशन या चतु:सूत्रीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिकाधिक कमी होईल, अशी आशा करायला हरकत नाही.
मात्र, या साऱ्यात गेल्या वर्षीचे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाइन म्हणजे बरेचसे डिजिटल मार्गावरून गेले. यंदाही हा प्रवास, बहुतांशी सध्यातरी डिजिटली होईल अशी चिन्हे आहेत. आपण अधिकाधिक डिजिटल साक्षर झाल्याचे असे गृहीत धरले तर हे एक सुचिन्ह समजायला हवे.
काळ कुणासाठी थांबत नाही, हे वास्तव असल्याने आता आपण यंदाच्या शैक्षणिक वर्षातील घडामोडी, नवे अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकिया, परीक्षा पद्धती, व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या शासकीय आणि महत्त्वाच्या खाजगी संस्था, करिअर संधी याकडे लक्ष द्यायला हवे.
करिअर घडवण्याचा काळ हा केवळ दहावी किंवा बारावी नंतरच असतो असे नाही. तो पदवीनंतरही सुरू होऊ शकतो.
दहावी किंवा बारावीत सुमार कामगिरी झालेल्या मित्र-मैत्रिणींनी समजा ठरवले की, टाइमपास बहुत हो गया, मी आता उंच झेप घेऊ शकते, तर ते निश्चितच शक्य आहे. समजा त्यांनी व्यवस्थापपन अभ्यासक्रमाच्या मार्गावरून जाण्याचे पक्के ठरवले व त्यासाठी झोकून दिले तर यशाची दारे उघडू शकतात. एखाद्याला आयआयटीमध्ये बारावीनंतर प्रवेश मिळाला नसेल तर तो मात्र आयआयटीच्या एमबीए अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून आयआयटीचा ब्रँड आपल्या बायोडाटात लावू शकतो. कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुण मिळालेल्या उमेदवाराला आयआयटीच्या एमबीएला प्रवेश मिळू शकतो, ही बाब किती जणांना ठाऊक आहे?
पत्रकारितेच्या पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरू केलेल्या फॅशन कम्युनिकेशन या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला तर वेगळे करिअर उत्तमरीत्या घडू शकते. आयआयटी मुंबईअंतर्गत येणाऱ्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर या संस्थेतील डिझायनिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील बारावी झालेल्या उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. मुंबईतील एक नामवंत व्यवस्थापन संस्था आपल्या एमबीए अभ्यासक्रमाला १०० मुलींसाठी जागा राखीव ठेवते. या संस्थेतील प्रवेशासाठी महाराष्ट्रीय पालक किती प्रयत्न करतात? ही काही वानगी दाखल उदाहरणे झालीत. मात्र, सर्व प्रकारची स्मार्ट साधने हातात असून किंवा नजरेसमोर असूनही आपली मुल-मुली अत्यल्प संख्येने या संस्थांमध्ये प्रवेश घेतात किंवा त्यांना प्रवेश मिळतो.
असे का? तर योग्य वेळी माहिती न मिळणे, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता न येणे, परिणामी चाळणी परीक्षेची संधी हुकणे, अंतिमत: प्रवेशापासूनच वंचित राहणे हे घडते. हे टाळता येणे सहज शक्य आहे. त्यादृष्टीने या सदरात गप्पा मारू.
करिअरविषयक वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरही सापडतील, नवीन वाटही सापडेल.
(लेखक निवृत्त जनसंपर्क संचालक आहेत.)
ekank@hotmail.com