मेरठ की पाठशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:35 AM2018-03-29T08:35:37+5:302018-03-29T08:35:37+5:30

उत्तर प्रदेशात नोकरी करायची, शिक्षिका म्हणून आव्हान होतंच, पुढे..

Meerut school | मेरठ की पाठशाला

मेरठ की पाठशाला

Next

- शैलजा पाध्ये, शिक्षिका, जवाहर नवोदय विद्यालय, मेरठ, उत्तर प्रदेश

यूपीत जायचं?
असा प्रश्न पडलाच. उत्तर प्रदेश म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? मात्र इथं आले आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की, या प्रदेशातील लोक मनानं मात्र मोठी आहेत. कोणतंही कपट नाही. पुढं होऊन मदत करतील आणि मदत घेतीलही. मुलांचं आजारपण असो किंवा आणखी काही लगेच मदतीचा हात पुढे करणारी ही माणसं आहेत. एकदा ट्रेनमध्ये बसताना माझ्या मुस्लीम मैत्रिणीनं दिलेला डबा मला आजही आठवतो. ‘जरूर खाना हं!’ म्हणत दिलेली हक्काची सूचनाही आठवते.
उत्तर प्रदेशात नोकरीला आले, इथं एक नवीन भारतच मला भेटला. एकदा उत्तर प्रदेशातील लग्नाची पद्धत पाहावी म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीसोबत लग्नाला गेले. तर त्यांनी कौतुकाने माझ्या हातांवर मेहंदी काढली. लाडू भरवला. मुली माहेरी आल्यावर त्यांना द्यायच्या आहेराच्या कार्यक्रमात त्या घरच्या आजींनी मलाही साडी दिली.
अर्थात सोपं नव्हतं इथं येणं. अनंत अडचणींवर मात करत मी ठामपणे उभी होते. थेट उत्तर प्रदेशात मेरठला मला नोकरी करायला जायचं होतं. माझ्या हातात नवोदय विद्यालय, मेरठ, उत्तर प्रदेश येथे बदली झाल्याचा आदेश पडला. मी अस्वस्थ झाले. पुन्हा नव्यानं रुजायचं आता खरंच जिवावर येत होतं; पण मनाची तयारी केली आणि एका नव्या दिशेने प्रवास सुरू केला. मर्यादांपेक्षा मानवी नातं मोठं आहे याची या रुजण्यानं पुन्हा एकदा खातरी करवली.
नात्याच्या किंवा गोताच्या नसणाऱ्या अनेकांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने, उभारीने माझा विश्वास आणखीनच वाढत होता. प्रत्येकवेळी नवीन अडचण उभी राहायची आणि आपण त्यावर नव्यानं उपाय शोधायचा, हे ठरलेले.
महाराष्ट्रात तुळजापूरलाही मी काही काळ काम केलं होतं. येथेही मला चांगले अनुभवच जास्त आले. माझ्या सहकारी मैत्रिणी, माझे सहकारी शिक्षक, शेजारी या सगळ्यांमुळे मला आपण घरापासून दूर आहोत, नातेवाइकांपासून दूर आहोत असं कधीही वाटलं नाही.
मात्र मेरठला जायचं म्हणजे एक नवीन आव्हान होतं; पण ते मी पेललं. इथं येऊन इथलीच झाली. आज मी दिल्ली मेट्रोमधून सहज प्रवास करू शकते, हिंदी-इंग्रजीत संवाद साधू शकते. प्रत्येक अनुभवागणिक माझं वर्तुळ अधिक विस्तीर्ण होत जातं.
बाहेरच्या जगात अनुभवांची रत्न मिळतात आणि ती आपल्याला खूप काही देऊन जातात. आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध बनत जातं. नोकरीच्या निमित्तानं मी बराच उत्तर प्रदेश फिरले. मध्य प्रदेश, ओरिसा या भागात मी बरीच फिरले. तेव्हा मला एक सत्य गवसलं की प्रत्येक प्रदेशाचं एक वैशिष्ट असलं तरी चांगली-वाईट प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी असतेच.
मेरठनं या साºयावरचा माझा विश्वास वाढवला. जी अस्वस्थता मला नोकरीवर रुजू होताना होती ती आज नाही. आत्मविश्वास आणि स्वाभिमान यांच्या बळावर सुरू केलेला हा प्रवास कायमच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत आला आहे.

Web Title: Meerut school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.