ब्रिस्क वॉक चालणं आणि जॉगिंग यांच्या मधला मध्यम जलदगती पर्याय...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 06:00 PM2017-11-08T18:00:23+5:302017-11-09T11:02:09+5:30
थंडी आली, आता सकाळी फिरायला जाऊ म्हणत रमतगमत गाणी ऐकतं फिरणं म्हणजे निव्वळ मानसिक समाधान. त्यानं फायदा शून्य.
- ओंकार करंबेळकर
थंडी आली, आता सकाळी फिरायला जाऊ म्हणत
रमतगमत गाणी ऐकतं फिरणं
म्हणजे निव्वळ मानसिक समाधान.
त्यानं फायदा शून्य.
त्याउलट खूप जॉगिंगही धोक्याचंच.
मग मध्यम मार्ग काय?
‘नुसते बसू नका थोडा व्यायाम करा, व्यायाम नाही तर किमान थोडं चाला तरी ’ असं आपल्या कानावर सारखं पडत असतं. ‘सर्वात सोपा चकटफू किंवा सोपा व्यायाम कोणता असेल तर तो ‘चालणं’. हे ही आपल्या कानावर येत असतंच. पण ते फारसं मनावर घेतलं जात नाही. मुळात चालण्याला ग्लॅमर आहे, असंच आपल्याला वाटत नाही.
हल्ली गाडीला किक मारून कुठंही पळायची इतकी सवय झाली आहे की, आपण चालत जाणंच विसरू की काय इथवर आपलं चालणं कमी होत चाललंय.
कधीतरी चालायला जाणं, आठवड्यातून एखाद दिवशी चालणं किंवा एकआड दिवस चालणं अशा प्रकारे चालणं होत असेल तरी त्याचा व्यायाम म्हणून आणि शरीराला फारसा उपयोग होत नाही. इतकंच नव्हे जर आपलं चालणं बेशिस्त आणि दिशाहीन असेल तर त्याचाही फारसा उपयोग होत नाही.
सकाळी उठल्यावर मित्र किंवा मैत्रिणीच्या घराखालून हाका मारणं, त्याचं आवरेपर्यंत त्याच्याच घरी आणखी एकदा चहा घेणं मग गेल्या चार दिवसांचा गप्पांचा बॅकलॉग भरून काढत रमतगमत पाय ओढत चालणं, मग पुन्हा चालून झाल्यावर चहा-कॉफी किंवा मिसळ-वडे खाणं, फुलं तोडणं, कानात म्युझिकच्या दोºया अडकवून चालणंं अशी तुमची सकाळी फिरायला जाण्याची व्याख्या असेल तर असल्या फिरण्याचा काहीच उपयोग होत नाही. चालण्याचा खरंच उपयोग व्हायचा असेल तर काही शिस्त पाळायलाच हवी.
म्हणून आजकाल व्यायामाचे तज्ज्ञ किंवा डॉक्टर्स शास्त्रशुद्ध अशा ब्रिस्क वॉकचा सल्ला देतात.
आता ब्रिस्क वॉक म्हणजे दुसरं तिसरं काही वेगळं नसून तो वेगवान चालण्याचाच एक भाग आहे. जॉगिंग आणि चालणं यांच्यामधली ही गती असते. ब्रिस्क वॉकमध्ये साधारणत: १२ मिनिटांमध्ये एक किलोमीटर अशा गतीनं चालणं अपेक्षित असतं.
आणि त्यासाठी लागते शिस्त.
तर शिस्त कशी आणायची?
आणि त्यासाठी काय करता येतं.
शिस्तीच्या चालण्याचे ६ नियम
१) चालण्यासाठी तुमच्याकडे चांगले, योग्य आकाराचे शूज असणं कधीही चांगलं.
२) चालताना तुमचे शरीर आणि पाठ ताठ असू द्या. पोक काढून चालू नये.
३) चालताना नजरही थेट डोळ्यांच्या रेषेत हवी, चालताना तुमचे हातसुद्धा हलले पाहिजेत.
४) तुम्ही चालायला सुरुवात कराल तेव्हा आपण काही सुपरमॅन आहोत अशा अविर्भावात चालायला सुरुवात करू नका. पहिल्याच दिवशी मला काय होतंय, हे तर एकदम सोपंय असं समजून फार दूरवर आणि भरपूर वेगाने चालू नका. यामुळे तुमचे पाय तर दुखतीलच त्याहून तुम्ही दुसºया दिवशीच चालण्यासाठी उठायला कंटाळा करू लागाल.
५) शूज घातले म्हणून वेगानं चालणं सुरू असंही योग्य नाही. कोणत्याही व्यायामासाठी वॉर्म अप आवश्यक असतो. त्याप्रमाणे सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये थोड्या संथगतीनं चाला. मग हळूहळू वेग वाढवा. चालणं थांबवतानाही हेच करायचं आहे. तसेच चालणं थांबवताना गती हळूहळू कमी करून थांबले पाहिजे. वॉर्म अप आणि कूल डाउन हे व्यायामाइतकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा.
६) गुडघेदुखी, मधुमेह, रक्तदाबाचे विकार तसेच कोणताही आजार असेल तर चालण्याचा किंवा कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वजन, उंची, तब्येतीचा इतिहास यावरून डॉक्टर सुयोग्य व्यायाम सुचवतात. म्हणून मनानंच स्वत:चा डॉक्टर होणं आधी थांबवलं पाहिजे.
प्री-डायबोटिक नावाच्या एका ख्यातनाम वैद्यकीय जर्नलमध्ये अलीकडेच एक अभ्यास प्रसिद्ध झाला. आणि तो अभ्यास असं म्हणतोय की, ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी जॉगिंगपेक्षा ब्रिस्क वॉकिंग जास्त फायद्याचं आहे. जे प्री-डायबेटिक फेजमध्ये आहेत किंवा ज्यांना डायबिटीस होण्याची शक्यता आहे अशा काठावर असणाºया वजनदार लोकांचा हा अभ्यास मधुमेहतज्ज्ञांनी केला. १५० लोकांचे चार गु्रप्स केले. आणि सहा महिने व्यायाम, खानपान यांच संतुलित नियोजन केलं. सहा महिन्यात एकूण वजनाच्या ७ टक्के वजन कमी करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. तर लक्षात असं आलं की जे लोक जॉगिंग करतात त्यांच्यापेक्षा ब्रिस्क वॉक करणाºया लोकांचं वजन अधिक वेगानं तर कमी झालंच पण त्यांची तब्येतही अधिक ठणठणीत होती आणि उत्साहही उत्तम टिकून होता. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी जोरदार जॉगिंगपेक्षा हे जलद चालीचं ब्रिस्क वॉक करणं फायद्याचं असं हा अभ्यास सांगतो.